byju's चे असे का झाले? का आली कर्मचारी कपातीची वेळ? वाचा सविस्तर

    13-Oct-2022
Total Views |
buyju
 
 
 
नवी दिल्ली : अँप आधारीत शिक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या बायजू ( byju's) कंपनी सध्या प्रचंड आर्थिक तोट्याचा सामना करत आहे. या तोट्यावर बायजूने कर्मचारी कपातीची शक्कल लढवली आहे. २०२३ पर्यंत बायजू कंपनीच्या २५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. ही कर्मचारी कपात करून बायजू आपला तोटा कमी करणार आहे. सध्या बायजू कंपनी ४ हजार कोटींहून अधिकच्या तोट्याचा सामना करत आहे. अँप आधारित शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या ऑनलाईन प्लँटफॉर्म्समध्ये बायजूने गेल्या काही वर्षात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. सुरुवातीला फक्त शालेय शिक्षणपुरतेच मर्यादित असलेल्या बायजूने नंतर स्पर्धा परीक्षा, विविध प्रवेश परीक्षा यांचाही समावेश आपल्या अभ्यासक्रमांमध्ये केला होता.
 
 
बायजू काय आहे ? काय काम करते ?
 
२०११ मध्ये स्थापन झालेली बायजू ही एक शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी आहे. स्थापनेनंतर काही वर्षांतच बायजूने आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्थान मिळवले. शालेय शिक्षणाबरोबरच आता स्पर्धा परीक्षा, निरनिराळ्या संस्थांच्या प्रवेश परीक्षा यांचाही समावेश या अँपमध्ये केला गेला. बायजू ही एक अँपद्वारे घरबसल्या शिक्षण देणारी एक संस्था आहे. बायजू याच नावाने त्यांनी एक 'थिंक अँड लर्न' स्टार्टअपदेखील आहे. याच माध्यमातून बायजूने ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात प्रचंड गुंतवणुक केली आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोमध्येही आपल्या व्यवसायास सुरुवात केली आहे.
 
bbbbbbbbbbbb 
बायजू आर्थिक संकटात का सापडली
 
मुळात अशा प्रकारच्या ऑनलाईन शिक्षण देणारी अँप्स ही त्यांच्यात गुंतवणूक करणाऱ्यांच्याच जीवावर चालत असतात. याव्यतिरिक्त मोठे उत्पन्नाचे साधन त्यांच्याकडे नसते. जरी कोरोना काळात या ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली असली तरी त्याचवेळी त्यांच्याकडेयेत असलेला परदेशी गुंतवणुकीचा ओघ मात्र कमीच झाला. कोरोना संकट जसे ओसरले तसे त्याची महागाई, येऊ घातलेली आर्थिक मंदी यांमुळे परत आर्थिक गुंतवणुकीचा ओघ मंदावला. याशिवाय अजून एक कारण म्हणजे पुन्हा एकदा नीट सुरु झालेल्या शिक्षण संस्था. कोरोना काळात तयार झालेला ऑनलाईन शिक्षणाचा फुगा फुटून लोकांची पसंती परत शाळेतील प्रत्यक्ष शिक्षणालाच आहे हे दिसून आले साहजिकच बायजूची ग्राहकसंख्या घटली आणि आता पर्यंत होत असलेल्या नफ्याचे रूपांतर तोट्यात व्हायला लागले.
 
 
आता पुढचे धोरण काय ?
 
सध्या २५०० कर्मचारी कपात करून सध्याचा तोटा कमी करण्याच्या प्रयत्नात बायजू आहे. याच वेळी १० हजार नव्या कर्मचाऱ्यांच्या भरतीचा निर्णय देखील जाहीर केला आहे. पण या कर्मचाऱ्यांची भरती किती काळासाठी असेल? त्यांना कुठल्या सवलती दिल्या जातील ? त्यांचे वेतनमान काय असेल? याबाबत काहीच स्पष्टता सध्या नाही. बायजूच्या सह- संस्थापिका दिव्या गोकुळनाथ यांनी आपल्या निवेदनात आता विपणनावर जास्त खर्च केला जाईल आणि आता जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढविण्याकडे आमचा कल असेल असे जाहीर केले आहे.