व्लादिमीर पुतीन आणि त्यांचा ‘रुसकीय मीर’

Total Views |
रशिया
 
आता रशियन निवडणूक अधिकार्यांनी त्या प्रांतांमध्ये सार्वमत घेतलं. या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर मूळ रशियन नागरिक असल्यामुळे सार्वमताचा कौल अर्थातच आमच्या प्रांताचं रशियात विलिनीकरण करण्यात यावं, असा लागला आहे. हे वेगळं सांगायला नको. म्हणजेच आता रशिया अगदी अधिकृतपणेकायदा-बियदा पाळून ते प्रांत खाणार. अशा प्रकारे झारशाहीतलं किंवा सोव्हिएत काळातलं रशियन साम्राज्य, रशियन जग किंवा ‘रूसकीय मीर’ पुतीन पुन्हा उभं करत आहेत.
 
 
‘रुसकीय मीर’ म्हणजे ‘रशियन जग.’ आपण त्याला ‘बृहत्तर रशिया’ असं म्हणू शकतो. आपल्या भारत देशाच्या अधिकृत सरहद्दींच्या पलीकडे जिथेजिथे भारतीय म्हणजे हिंदू संस्कृतीचा प्रभाव आहे, त्या देशांना ‘बृहत्तर भारत’ म्हणून ओळखलं जातं. आग्नेय आशियातले सर्व देश याचं प्रत्यक्ष उदाहरण आहेत. त्यांचा धर्म इस्लाम आहे, पण त्यांची संस्कृती हिंदू आहे.
असं आहे म्हणून ते देश भारताच्या सत्तेखाली यावेत असं आपल्याला कधीच वाटलेलं नाही.
 
 
वाटणारही नाही. कारण, असं न करणं हीच तर हिंदू संस्कृतीची विशेषतः आहे. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून लंकेचं राज्य हडप केलं नि अयोध्येच्या साम्राज्यात जोडलं असं घडलं नाही. कृष्णाने मथुरेचा राजा कंस, चेदि देशाचा शिशुपाल, मगधाचा जरासंध, प्राग्ज्योतिपूरचा नरक यांना ठार केल्यावर त्यांची राज्य हडप न करता योग्य व्यक्तींना त्यांच्या जागी बसवलं. युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केल्यावर त्यांच्या चारी भावांनी तत्कालीन भारतातील सर्व राज्य जिंकली म्हणजे ती राज्यं खालसा करून आपल्या सत्तेखाली घेतली नाही, तर फक्त त्यांना युधिष्ठिराचं सम्राटपद मान्य करायला लावलं.
 
 
पण, हे पाच नि दहा हजार वर्षांपूर्वीचे रामायण-महाभारतातले दाखले तरी कशाला? अगदी नजीकच्या काळात शिवरायांनी संधी असूनही जावळीच्या मोर्यांची जहागीर हडप करून आपल्या राज्यात जोडली नाही. उलट दिवंगत चंद्ररावाच्या विधवा पत्नीला बहीण मानून तिच्या पसंतीचा मुलगा तिला दत्तक देऊन, नवा चंद्रराव मोरे म्हणून त्याला जावळीच्या जहागिरीवर बसवला.
 
 
पुढे मात्र या नव्या चंद्ररावाने निजामपूरच्या बादशहाशी संगनमत करून, खुद्द शिवरायांनाच शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवरायांना जावळी काबीज करावीच लागली. याचं कारण ‘सर्वे सुखिन: सन्तु’ किंवा व्यावहारिक भाषेत ‘लिव्ह अॅण्ड लेट लिव्ह’ असं हिंदू संस्कृती म्हणते, शिकवते. उलट पश्चिमी संस्कृती किंवा एकंदरच अ-हिंदू संस्कृती म्हणतात, ‘लिव्ह अॅण्ड लेट डाय.’ आम्ही जगू आणि तुम्ही मरा. किंबहुना, तुम्हाला मारून, लुटून, गुलाम करूनच आम्ही जगू. तुमचं रक्त शोषून आम्ही चांगले टमटमीत होऊ.
 
 
नुकताचं रशियन परराष्ट्र धोरण विषयक एक दस्तऐवज क्रेमलिनमधून प्रसिद्ध करण्यात आला. जसं अमेकिन राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान म्हणजे ‘व्हाईट हाऊस’ तसं रशियन राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान म्हणजे ‘क्रेमलिन’ हा झार सम्राटांपासूनचा किल्लेवजा राजवाडा हे आपल्याला माहितचं आहे. या दस्तऐवजात असं म्हंटलं आहे की, ‘रुसकीय मीर’ म्हणजेच रशियन जगात कोणताही हस्तक्षेप करण्यास ‘क्रेमलिन’ सुसज्ज आहे. म्हणजे काय?
 
 
मुसलमानांची एक फार जुनी युक्ती आहे.कोणत्याही क्षेत्रात मग तो देश असो व्यापार असो किंवा अन्य काही, तिथे चंचुप्रवेश करायचा. मग हळूहळू आपली संख्या वाढवत न्यायची, ज्याक्षणी आपली ‘न्यूसन्स व्हॅल्यू’ पुरेशी वाढेल, त्या क्षणी वेगळा देश, वेगळा प्रांत, वेगळा जिल्हा मागायला सुरुवात करायची. साम्यवादी सोव्हिएत हुकूमशहा स्टॅलिन हा मुसलमानांपेक्षाही हुशार होता. साम्यवादी असल्यामुळे तो नास्तिक होता. त्याने रशियातल्या चर्चेस आणि मशिदी दोन्हींवर बुलडोझर फिरवले.
 
 
पण, मुसलमानांची युक्ती त्याने अधिक घासून पुसून वापरली. म्हणजे असं पाहा की, अफाट भूमीचा धनी असलेल्या रशिया या देशाच्या पश्चिमेला एस्टोनिया, लात्विया, माल्डोव्हा, लिथुआनिया, बेलारूस, युक्रेन, जॉर्जिया, आर्मेनिया आणि अझरबैजान हे देश आहेत. अवाढव्य रशिया समोर हे देश चिरफळ्यांएवढे आहेत. त्यातल्या त्यात युक्रेनचा जरा मोठा आहे. तसंच रशियाच्या नैऋत्येला कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिजस्तान आणि ताजिकिस्तान हे देश आहेत. यातला कझाकस्तान बर्यापैकी मोठा आहे. उरलेले चिरफळ्या छापच आहेत.
 
 
आता यातले काही देश झार राज्यांच्या काळापासूनच रशियन साम्राज्यात होते. जे नव्हते त्यांना लेनिन आणि स्टॅलिनने जिंकून साम्राज्यात आणले. म्हणजे बघा, साम्राज्यशाहीला विरोध करणार्यांनी स्वत:चंच साम्राज्य उभारलं
स्वत:ला शोषित आणि वंचित म्हणवणार्या लोकांनी स्वत: सबल बनल्यावर आणि अनिर्बंध सत्ता हातात आल्यावर अन्य दुर्बलांना गुलाम बनवून त्यांचं शोषण करायला सुरुवात केली आणि हे शोषण अमर्याद काळापर्यंत चालू राहावं म्हणून स्टॅलिनने दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या. या सर्व देशांमध्ये रशियन भाषा सक्तीची केली आणि खूप मोठ्या संख्येने रशियन नागरिकांना त्या देशांमध्ये नेऊन वसवलं.
 
 
आता १९९१ साली सोव्हिएत साम्राज्य कोसळलं. हे सर्व देश भराभर स्वतंत्र झाले. तिथे त्यांच्या-त्यांच्या पक्षांची लोकनियुक्त सरकारं अधिकारावर आली. खुद्द रशियात बोरिस येल्त्सिन यांचं लोकनियुक्त सरकार १९९१ ते १९९९ अशी आठ वर्षं सत्तेवर होतं. १९९९ साली त्यांच्या जागी पुतीन आले. या सर्व काळात रशियाची आर्थिक स्थिती एवढी डबघाईला आलेली होती की, हे सगळे देश आणि रशियाच्या इशार्यावर चालणारे रूमेनिया, बल्गेरिया, हंगेरी इत्यादी पूर्व युरोपीय देश यांच्या राजकारणात कोणताही हस्तक्षेप करण्याची ताकदच रशियात उरली नव्हती. पण, या देशांमधले रशियन नागरिक तिथेच होते. ते काही पुन्हा रशियात आले नव्हते. त्यांच्या किमान दोन-तीन पिढ्या त्या देशांमध्ये वाढल्या होत्या. तरी समान भाषेमुळे त्यांना रशियाशीच जवळीक वाढत होती.
 
 
उर्दू भाषेचा गंधही नसलेल्या पूर्व बंगालमधल्या मुसलमानांना पाकिस्तानात जावसं का वाटलं?
तर १९९९ साली सत्तेवर आलेल्या व्लादिमीर पुतीन यांना रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवायचं होतं. त्यांनी शांतपणे आणि ठामपणे आपलं बळ वाढवायला सुरुवात केली. एकेकाळी रशियन साम्राज्यात असलेल्या पण आता स्वतंत्र झालेल्या या सर्व देशांमध्ये मूळ रशियन नागरिक हा त्यांचा खूप महत्त्वाचा मुद्दा होता.
 
 
प्रथम त्यांनी चेचन्या प्रांतातील मुसलमान अतिरेक्यांना साफ चिरडून टाकलं. मग जॉर्जिया देशाशी भांडण उकरून काढून त्याचे दोन प्रांत जिंकले. नंतर बेलारूसशी भांडण करून त्याला त्याच्या दोन प्रांतांना स्वायत्तता देण्यास भाग पाडलं. पण, २०१४ साली त्यांनी मोठीच शिकार केली. युक्रेन देशाचा क्रिमिया हा व्यापारी आणि आरमारीदृष्ट्या फार मोक्याचा असा प्रांत त्यांनी हिसकावून घेतला आणि आता फेब्रुवारीपासून त्यांनी युक्रेनवर सरळ लष्करी आक्रमण आरंभलं आहे. १९९१ साली जेव्हा अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं होतं, तेव्हा इराकी हुकूमशहा सद्दाम हुसैनने गर्जना केली की, आम्ही इंचाइंचावर लढू.
 
 
इराककडे जैव-रासायनिक अतिसंहारक क्षेपणास्त्रं असल्यामुळेही लढाई अमेरिकेला जड जाणार की काय, असं जगभरच्या निरीक्षकांना वाटत होतं, प्रत्यक्षात इराकी राजधानी बगदाद पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. सद्दामची गर्जना ही वल्गना ठरली. रशियासमोर युक्रेनची तीच स्थिती होणार असं वाटत होतं, पण लढाई गेले सात महिने रेंगाळते आहे. युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हे राजकारणात येण्यापूर्वी विनोदी अभिनेते होते. हा नाटक्या माणूस राजकारणात मुरलेल्या पुतीन यांना काय टक्कर देणार, असंच सर्वांना वाटत होतं. पण, झेलेन्स्की ताठ मानेने उभे राहिलेत; त्यांची सेनादलं दाटून उभी राहून झुंजतायत; राजधानी कीएव्ह रशियन विमानदलाच्या बॉम्बफेकीला अजिबात दाद देत नाहीये, असं दृष्य उभं राहिलेलं आहे.
 
  
या आक्रमणामुळे संतापून अमेरिका आणि तिचे दोस्त युरोपीय देश यांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. म्हणजे व्यापार बंद केला आहे. पण, याला उत्तर म्हणून रशियाने अमेरिका-युरोपचा स्वस्त तेलपुरवठाआणि नैसर्गिक वायुपुरवठा बंद केला आहे. या व्यापारबंदीमुळे नेहमीचीच गोची झालीय. अमेरिका अटलांटिक समुद्रापार अलगद सुखरुप आहे आणि युरोपीय देश नि रशिया दोघांचेही प्राण कंठाशी आलेत. रशियन सैन्याला आता हत्यारं आणि लष्करी वाहनांच्या सुट्या भागांचा तुटवडा जाणवू लागलाय. रशियाने आता हा माल चीन आणि उत्तर कोरियासारख्या बदनाम देशांकडून मागवायला सुरुवात केलीय वगैरे. पण, खरं म्हणजे सर्वांना आश्चर्य वाटतंय की, महाप्रचंड रशियासमोर युक्रेन टिकूच कसा शकलाय? रशियन सेना खरंच इतकी दुबळी झालीय का?
 
 
या प्रश्नाचं उत्तर अगोदर मांडलेल्या मुद्द्यांमध्ये आहे. रशियाला मुळी संपूर्ण युक्रेन काबीज करायचाच नाहीये. रशियाने राजधानी कीएव्हवर बॉम्बफेक केली ती, केवळ दबाब निर्माण करण्यााठी. प्रत्यक्षात त्याने युक्रेनच्या पूर्व सरहद्दीवरचे डोनेस्क, खेरसन, लुहान्स्क आणि झापोरिझिया हे प्रांत व्यापले.
 
 
आता रशियन निवडणूक अधिकार्यांनी त्या प्रांतामध्ये सार्वमत घेतलं. या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर मूळ रशियन नागरिक असल्यामुळे सार्वमताचा कौल अर्थातच आमच्या प्रांताचं रशियात विलिनीकरण करण्यात यावं, असा लागला आहे. हे वेगळं सांगायला नको. म्हणजेच आता रशिया अगदी अधिकृतपणेकायदा-बियदा पाळून ते प्रांत खाणार. याबाबत अमेरिका किंवा युरोपीय देश कायदेशीर बोंब मारू शकत नाहीत. अशा प्रकारे झारशाहीतलं किंवा सोव्हिएत काळातलं रशियन साम्राज्य, रशियन जग किंवा ‘रूसकीय मीर’ पुतीन पुन्हा उभं करत आहेत.
 
 
पुतीन यांच्या या लोकशाही साम्राज्यवादाला महत्त्वपूर्ण अशी धार्मिक बाजूही आहे. पुतीन यांचं बालपण अतिशय कडक अशा नास्तिक साम्यवादी राजवटीत गेलं. त्यावेळी सर्वच धर्मांवर तिथे कडक निर्बंध होते. पण, पुतीन यांची आई निष्ठावंत ख्रिश्चन होती आणि तिने त्यांच्यावर धार्मिक संस्कार केले. त्यामुळे पुतीन यांच्या गळ्यात क्रूसवाली साखळी असते, असं म्हणतात. रशियासह संपूर्ण पूर्व युरोपवर ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चचा प्रभाव आहे. पश्चिम युरोपातले रोमन कॅथलिक पंथीय पोप लोक जसे अत्यंत महत्त्वाकांशीहोते नि आहेत तसेच ग्रीक ऑर्थोडॉक्स पंथाचे प्रमुख ज्यांना ‘पेट्रिआर्क’ असं म्हणतात, तेही फार महत्त्वाकांक्षी आहेत. सध्याचा पेट्रिआर्क किरिल किंवा सिरिल हा मॉस्कोतच राहतो.
 
 
त्याचा पुतीन यांच्या ‘रुसकिय मीर’ चळवळीला पूर्ण पाठिंबा आहे. रशियाच्या प्रभावाखाली असलेलं, पण सध्यातरी रशियापासून दूर गेलेलं ‘रशियन जग’ पुन्हा रशियाकडे म्हणजेच ग्रीक ऑर्थोडॉक्सचर्च ऑफ रशियाच्या प्रभावाखाली आलंच पाहिजे, असा या धर्मप्रमुखाचा आग्रह आहे. युक्रेनमध्ये रशियन सेना करीत असलेला रक्तपात वाजवी असून या रक्ताने पापं धुऊन निघत आहेत, असंही त्यांच म्हणणं आहे.
 
 
ही युरोपीय मानसिकता आणि विश्वात सर्वत्र सुख, मांगल्य, कल्याण नांदावे यासाठी राजकारण करणारी हिंदू मानसिकता यांच्यात स्वगर्र् आणि पाताळं इतके अंतर आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.