ब्रिटनला सावरण्याचे आव्हान

    25-Oct-2022
Total Views |
 
ऋषी सुनक
 
 
 
 
लिझ ट्रस यांनी केवळ 45 दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यांनी केलेले उद्योग आणि ‘ब्रेक्झिट’मुळे युरोपीय महासंघाशी उडालेले खटके या पार्श्वभूमीवर ब्रिटिश उद्योगधंद्याला प्रोत्साहन देत अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्याचे, नवे मार्ग शोधण्याचे काम ऋषी सुनक यांना करावे लागेल.
 
 
 
हिंदू असूनही आपले हिंदूपण दाखवण्याची लाज न वाटणार्‍या ऋषी सुनक यांच्या गळ्यात ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची माळ पडल्याने भारतीयांना विशेष आनंद झाल्याचे दिसून येत आहे. दीपावलीच्या आदल्या दिवशी ‘टी-20’ क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानला नमवल्याच्या आनंदात आपल्यावर 150 वर्षे राज्य केलेल्या ब्रिटनची विस्कटलेली राजकीय, आर्थिक घडी बसवण्यासाठी भारतीयाचीच निवड करावी लागल्याचा आनंद मिसळून गेल्याचेही पाहायला मिळत आहे. तसा तो आनंद वाटलाही पाहिजे, त्यात काही चुकीचे नाही. तसेच पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांचे सर्वच भारतीयांनी कौतुक, अभिनंदनही केले पाहिजे.
 
 
 
 
कारण, ऋषी सुनक यांचे कुटुंब मूळचे भारतातील पंजाब प्रांताच्या गुजरांवालाचे (आताचा पाकिस्तान). तिथून त्यांच्या कुटुंबाने आफ्रिकन देशाची वाट धरली आणि तिथे काही वर्षे व्यापार-उदिम केल्यानंतर ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. तिथेच ऋषी सुनक यांचा जन्म झाला, म्हणजेच, ते हिंदू असले वा त्यांचे पूर्वज भारतातील असले तरी ते जन्माने ब्रिटिशच आहेत. तरीही एका परक्या देशात आलेल्या, नंतर तिथे स्थिरस्थावर झालेल्या व स्थानिकांच्या दृष्टीने गौरवर्णीय नसलेल्या व्यक्तीने तिथल्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणे आणि थेट पंतप्रधानपदाला गवसणी घालणे नक्कीच अभिमानास्पद!
 
 
 
 
मात्र, ऋषी सुनक पंतप्रधानपदी विराजमान होत असताना ब्रिटनची अवस्था दयनीय असल्याचेच दिसून येते. एकेकाळी साम्राज्यावरचा सूर्य न मावळणार्‍या देशावर आज महागाईचे, आर्थिक मंदीचे काळे ढग घोंघावत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ब्रिटनचा विकासदर फक्त 0.8 टक्के राहण्यावरुनच तिथली परिस्थिती किती वाईट असेल याचा अंदाज येतो. यातून मार्ग काढण्याचे, ब्रिटनला सावरण्याचे आव्हान आता ऋषी सुनक यांच्यापुढे असेल. त्यांच्याआधीच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी केवळ 45 दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यांनी केलेले उद्योग आणि ‘ब्रेक्झिट’मुळे युरोपीय महासंघाशी उडालेले खटके या पार्श्वभूमीवर ब्रिटिश उद्योगधंद्याला प्रोत्साहन देत अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्याचे, नवे मार्ग शोधण्याचे काम ऋषी सुनक यांना करावे लागेल. ऋषी सुनक त्याचा सामना करतीलही आणि याचमुळे हुजूर पक्षीयांनी विश्वास दाखवत त्यांना देशाच्या सर्वोच्च पदासाठी पाठिंबा दिल्याचे दिसते.
 
 
 
 
ते करण्याबरोबरच त्यांच्यावर आणखी एक दडपण असेल ते म्हणजे, आपण अधिकाधिक कट्टर ब्रिटिश आहोत, हे दाखवून देण्याचे. कारण, ऋषी सुनक यांना पंतप्रधानपदी बसवणार्‍या ब्रिटिश लोकशाहीचे कितीही गोडवे गायले तरी त्यांचे विरोधकही असणारच. ऋषी सुनक कधी एखादी चूक करतात आणि आपण त्यांना धारेवर धरतो, याचीही ते वाट पाहणारच. त्यातले सर्वच नव्हे, पण बरेच लोक त्यांच्यावर ते ब्रिटिश नाहीत, अशीही टीका करू शकतात. तसेही ब्रिटिशांनी शेकडो वर्षे इतर देशांवर राज्य केले ते आपण ब्रिटिश असल्याच्या अहंकारातूनच. त्यातूनच इतर देशांतल्यांना कमी लेखण्याची मानसिकता ब्रिटनमध्ये तयार झाली. ती आधुनिक काळातही पूर्णपणे संपलेली नसेलच. ऋषी सुनक यांच्याबाबत ट्विटर वा अन्य समाजमाध्यमांत तशा प्रतिक्रिया आतापासूनच येऊही लागल्या आहेत. ते पाहता, ऋषी सुनक यांच्यावर आपले ब्रिटिशपण सिद्ध करण्याची वेळ कधीही येऊ शकते आणि तो काळ त्यांच्यासाठी नक्कीच कसोटीचा असेल.
 
 
 
 
आता ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी आल्याने तिथे राहणार्‍या हिंदूंच्याही काही अपेक्षा असतील. कारण, गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटनमध्ये धर्मांध मुस्लिमांकडून हिंदूंवर सातत्याने जिहादी हल्ले करण्यात येत आहेत. हिंदूंच्या घरे, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करणे, मंदिरांची नासधूस करणे, भगवा ध्वज फेकून देण्याची कुकृत्ये इस्लामी कट्टरपंथीयांकडून केली जात आहेत. त्यावरून तिथल्या हिंदूंनी ‘इनसाइट युके’ चळवळीच्या माध्यमातून आपल्याविरोधातील लक्ष्यित गुन्ह्यांविरोधात कारवाईची, हिंसाचारपीडीत हिंदूंना मदतीची, धर्मांध मुस्लिमांच्या अड्ड्यांची दखल घेण्याची मागणी लिझ ट्रस यांच्याकडे केली होती. आता लिझ ट्रस पदावर राहणार नसल्याने हिंदूंचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारीही ऋषी सुनक यांच्यावर असेल. या माध्यमातून त्यांना भारताशीही उत्तम संबंध राखता येतील. कारण, हिंदूंविरोधातील इस्लामी कट्टरपंथीयांच्या हिंसाचारावरून भारताने ब्रिटनला सुनावले होते. तसेच, दोषींवर कठोर कारवाईची मागणीही केली होती.
 
 
 
 
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत एक भारतीय ब्रिटनच्या पंतप्रधानपदी येत असताना दोन्ही देशांतली परिस्थिती पुरती बदलल्याचे भानही ऋषी सुनक यांना ठेवावे लागेल. कारण, व्हिन्स्टन चर्चिल यांनी हिणवलेला भारत आता राहिला नसून मोदीकाळात नव्या भारताचा उदय झालेला आहे. अवघ्या जगभरात भारताची पत-प्रतिष्ठा वाढलेली असतानाच मंदीच्या खाईत जाऊ पाहणार्‍या जगाला भारतीय अर्थव्यवस्था, तरुणांची संख्या, भारतीयांच्या कौशल्याकडून मोठी आशा आहे, तर ब्रिटनमध्ये नेमकी याउलट स्थिती आहे. ‘ब्रेक्झिट’, कोरोनामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असून महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे मंदीची लाट येऊन अर्थव्यवस्था कधीही कोसळू शकते,अशी ब्रिटनची अवस्था झालेली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी याआधीच्या पंतप्रधानांनी भारताबरोबर संबंध सुधारण्याचे, प्रामुख्याने मुक्त व्यापार करार करण्याचे कितीतरी प्रयत्न केले. पण, भारत आपल्या स्वतःच्या अटींवर ब्रिटनशी कोणताही करार करू शकतो, ब्रिटनच्या अटींवर नव्हे. याचमुळे ते करार पूर्णत्वास गेले नाहीत. अर्थात, त्या करारांची अत्यावश्यकता भारताला नव्हे, तर ब्रिटनला आहे आणि ते करण्यासाठी ऋषी सुनक पुढाकार घेऊ शकतात. गेल्या महिन्यात भारतीय जंगलात चित्ते आणल्यानंतर देशात एकेकाळी कबुतर सोडली जात असत, आज चित्ते सोडले जात आहेत, असे विधान मोदींनी केले होते. त्यातून त्यांनी भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचीच जाणीव करून दिली होती. आता ऋषी सुनक यांच्या रुपात एक भारतीय मुळाचा ब्रिटिश नागरिक पंतप्रधान होत असताना त्यांनाही भारताचा प्रभाव मान्य करावा लागेल व त्यानुसारच भारताशी संबंध वृद्धिंगत करावे लागतील.
 
 
 
 
दरम्यान, ब्रिटनमध्ये ऋषी सुनक पंतप्रधानपदी येत असतानाच भारतात काँग्रेस, ‘पीडीपी’ वगैरे पक्षांनी वेगळीच रडारड सुरू केली. ब्रिटनने अल्पसंख्य समुदायाच्या व्यक्तीला पंतप्रधान केले, भारतात तसे कधी होणार, असे यातल्या पी. चिदंबरम, शशी थरुर आदींचे म्हणणे. पण, मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद तर डॉ. एपीजे अब्दुल कलाम, ज्ञानी झैलसिंग, फक्रुद्दीन अली अहमद, डॉ. झाकीर हुसेन यांनी राष्ट्रपतीपद भूषवले आहे. म्हणजेच, भारतात ब्रिटनसारखे झाले नाही असे नव्हे, उलट कितीतरी वर्षे आधीच झालेले आहे. पण, काँग्रेस वा ‘पीडीपी’सारखे पक्ष या नेत्यांना अल्पसंख्य शीख, मुस्लीम नव्हे, तर बहुसंख्य हिंदूच मानत असावेत. दुसरीकडे यात मेहबुबा मुफ्तींनी तर एक पाऊल पुढे जात ‘एनआरसी’, ‘सीएए’चा मुद्दा उपस्थित केला. मात्र, नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या अन्य राज्यांतील नागरिकांना मताधिकाराचा निर्णय घेण्यात आला. त्यावर मात्र, मेहबुबांनी संताप व्यक्त केला.
 
 
 
आज ऋषी सुनक यांना पंतप्रधानपदी बसवल्याने ब्रिटनचे कौतुक करणार्‍या व भारतात तसे होत नाही म्हणणार्‍या मेहबुबा मुफ्तींनी सहिष्णुता दाखवत जम्मू-काश्मीरमध्ये राहणार्‍या अन्य राज्यातल्यांना मताधिकार देण्याच्या निर्णयाचे स्वागत का केले नव्हते? म्हणजेच, इतरांनी मुस्लिमांप्रती सहिष्णुता दाखवावी आणि ती दाखवलेली आहेही, पण स्वतःची वेळ आली की अन्य राज्यातल्यांचा, हिंदूंचा द्वेष करायचा, असा हा मेहबुबांचा दुटप्पी व्यवहार. त्यामुळे त्यांनी ब्रिटनमधील घडामोडींचा दाखला देत भारतीय लोकशाही वा नेतृत्वावर टीका करणे, मुस्लिमांवरील कथित अन्यायावरून छाती पिटणे हास्यास्पदच!