मुंबईत एरवीही पार्किंगच्या समस्येने वाहनचालक हैराण असतात. त्यात ऐन दिवाळीत तर मुंबईकर खासगी वाहनांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्यामुळे या समस्येत अधिक भर पडली. त्याचा परिणाम वाहतूककोंडीच्या समस्येतही झाला. या सगळ्या बाबींचा विचार करता, वाहनतळासाठी स्वतंत्र व्यवस्थापन कक्षाची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
मुंबईत जागोजागी रस्त्यांच्याकडेला वाहने उभी राहात (अवैध पार्किंग) असल्यामुळे उपनगरापासून ते अगदी दक्षिण मुंबईतही वाहतूककोंडीच्या समस्येचा मुंबईकरांना सामना करावा लागतो. यावर इलाज म्हणजे विविध वाहतूक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले स्वतंत्र वाहनतळ व्यवस्थापन कक्ष स्थापन केले पाहिजे.
मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस व अन्य सरकारी यंत्रणाचा समन्वय असलेल्या या कक्षाच्या माध्यमातून विभागीय वाहनतळ व्यवस्थापनाची आखणी करत वाहनतळ नियमावली, शुल्क व वाहतूक सुधारणांच्या योजना आखता येतील. अशा सूचना असलेल्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयातही दाखल केल्या गेल्या आहेत. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही दिले आहेत.
जवळपास चार वर्षांपूर्वी 20 फूट रुंदीपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केल्याने अग्निशमन दलाला टिळकनगर सरगम सोसायटीमध्ये आग विझविण्याकरिता फायर इंजिन व इतर वाहने नेणे मुश्किल झाले होते व त्यामुळे हाऊसिंग सोसायटीमधील 11व्या मजल्यावरील सदनिकेत ‘शॉर्टसर्किट’मुळे लागलेल्या आगीत पाच ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे दि. 27 नोव्हेंबर, 2018चे भयावह उदाहरण देत त्या सोसायटीने अॅड. सविना क्रेस्टो यांच्यामार्फत उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हा मुंबईचा ज्वलंत प्रश्न असल्याने याचिकेची व्याप्ती वाढविली. याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली व बेकायदा उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला. त्यावर रस्त्याच्या दुतर्फा सम-विषम पद्धतीने तात्पुरत्या तत्वावर वाहने उभी करूनही या परिस्थितीत काही फरक पडला नाही.
परिणामी वाहतूक विभागाने गणेश उद्यान रस्त्यावर वाहने उभी करण्यास मज्जाव केला. याउपर काय करणे अपेक्षित आहे, असा प्रश्न सरकारी वकिलाने उपस्थित केला. परंतु, रहिवाशांनी सहकार्य केले नाही, तर राज्य सरकारने काय करणे अपेक्षित आहे, असा प्रतिप्रश्न न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलांना केला. नियमांचे उल्लंघन केल्यावर सरकार कठोर कारवाई करू शकते का, असेही न्यायालयाने विचारले. वाहनतळ धोरण ठरल्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सरकारी वकिलाने सांगितल्यावर या विषयाची न्यायालयाने नोंद घेतली.
न्यायालयाने सांगितले की, योग्य असे वाहनतळ धोरण आखायला हवे जेणेकरून फायर इंजिन आग लागलेल्या ठिकाणी जागा मिळून पोहोचू शकेल. मुंबईत रस्ते मर्यादित लांबीचे म्हणजे सुमारे दोन हजार किमी आहेत व वाहनांची संख्या 30 लाखांवर पोहोचेल अशी आहे. वाहनतळासाठी सुद्धा मुंबईत पुरेशी मुंबईत जागा मिळत नाही. त्यामुळे बहुमजली वा भूमिगत वाहनतळे बांधायला हवीत.
पार्किंग शुल्कातून लूट
दक्षिण मुंबईतील काही वाहनतळांमध्ये बेकायदा बिनपावती वसुली अद्याप सुरु आहे. हुतात्मा चौकातही पार्किंगची अशीच लूट सुरू आहे. महापालिकेने अशा पार्किंगकरिता अनधिकृत वसुली ताबडतोब बंद करायला हव्यात.
मुंबईतील वाहनतळ व्यवस्था
महानगरपालिकेने वाहनतळ प्राधिकरण स्थापन केले आहे. ठिकठिकाणी वाहनतळ विकसित करण्यासाठी मोकळ्या जागा, मैदाने, जिमखाने, उद्याने, रस्ते येथे वाहनतळ उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मॉल्समध्ये जागा मिळण्यासाठी उपाय शोधून काढले जात आहेत ते असे -
1. 8 मॉल्समध्ये कमीतकमी 6500 वाहनांकरिता वाहनतळ -
2. सम विषम रस्ते वांद्रे (प) - 15 मुख्य रस्ते व 50 आंतर रस्ते या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होत आहे
3. बसडेपोमध्ये दोन ते तीन स्तरीय भूमिगत वाहनतळ-सध्या डेपोमध्ये तीन हजार खासगी वाहनांकरिता सशुल्क वाहनतळ
उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
12 तासांसाठी दुचाकीला रु 30; चारचाकींना रु 70. एकूण 27 आगार आहेत, त्यात नेमकी किती वाहने पार्क करता येतील त्याची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. आगारात किती जागा आहे त्यावर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
4. खासगी संस्थांकडून प्रयत्न होत आहेत. जे. पी. मॉर्गन ऑफिस 1.16 दशलक्ष चौ.फू. स्पेसमध्ये कार पार्किंग करणार आहेत. निलॉन नॉलेज पार्क, गोरेगावला 1130 वाहनांकरिता दहा वर्षांच्या लीझमध्ये व्यवस्था होणार आहे. जे. पी मॉर्गन व निलॉन लिमी यांच्यामध्ये ‘लीव्ह अॅण्ड लायसेन्स’ 15 डिसेंबर 2021 ते 15 डिसेंबर 2031 असा करार झाला आहे. महिन्याला रु 145 प्रति चौ.फू. ते रु 201.85 प्रति चौ.फू. दरवर्षी 15 टक्के वाढ. एकंदर दहा वर्षांत रु दोन हजार कोटी होणार.
5. ऑन स्ट्रीट पार्किंग ‘सीसीटीव्ही’ सारख्या सुविधांसह - ही व्यवस्था चार प्रभागांमध्ये ‘पायलेट प्रकल्प’ म्हणून केली जाणार आहे.
‘डी’ प्रभागामध्ये नेपियन सी रोड; जी साऊथ प्रभागामध्ये वरळी; ‘के’ पश्चिममध्ये अंधेरी पश्चिम व पवई; ‘एस’ प्रभागामध्ये भांडुप.
मासिक भाड्यावर ही व्यवस्था तीन कॅटेगरीमध्ये 12 तासांकरिता सकाळी 8 ते रात्री 8 व रात्री 8 ते सकाळी 8 करिता होणार आहे.
ए) हेरीटेज स्थळे : चारचाकी वाहने रु 4400; दोनचाकी वाहने रु 935 ते रु 1870; बी) व्यवसाय भागात - सकाळी 8 ते रात्री 8 चारचाकीकरिता रु 2970, रात्री 8 ते सकाळी 8 रु 1485; दुचाकीकरिता अनुक्रमे रु 1270 व रु 605; सी) अर्ध व्यवसायिक भागात अनुक्रमे रु 1540 व रु 770; दुचाकीकरिता अनुक्रमे रु 770 व रु 330.
6. हुतात्मा चौक (भूमिगत) : सध्याची क्षमता 56 व प्रस्तावित 200; एकूण अपेक्षित खर्च रु 53 कोटी; माटुंगा पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर - सध्याची क्षमता 100 व प्रस्तावित क्षमता 400 ; एकूण अपेक्षित खर्च रु दहा कोटी. दक्षिण मुंबईत सीएसएमटी, कुलाबा, रिगल, गेट वे. मंत्रालय, विधान भवन नरीमन पॉईंट या भागात पालिकेची 47 ‘पे अँड पार्क’ आहेत.
7. कंत्राटदाराकडून वाहनतळांवर शुल्कवसुली बंद केल्यामुळे 13 ठिकाणी मोफत वाहने उभी करण्याची तात्पुरती संधी मिळत आहे. ही स्थळे पालिकेनी कंत्राटदाराकडून ताब्यात घेतली आहेत.
8. पुढील दोन वर्षांत तीन ठिकाणी बहुमजली पार्किंग सुरू होणार आहे (माटुंगा - 18 माळ्यांचे व 475 कारकरिता, मुंबादेवी - 18 माळ्यांचे व 540 कारकरिता, फ्लोराफाऊंटन - भूमिगत 5 स्तरीय) एकूण 1262 लॉट तयार होतील. सध्या मुंबईत 48 हजार पार्किंग लॉट तयार आहेत.
9. स्मार्ट पार्किंग : 2021 मध्ये नरीमन पॉईंटला अरेबियन समुद्राजवळ हे तयार झाले आहे. ‘एमएमआरडीए’कडून काही समस्यांमुळे ते बंद झाले होते, पण आता ते दुरुस्त होत आहे. तिथे 250हून जास्त वाहने पार्क करता येतील. हे जवळ जवळ संपूर्ण ‘ऑटोमेटिक’ असणार आहे. यात ‘यूझर फ्रेन्डली एन्ट्री’ व ‘एक्झिट’ व्यवस्था आहे.
10. व्हॅले पार्किंग : दादर येथे शॉपिंगकरिता ही सोय केली आहे. वरळी व लोअर परळला ही व्यवस्था होणार आहे. वाहतूककोंडीवर ही व्यवस्था उपयोगी पडते. व्यापारी संघाने यासाठी पुढाकार घेऊन दुकानात येणार्या ग्राहकांना वाहने सार्वजनिक वाहनतळावर उभी करण्याची ‘व्हॅले पार्किंग’ची युक्ती योजली आहे. पहिले तीन तास विनाशुल्क ही व्यवस्था राहाणार आहे. त्यानंतर तासाला रु 50 ग्राहकाकडून घेण्यात येणार आहे. वाहन उभे करण्याबरोबर ‘चार्जिंग’, सफाई आदी सुविधा पण देणार आहेत.
11. मध्य रेल्वेची पार्किंग व्यवस्था सध्या छशिमट व एलटीटी स्थानकांवर आहे. तेथे दोन गोष्टी बघितल्या जातात. प्रवेशावर बंधन व किती वेळ झाला ते नोंदले जाते. स्टेशनवर सोडल्यावर पाच मिनिटे मोफत होते. पण, त्यानंतर वेळाप्रमाणे ‘चार्जेस’लावले जातात. 5 ते 15 मिनिटांना रु 50 व 30 मिनिटांपर्यंत रु 200. अशी व्यवस्था सर्व स्थानकांवर व्हायला हवी.
मुंबई महापालिका यापुढे वरील माहितीवरून पार्किंगच्या व्यवस्थेत नक्की प्रगती करेल, अशी आशा वाटते.
ठाणे आणि नवी मुंबईतील पार्किंग व्यवस्था
ठाणे - गावदेवी मैदानवर भूमिगत पार्किंग व्यवस्थेचे काम प्रगतिपथावर आहे असून तिथे 130 चारचाकी व 120 दुचाकींकरिता 4330 चौ.मी जागा उपलब्ध असेल. ‘म्हाडा’कडून ठाणे येथे बाळकुमला 17 मजली तीन वाहनतळ तयार होत आहेत (160 वाहनक्षमता आहे)
ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई, खारेगाव, शहापूर व दापचरी येथे वाहनतळ निर्माण करण्यात येईल.
नवी मुंबई बेलापूरला सेक्टर 15 मध्ये (पाम बीच रोडजवळ) चार माळ्याचे पार्किंग होत आहे. 475 चारचाकी व 121 दोनचाकी वाहनांकरिता 3909 चौ.मी जागेवर हे पार्किंग बांधले जात आहे. 75 टक्के काम पुरे झाले आहे. पुढील वर्षी ते काम पुरे होईल.