अंबरनाथ तालुक्यातील उंबार्ली या गावातील डॉ. प्रा. सुरेश मढवी यांनी ‘ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी केली, त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला होता. मढवी यांनी ‘आगरी समाज’ या विषयाचीच निवड का केली, ते जाणून घेऊया.
सुरेश मढवी यांचे संपूर्ण बालपण उंबार्ली या गावात गेले. त्यांचे शालेय शिक्षण काटई येथील सखाराम शेठ विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी बिर्ला महाविद्यालयातून केले. ‘अर्थशास्त्र’ या विषयातून त्यांनी पदवी घेतली. पदव्युत्तर पदवी पुणे विद्यापीठातून संपादित केली. बी.एड् एनएसएस महाविद्यालय, ताडदेव, मुंबई येथून केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून पीएच.डी केली. त्यासाठी ‘ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास’ हा विषय घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नोकरी करण्याचा निश्चय केला. १९९८ पासून ते के. एम. अग्रवाल महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विषय शिकवत आहेत. सुरेश यांना दोन दिवसांत एका मागोमाग एक अशा दोन ठिकाणी नोकरीच्या संधी चालून आल्या होत्या. एक संधी के. एम. अग्रवाल महाविद्यालयातील होती, तर दुसरी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयाची होती. पण पहिल्यांदा के. एम. अग्रवाल महाविद्यालयातून त्यांना नोकरी मिळाल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी पहिली संधी ज्यांनी दिली त्यांची नोकरी स्वीकारायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी के. एम. अग्रवाल महाविद्यालयाची नोकरी स्वीकारली.
सुरेश शिक्षण घेत होते. त्यामुळे आईला अभिमान वाटत होता. आमच्या कुटुंबात अनेक जण उपचाराला पैसे नसल्याने मृत्युमुखी पडले आहेत. उपचाराला पैसे नाहीत, एवढेही कुटुंब आपले मागासलेले असू नये, असे त्यांना वाटत होते. सुरेश दहावीला प्रथम नापास झाले होते. आत्महत्येचा विचार त्यांच्या मनात आला होता. पण तो विचार मागे घेऊन त्यानंतर त्यांनी शिक्षणाचे वेड स्वत:ला लावून घेतले.शिक्षणात जसेजसे ते प्रगती करीत होते, त्या त्या वेळी गावाने त्यांचा सत्कार केला. त्या सत्कारामुळे प्रेरणा मिळत गेली. त्यांना ३२०० रुपये वेतन असलेली पहिली नोकरी मिळाली. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेन, असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला होता. त्यांची कौटुंबिक परिस्थिती खूप हलाखीची होती. त्यांच्या आईने डोंबिवली स्थानकाजवळ भाजी विकून मुलांना शिक्षण दिले. त्यातूनच कुठेतरी काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यातूनच आता आपण घडलो असल्याची प्रांजळ कबुली डॉ. सुरेश मढवी देतात.
डॉ. सुरेश हे चौथीपासून काम करून शिक्षण घेत होते. सुरुवातीला आईला भाजी विकण्यासाठी ते मदत करीत होते. त्यानंतर दादर आणि पुण्यावरून भाजी आणून ते विकत होते. त्यांच्या वडिलांचे १९८२ मध्ये निधन झाले. त्यांचे वडील शेती करत. त्यांची दोन एकर जमीन होती. त्यामध्ये भात पीक घेत. सुरेश मढवी सांगतात, “शेतीतून तुटपुंजे पीक येत होते. कुटुंबाला ते पुरेसे पडत नव्हते. पीक येईलच याचीही शाश्वती नव्हती. आई कशीबशी कमाई करायची, ते पुरत नव्हते. आमचे कुटुंब म्हणजे कर्जाच्या सापळ्यात अडकलेले कुटुंब होते. एक कर्ज फेडण्यासाठी आई पुन्हा दुसरे कर्ज काढत होती. त्यामुळे आमच्या कुटुंबाने कायम संघर्ष केला आहे. आमच्या कुटुंबाची जी अवस्था होती, तशी अवस्था ७५ टक्के कुटुंबांची आहे. अजून ते आर्थिक दुरवस्थेत आहे. मुंबईच्या नजीक आमची गावे आहे, पण ही गावे आर्थिक विकासापासून पूर्णतः वंचित आहेत. त्याचे कारण आमचा समाज शिकलेला नाही. साधारणत: १९६० पासून हा समाज थोडाफार शिक्षण घेऊ लागला आहे. शिक्षण नसल्याने त्यांच्याकडे नोकरी नाही. केवळ पाच ते सहा टक्के लोक नोकरी करतात. इतर सर्वजण छोटेमोठे व्यवसाय करतात. त्यामुळे आर्थिक दुरवस्थेत समाज आहे. समाजाला आपण का मागासलेले आहोत, हेही समजत नाही. आगरी समाज खर्चिक आहे. सण-उत्सव धूमधडाक्यात साजरे करणे, लग्नसमारंभ मोठ्या उत्साहात करणे, हे या समाजाचे वैशिष्ट्य! समाज सतत कर्जाच्या सापळ्यात जात आहे. काही समाजातील लोकांच्या जागा विकासकांकडे गेल्या आहेत, पण त्या पैशांचा उपयोग कसा करायचा, याची त्यांना जाणीव नाही. समाज शिकला पाहिजे. समाजाचे आपण देणे लागतो. त्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे वाटत होते. समाजाची आर्थिक प्रगती झाली पाहिजे, या विचाराने समाजावर काहीतरी लिखाण करावे असे वाटले. आगरी समाजात फार लिखाण झाले नाही.
आतापर्यंत ५० ते ६० पुस्तके बाजारात असतील. एवढी कमी ग्रंथसंपदा बाजारात आहे. समाजाला भाषा शुद्ध बोलता येत नाही. त्यामुळे व्यवसायात प्रगती होत नाही. लिखाणाच्या दृष्टिकोनातून परिणामकारक काहीतरी करावे. मुंबईच्या जवळ असलेला आमचा समाज आहे. मुंबईची ओळख सगळ्यांना आहे. पण समाजाविषयी कोणाला माहिती नाही. आपला समाज प्रकाशझोतात यावा. आर्थिकदृष्ट्या कसा मागासलेला आहे, हे लक्षात यावे. समाजाने आर्थिक प्रगतीसाठी काय करावे, या सर्व गोष्टी संशोधनाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न मी केला,” असे डॉ. सुरेश मढवी सांगतात. डॉ. सुरेश मढवी पुढे सांगतात की, “आमचा आगरी समाज देवभाबडा आहे. देवाला घाबरून राहणारा आहे. देवाच्या कार्यासाठी खर्च करणारा आमचा समाज आहे. प्रत्येक गोष्टीचा संबंध देवाशी जोडतो. देवाप्रति श्रद्धा असावी, पण त्याला घाबरून राहणे योग्य नाही. कामामध्ये देवाला शोधा, असा सल्लाही मी आमच्या समाजाला देत असतो.” डॉ. सुरेश मढवी यांचा समाजात अर्थसाक्षरता करायचा मानस आहे. “समाज सुधारला, तर राष्ट्र सुधारेल. राष्ट्रीय पातळीवर काम करणे आपल्याला शक्य नाही. छोट्याशा आयुष्यात समाजात आर्थिक साक्षरता कशी निर्माण करता येईल, ते पाहणार आहे. आमच्या समाजात बचत करण्याची प्रवृत्ती निर्माण करणार आहे. त्यासाठी कुटुंबापासून सुरुवात करीत आहे. पुढे समाजातही अर्थसाक्षरता करणार आहे,” असे ते सांगतात. आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या भूमिपुत्राला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!