
जगनमोहन सरकारमध्ये मुस्लिम लांगुलचालनाचा कळस
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : आंध्र प्रदेशात तबलिगी जमातच्या मुस्लिमांनी कट्टरतावादाच प्रसार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हिंदूबहुल वस्तींमध्ये मशिदी बांधण्याचा ते प्रयत्न करत असून जगनमोहन रेड्डी सरकार त्यांचे लांगुलचालन करत आहे. मात्र, भाजप येथे कट्टरतावाद पसरवू देणार नाही, असा इशारा भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सहप्रभारी सुनील देवधर यांनी दिला आहे.
आंध्र प्रदेशात तबलिगी जमातशी संबंधित मुस्लिम समुदाय कट्टरतावादाचा प्रसार करत असल्याचे पुढे आले आहे. त्याविषयी भाजप नेते सुनील देवधर यांनी रेड्डी सरकारला इशारा दिला आहे. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना ते म्हणाले, आंध्र प्रदेशात गुंटूर येथे पसमांदा मुस्लिमांचा एक जुना दर्गा होता. तो दर्गा पाडून तेथे मोठी मशिद उभारण्याचा प्रयत्न मुस्लिम कट्टरतावाद्यांकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये तबलिगी जमातशी संबंधित मुस्लिम आघाडीवर असून ते गुंटूरमधील स्थानिक मुस्लिमांना भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अशाप्रकारे दर्गा पाडून मंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या हिंदूबहुल भागामध्ये मशिद बांधण्याचा तबलिगींची प्रयत्न भाजप कदापी यशस्वी होऊ देणार नसल्याचे देवधर यांनी म्हटले आहे.
राज्यातील रेड्डी सरकारवरदेखील देवधर यांनी टिका केली. ते म्हणाले, जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने अल्पसंख्यांकांच्या लांगुलचालनाचा कळस गाठला आहे. त्यांच्या सरकारने कट्टरतावाद्यांवर सातत्याने मेहेरनजर केली आहे. विशेष म्हणजे तेलुगू देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडूजदेखील या लांगुलचालनास पाठिंबा देत आहेत. मात्र, अशा धोरणामुळे राज्यातील बहुसंख्य जनतेवर अन्याय होत असून रेड्डी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणानुसार वाटचाल करावी; असा सल्लाही देवधर यांनी यावेळी दिला आहे.
जीनाप्रेमी मुस्लिमांनी पाकिस्तानात जावे
गुंटूर शहरातील एका प्रमुख चौकात असलेल्या टॉवरला मोहंमद अली जीना असे नाव देण्यात आले आहे. त्याविरोधात भाजप अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. त्या टॉवरला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, अशी भाजपची मागणी आहे. त्याचप्रमाणे जर गुंटूरमधील मुस्लिम हे जीनाप्रेमी असतील तर त्यांनी भारत सोडून पाकिस्तानमध्ये जावे, असा घणाघात देवधर यांनी केला आहे.