मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भारतीय वनसर्वेक्षण अहवाल, २०२१ नुसार राज्यातील वनक्षेत्रात वाढ झाली असली, तरी कोकणातील वनक्षेत्र ( konkan forest ) मात्र घटले आहे. खास करुन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्रात झालेली घट अहवालामधून निदर्शनास आली आहे. तर रायगड जिल्ह्यातील वनक्षेत्रात भरघोस वाढ झाली आहे. ( konkan forest )
नुकताच देशाचा वनसर्वेक्षण अहवाल प्रकाशित झाला. गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय वनाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या 'भारतीय वन सर्वेक्षण' विभागाकडून या संदर्भातील काम करण्यात येते. हा विभाग दर दोन वर्षांनी भारतातील वनांचे राज्यानुरुप सर्वेक्षण करुन त्याबाबतचा अहवाल प्रकाशित करतो. २०२१ च्या अहवालानुसार राज्यातील वनक्षेत्रात २० चौ.किमी क्षेत्राची वाढ झाली. परंतु, कोकणातील दोन जिल्ह्यातील वनक्षेत्रात कमालीची घट झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. अहवालानुसार २०१९ च्या तुलनेत रत्नागिरीचे वनक्षेत्र ०.९६ चौ.किमीने आणि सिंधुदुर्गचे वनक्षेत्र ४.३० चौ.किमीने घटले आहे. ( konkan forest )
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कांदळवन क्षेत्रामधील घटही वनसर्वेक्षण अहवालामधून समोर आली आहे. सिंधुदुर्गचे कांदळवन क्षेत्र ०.९८ चौ.किमीने घट झाली आहे. उलटपक्षी रायगड जिल्ह्यातील वन आणि कांदळवन क्षेत्रात मात्र कमालीची वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यामधील दोन्ही वन परिसंस्थांमधील वाढ ही अनुक्रमे राज्यात दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावर आहे. रायगडच्या वनक्षेत्रात २०१९ सालच्या तुलनेत ११.५५ चौ.किमीची वाढ झाली आहे. ही वाढ राज्यातील जिल्ह्यानुरुप दुसऱ्या क्रमाकांची वाढ असून अहमदनगर जिल्ह्यातील वनक्षेत्रात १२ चौ.किमीची वाढ झाली आहे. तर कांदळवन क्षेत्रातील वाढीमध्ये रायगड किनारी जिल्ह्यांमध्ये पहिल्या क्रमाकांवर आहे. या जिल्ह्यातील कांदळवनामध्ये ६.०२ चौ.किमीची वाढ झाली आहे. ( konkan forest )