मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेच्या एकमेवाद्वितीय कारभाराची नोंद नक्की करावी तरी कुठे, असा प्रश्न पडावा, अशी या पक्षाची कामगिरी! एकतर महापालिकेचा कारभार हाकणारी सत्ताधारी शिवसेनेची नेतेमंडळी आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून असलेली प्रशासकीय ‘बाबू माणसं’ हे महापालिकेचे दोन मजबूत खांब समजले जातात, ज्यांच्यावर पालिकेचे म्हणजेच पर्यायाने संपूर्ण मायानगरी मुंबईचे दायित्व आहे. मात्र, महापालिकेच्या कारभारातील बर्याच घडलेल्या घडामोडींचा अभ्यास केल्यास, मुंबई महानगरपालिका नेमकी कुठल्या दिशेने जात आहे आणि त्यांच्या कामाचा प्राध्यान्यक्रम कुठला? याचा अंदाज समजणे कठीण आहे. कोरोना काळात १०० टक्के सेवा देणार्या मुंबई पालिकेतील कर्मचार्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्यांना एकही दिवस पगारी सुट्टी दिली जात नाही. या निर्णयाचा फटका काही कर्मचार्यांना नुकताच बसला. काही कर्मचार्यांचे तब्बल सात दिवसांचे वेतन हे केवळ कोरोना काळात काम न केल्यामुळे कापण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये महापालिका कर्मचार्यांना १७ दिवसांची पगारी सुट्टी देण्याची व्यवस्था होती. मात्र, तो निर्णय आता नक्की का बदलण्यात आला, याचे उत्तर ना शिवसेनेकडे आहे ना प्रशासनाकडे! कोरोना विषाणू आणि त्याच्याबाबत निर्माण झालेल्या अनेकविध गैरसमजांमुळे अनेक अधिकारी आणि सरकारी मंडळी महामारीच्या काळात सेवा बजावण्यात कुचराई करीत होती. मात्र, त्यावेळी धीरोदात्तपणे कुठलीही शंका मनात न बाळगता आणि स्वतः सोबतच कुटुंबाचा विचार न करता, काही मंडळी देशसेवेसाठी रणांगणात उतरली. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्याऐवजी, त्यांच्या पाठीवर थाप देण्याऐवजी महापालिका उफराटा कारभार हाकत आहे. या काळात काम करणार्या आरोग्यदूतांचा सन्मान करण्याऐवजी त्यांचे वेतन कापण्याची अवदसा या पालिका प्रशासनाला सुचली, हेच मुळात अनाकलनीय आहे. त्यामुळे आरोग्यसेवेचा सन्मान पगार कपातीच्या रूपात केला जाणार असेल, तर मुंबई महापालिकेचे कौतुक करावे कुठल्या शब्दांत, हाच प्रश्न आता उपस्थित होतो.
नामकरणावरुन राजकारण
सततच्या राजकीय घडामोडी आणि चर्चांमुळे केंद्रस्थानी राहणारे मुंबईचे राजकीय वर्तुळ नुकतेच पुन्हा एकदा नव्या वादामुळे ढवळून निघाले. राणीच्या बागेतील प्राण्यांच्या नामकरणाचा सोहळा नुकताच पार पडला. मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या अतिआक्रमक नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्राण्यांची नावे जाहीर केली. मोठ्या थाटामाटात हा सोहळा पारही पडला. याच नामकरण सोहळ्यावरून आता शिवसेना आणि महापालिका प्रशासनाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. प्राण्यांची ठेवण्यात आलेली नावे आणि त्यावर झालेली टीकाटिप्पणी महापौरांना कुठे तरी खटकली आणि त्यांनी आपल्या नेहमीच्या ‘शिवसेना स्टाईल’मध्ये विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. आपल्या काही लाडक्या माध्यमांना हाताशी धरून आणि शिवसेनेच्या काही नेत्यांप्रमाणे सलग पत्रकार परिषदा घेत विरोधी पक्षावर तसेही टीका करण्याची एकही संधी सोडण्यास महापौर तयार नाहीत. पण, मुळात प्राण्यांचे नामकरण हा काही वादाचा मुद्दाच असू शकत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने अथवा त्या पक्षाच्या नेत्याने असल्या विषयांना किती महत्त्व द्यावे, हाच मुळात प्रश्न आहे. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात चर्चा, वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी इतर मूलभूत प्रश्नच शिल्लक राहिले नाहीत का? नामकरणासारख्या विषयांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी इतका रस घ्यावा का? मुंबईतील बर्याच विषयांत त्यांनी रस घ्यावा, चर्चासत्रे भरवावीत, असे असंख्य विषय आजही अनुत्तरीतच आहेत. मराठी शाळांचा मुद्दा, शिक्षकांच्या नियुक्ती अन् वेतनाचा प्रश्न, अनधिकृत बांधकामांनी शहराला घातलेला विळखा, अग्निसुरक्षेच्या संदर्भात सतत घडणार्या अपघात आणि घडामोडी... असे एक ना अनेक मुद्दे आहेत, जे प्रकर्षाने चर्चेला घेऊन सोडविण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. मात्र, दुर्दैवाने अशा कुठल्याही मुद्द्यांवर ना महापौर बोलायला तयार आहेत ना इतर नेते त्यांच्यासोबत याबाबत ‘सामना’ करण्याचे धारिष्ट्य दाखवत आहेत. त्यामुळे आता प्राण्यांच्या नामकरणावरुनही राजकारण करण्यापेक्षा आपल्या शहरासमोर नेमक्या कोणत्या समस्या आहेत, कोणती आव्हाने आहेत, त्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येतील यांसारख्या मुद्द्यांकडे महापौरांसह विरोधकांनी लक्ष घातले तर मुंबईकर नक्कीच त्यांचे आभार मानतील!