मराठमोळा दीपोत्सव
मुंबई : मुंबईत साजऱ्या होत असलेल्या दिवाळीच्या अनुषंगाने मुंबई भाजपकडून विविध कार्यक्रमांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपने आयोजित केलेल्या 'आपला मराठमोळा दीपोत्सव' कार्यक्रमावरून आता ठाकरे गट आणि भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे वरळीतील दुसरे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. तर ठाकरे गटाच्या आरोपांना भाजपने देखील जोरदार प्रत्युत्तर देत त्यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वरळीत होत असलेल्या 'मराठमोळ्या दीपोत्सवात' राजकीय वादाची पहिली ठिणगी पडली आहे.
त्यांना विष पेरल्याशिवाय पर्याय नाही
आपल्या मराठमोळ्या दीपोत्सवाला मिळत असलेल्या मुंबईकरांच्या उदंड प्रतिसादामुळे काहींना सन्मानाची भाषा आठवत आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या मांडीला मांडी लावून मंत्रीपद भुषवणाऱ्यांना आता हिंदू कलाकरांमध्ये राजकारणाचे विष पेरल्याशीवाय पर्याय राहिला नाही.
- नितेश राणे, आमदार, भाजप
मराठी सण साजरे होतायत याचे त्यांना दुःख !
'अडीच वर्षाच्या काळात ठाकरे सरकारने हिंदूंवर आणि मंदिरांवर निर्बंध लादले. आताच्या सरकारच्या काळात सगळे हिंदू सण जोरात साजरे होत आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे. मराठी कलाकारांना आपल्या राजकारणात ओढण्याचे त्यांचे घाणेरडे प्रयत्न सुरु आहेत. शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये हिंदू सण साजरे होत असल्याचे पाहून विरोधक हैराण झालेले आहेत. कुठल्याही मराठी कलाकाराला त्यांची कलाकृती सादर करताना थांबविण्यात आलेले नाही. ठाकरे गटाचे आरोप निव्वळ बिनबुडाचे असून राजकीय हेतून प्रेरित असून ठाकरे गटाचा हा रडीचा डाव आहे.'
- मिहीर कोटेचा, आमदार, भाजप