पावसाळ्यातले ‘पाऊस पडायचे’ दिवस कमी झाले आहेत, पण जेव्हा पडतो तेव्हा सतत काही दिवस मुसळधार पाऊस पडू लागला आहे. या सोबत मान्सूनचा पाऊस अधिक अनियमित देखील झालेला आपण बघतोय.तीव्र पावसाचा मान्सून हंगाम जो पूर्वी दरवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत मर्यादित होता तो आता ऑक्टोबरमध्ये स्पष्टपणे लांबलेला दिसू लागला आहे. तसेच चार महिने संततधार बरसणारा पाऊस हा विखुरलेल्या तीव्र अतिवृष्टीच्या कालखंडत विभागाला गेलेला दिसू लागला आहे. अतिवृष्टी व दुष्काळी घटनांची तीव्रता आणि वारंवारता देखील वाढत चालली आहेत. त्यामुळे आज आपण मान्सूनच्या ’पॅटर्न’मधील बदलाची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
प्रत्यक्षात मान्सूनच्या ’पॅटर्न’मध्ये बदल झाला आहे का? हे आधी पाहूया. मान्सूनचा कालावधी वाढत जात असल्याचे आपण पाहत आहोत. तुम्हाला आठवत असेल, तर मागच्या वर्षीदेखील ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला होता आणि दिल्लीत 100 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला गेला होता. या वर्षाचाही ऑक्टोबर, हा 1956 नंतरचा सर्वात ओला ऑक्टोबर महिना होऊ शकतो. मान्सूनचा कालावधी वाढत जातो आहे, ही गोष्ट आपल्याला काही वर्षांपासून दिसून येत आहे. फक्त मान्सूनचा काळच लांबला आहे, असे नाही तर त्यात काही दिवस भयंकर पाऊस पडतो, मग काही दिवस खूप कोरडे आणि उष्ण जातात आणि नंतर पुन्हा जोरदार पाऊस असा विशेष ’पॅटर्न’ दिसू लागला आहे. त्यामुळे जरी दर महिन्याचा किंव वर्षागणिक पाऊस सरासरीच्या आसपास होत असला, तरी ’डेटा’ बघता, संपूर्ण पाऊस काही दिवसांच्या चमू मध्ये केंद्रित होऊन बरसतो आहे व बाकीचे दिवस उष्ण आणि कोरडे जात आहेत असे दिसून येते. हा पॅटर्न बदलणार्या हवामानाचा हा अत्यंत धोक्याचा संकेत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे व राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राच्या प्रमुख डॉ. के. सतीदेवी यांनी स्पष्ट केले आहे की, कमी कालावधीत तीव्र पावसाच्या घटना, ‘पॅटर्न’मध्ये संपूर्ण बदल दर्शवतात. गेल्या दोन वर्षांच्या डेटा बघता, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतली आहे, असे दिसते. हेच इतिहासाच्या अनुमानानुसार, सामान्यतः एक सप्टेंबरपासून देशाच्या वायव्य भागातून मान्सूनच्या माघारी जाण्याची सुरुवात होते. परंतु, गेल्या काही वर्षाच्या नवीन अनुमानानुसार, ही घटना दि. 17 सप्टेंबरनंतर घडू लागली आहे. तसेच दि. 7 ते 15 जून या कालावधीत पारंपारिकपणे नोंदवलेला मान्सूनचा पूर्ण प्रारंभ देखील पूर्वीपेक्षा बदललेला दिसतो. मान्सूनचे अंदाजे 1 ते 8 तारखेच्या आतच आगमन होते पण, नंतर वारे थांबतात आणि काही काळ पाऊस पडत नाही. या अभ्यासातून कळते की, नवीन तारखांनुसार वायव्य-वारे सुरू होण्यास सुमारे तीन आठवडे उशीर होऊ लागला आहे. या बदलासाठी स्पष्टपणे हवामान बदल अर्थात ’क्लायमेट चेंज’ आणि ’ग्लोबल वॉर्मिंग’ कारणीभूत ठरू शकते हयात वाद नाही. कारण, या प्रकारचे बदल जगाच्या इतर ठिकाणीही दिसू लागले आहेत आणि इतर विविध देशदेखील कमी किवा तीव्र पावसाच्या घटनांमुळे उद्भवणार्या आपत्तींचा सामना करत आहेत.
ऊर्जा आणि संसाधन संस्था, (ढएठख) च्या महासंचालक डॉ. विभादेखील ‘ग्लोबल वॉर्मिंग’ आणि स्थानिक हवामानातील बदल, या गोष्टी ’ट्रेंड’मधील या बदलांना जबाबदार आहेत असे सांगतात. त्यांच्या मते, आपल्याला ठाऊक आहेच की, भारतीय मुख्य भूभागात उन्हाळ्यात दररोजचे तापमान 50 अंशांच्या जवळ सर्रास पोहोचू लागले आहे आणि आपण सगळे हेदेखील जाणतो की, उष्णतेच्या लाटा जास्त काळ टिकणार्या आणि तीव्र झाल्या आहेत. याचाच अर्थ, उन्हाळ्यात हवा जास्त काळ गरम राहू लागली आहे आणि गरम हवेत जास्त पाणी धरायची क्षमता असते. जेव्हा ही गरम हवा, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे, थंड होते, तेव्हा तो संपूर्ण अडकलेला ओलावा, अचानक बाहेर पडतो आणि मुसळधार पाऊस पडू लागतो. हेच वाढलेल्या ढगफुटीच्या घटनांचेदेखील कारण असू शकते. हा पॅटर्न हवामान बदलाशी अर्थात ‘क्लायमेट चेंज’शी निगडित मॉडेल्समध्ये अगदी तंतोतंत बसतो. या मॉडेल्स प्रमाणेदेखील जसेजसे हवामान अधिकाधिक बदलू लागेल, अतिवृष्टीच्या छोट्या कालावधीच्या घटनांसह दुष्काळाच्या दीर्घ कालावधीच्या तीव्र घटना अधिक वारंवार होऊ लागतील. जरा विचार केला, तर जाणवेल की, हेच होण्यास सुरुवातदेखील झालेली आहे. या घटना जगभर होत आहेत. 2022 संपूर्ण पृथ्वीसाठी आजवरच्या इतिहासाच्या नोंदीतला सर्वात तीव्र उन्हाळयांपैकी एक होता. मग ते इराण मध्ये 55 डिग्रीचे तापमान असो किंवा ब्रिटन मधला ‘न भूतो न भविष्यति’ उन्हाळा असो, अनेक सहनशक्तीपलीकडच्या तापमानाच्या घटना जगभरात गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत.
परंतु, आपण हे मान्य केले पाहिजे की, या गोष्टींबद्दल शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञ आपल्याला बर्याच काळापासून सतर्कतेचा इशारा देत होते आणि आता आपण त्याच घटनांचा सामना करत आहोत. त्यामुळे, आपल्याला माहीत नव्हते, असे आता आपण म्हणू शकत नाही. कारण, गेल्या अनेक दशकांपासून आपल्याला या घटना होतील, हे ठाऊक होते. जसजसा वेळ गेला तसतसे शास्त्रज्ञांनी हवामान बदल आणि हवामान आपत्तींचे नाते किती प्रखर आहे, हे अधिक खात्रीने दर्शवले आहे.
आपण ‘ग्रीन हाऊस गॅसेस’ उत्सर्जित करत आहोत, ज्याने पृथ्वीभोवती एक आवरण तयार होत आहे. हे आवरण गरम हवा अडकवून ठेवते, ज्यामुळे पृथ्वी अजून गरम होते आहे. तापमानातील प्रत्येक अंशवाढीमुळे,वातावरणात साठणार्या ओलाव्यात तब्बल सात टक्के वाढ होऊ शकते. किंबहुना यामुळेच,काही दिवसांपूर्वी मुंबईत तीव्र अतिवृष्टी झालेली असू शकते. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे, हवेचा प्रवाह आणि झोतवारा अर्थात ‘जेट स्ट्रीम’देखील बदलते आहे, हे आपण जाणतो.‘जेट स्ट्रीम’, उत्तर व दक्षिण ध्रुवांवरून थंड हवेच्या हालचालींचे नियमन करते आणि अशा प्रकारे उत्तर गोलार्धातील तापमानाचे नियमन करते. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे जेट प्रवाहाचा वेग कमी होत आहे म्हणून पृथ्वीवरील ऋतू अजून उष्ण किंवा अजून ओले किंवा अजून थंड होते आहेत. ’जेट स्ट्रीम’चा वेग कमी झाल्याने वातावरणातील उष्णता प्रभावीपणे जगभरात हलविली जात नाही आहे. यामुळे महासागरातील पाण्याचेदेखील सरासरी तापमान वाढलेले आहे आणि हे वाढीव तापमानदेखील अनियमित आणि अनिश्चित पावसाला कारणीभूत आहे.
शिवाय, आपण हे समजून घेतले पाहिजे की, मान्सून हा भारताच्या अर्थशास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे मान्सूनच्या ‘पॅटर्न’मध्ये आणखी विचलन झाल्यास आपल्या शेतीप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेवर खूप गंभीर व हानिकारक परिणाम होतील. कारण, अनियमित आणि अचानक अतितीव्र पावसाने कृषी उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अनियमित पावसामुळे पेरणी आणि कापणी चक्रात व्यत्यय येतो आणि शेतकर्यांचे अतोनात नुकसान होते. आपल्या कृषीव्यवस्थेसह भारतातील बहुतांश लोकसंख्या पिण्याचे पाणी, वापरासाठी लागणारे पाणी आणि सिंचनाच्या गरजांसाठीदेखील स्थिर व नियमित मान्सूनवर अवलंबून आहे. आनियमित पावसाळा साठवलेल्या पाण्याची पातळीत तसेच भूजल पातळीवरदेखील गंभीर प्रभाव पडतो.
यासंपूर्ण विचारावरून आपण असा निष्कर्ष नक्कीच काढू शकतो की, आपण पाहत असलेल्या मान्सूनच्या ‘पॅटर्न’मध्यले बदल होण्यामागे ’ग्लोबल वॉर्मिंग’ हेच मुख्यत्वे जबाबदार आहे. परंतु, हवामान बदलाच्या या परिस्थितीसाठी आपणच, पृथ्वीवरील सर्वजण जबाबदार आहोत. तरीही या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध आहेत. चालू परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि कमीत कमी ती परिस्थिती अजून वाईट होणार नाही, याची खात्री करण्यासाठी आपण वैयक्तिक, सामाजिक, तसेच सरकारी आणि जागतिक पातळीवर बहुआयामी धोरणाचे पालन करायची नितांत गरज आहे, असे मला वाटते.