लंडन : अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेल्या इंग्लंडच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा भारतीय चेहरा झळकायला लागला आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी याबाबतची माहिती सर्व देशवासियांना दिली आहे. इंग्लंडची घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आणून देशाला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचे आहे असे म्हणत ऋषी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याआधी झालेल्या हुजूर पक्षांतर्गत निवडणुकांत लिझ ट्रस यांनी ऋषी यांचा पराभव केला होता आणि इंग्लंडच्या पंतप्रधान बनल्या होत्या.
ऋषी यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमधून देशवासियांना आवाहन करताना म्हटले आहे की, "याआधी देशाचा अर्थमंत्री म्हणून मी देशाची सेवा केली आहे. सर्वात कठीण काळात देशाला सावरण्याचे काम केले आहे, सध्या आपल्यासमोर असलेली आव्हाने खूप मोठी आहेत. परंतु आपण योग्य निर्णय घेतल्यास संधी अभूतपूर्व असतील." प्रसिद्ध भारतीय उद्योजक नारायण मूर्ती यांचे ऋषी सुनक हे जावई आहेत.
याआधी लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा पंतप्रधानपदाचा काळ हा इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचा ठरला होता. अर्थव्यवस्था एका मोठ्या संकटातून जात असताना ती सावरण्यासाठी काही ठोस करता आले नसल्याने लिझ यांना पायउतार व्हावे लागले होते.