'ही' खासगी कंपनी होणार सरकारी कंपनीत विलीन!

    19-Oct-2022
Total Views |
gail india
 
 
मुंबई : सरकारी मालकीची पेट्रोलियम कंपनी असणाऱ्या गेल इंडिया मध्ये एका खाजगी पेट्रोलियम कंपनीचे विलनीकरण होणार आहे. भारतातील पेट्रोलियम क्षेत्रासाठी ही एक महत्वाची बातमी आहे. जेबीएफ पेट्रोकेमिकल्सचे गेल इंडियामध्ये विलनीकरण करण्यास जेबीएफच्या गुंतवणूकदारांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता हे विलनीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठीचे लेटर ऑफ इन्टेन्ट या जेबीएफच्या गुंतवणूकदारांनी गेल इंडियाला सादर केले आहे. जेबीएफ पेट्रोकेमिकल्सची दिवाळखोरीची प्रक्रिया २०१६ पासून सुरु आहे. एका सरकारी कंपनीने खासगी कंपनी आपल्यात विलीन करून घेण्याची दुर्मिळ गोष्ट यानिमित्ताने घडत आहे.

जेबीएक कडून जाहीर करण्यात आले आहे की सर्व गुंतवणूकदारांनी जेबीएफच्या विलनीकरणास एकमताने मान्यता दिली आहे. १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. गेल इंडियाची २०१५ कोटींची ऑफर सर्व गुंतवणूकदारांनी मान्य केली आहे. याआधी ओएनजीसी कडून जेबीएफला १७०५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी गेल इंडियाला ऑफरच्या १० टक्के रक्कम किंवा २०० कोटी इतकी रक्कम बँक ग्यारेंटी म्हणून द्यावी लागणार आहे. यानंतरच ही प्रक्रिया सुरु होईल असे कंपनी लवादाने सांगितले आहे. गेल इंडिया ही भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक वायू पुरवठा कंपनी आहे. देशातील सर्व नैसर्गिक वायू पुरवठ्यापैकी ७० टक्के पुरवठा हा गेल इंडिया कडून करण्यात येतो. १९८२ मध्ये स्थापन झालेली जेबीएफ पेट्रोकेमिकल्स ही कंपनी सातत्याने तोट्यात जात होती शेवटी २०१६ मध्ये कंपनीने दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु केली.

  
लेटर ऑफ इंटेन्ट म्हणजे काय ?
 
लेटर ऑफ इंटेन्ट म्हणजे दोन बाजूंकडून आपला व्यवहार सुरु झाल्याची कायदेशीर घोषणा होय. प्रत्येक मोठ्या व्यवहारांच्या आधी दोन्ही बाजूंकडून लेटर ऑफ इंटेन्ट जरी करण्यात येते. त्यामुळे दोन्ही बाजूंना आपले व्यवहार कायदेशीर पद्धतीने होत आहेत याची खात्री मिळते आणि जर हे लेटर दिल्यानंतर व्यवहार रद्द करायचा असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच त्यातून बाहेर पडावे लागते. हे लेटर जारी झाल्यानंतर एका विशिष्ट मुदतीच्या कालावधीत दोन्ही बाजूंना आपला व्यवहार पूर्ण करावा लागतो नाहीतर तरीही हा व्यवहार रद्द होतो.