नवी दिल्ली : “भारतीय युवकांमधील उद्योजकता, नवोन्मेष, नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याची क्षमता आज वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. ही परिस्थिती जागतिक भागीदारांनाही नवी ऊर्जा देणारी आहे. त्यामुळे आज संपूर्ण जगासाठी भारतात गुंतवणूक करण्यासाठी अतिशय योग्य काळ आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’ला ‘ऑनलाईन’ पद्धतीने संबोधित करताना केले. “भारत आता ‘आत्मनिर्भरते’च्या मार्गावर वाटचाल करीत आहे. ती करताना केवळ प्रक्रियांना सुलभ करण्यावर भर नसून गुंतवणूक आणि उत्पादनास प्रोत्साहन देण्याचेही भारताचे धोरण आहे. त्यामुळे आज भारताने १४ महत्त्वाच्या क्षेत्रांमधील गुंतवणूक आणि उत्पादन वाढविण्यासाठी २६ अब्ज डॉलर रूपयांची ‘प्रॉडक्शन बेस्ड् इन्सेन्टिव्ह’ योजना लागू केली आहे. भारतातील तरुण पिढीची उद्योजकता आज नव्या उंची वर पोहोचली आहे. भारतीयांमधील नवोन्मेष, नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याची क्षमता आणि उद्योजकतेचे कौशल जागतिक भागिदारांना नवी ऊर्जा देणारे ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगासाठी भारतात गुंतवणूक कऱण्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत आता वर्तमानासोबतच पुढील २५ वर्षांची उद्दिष्टे पुढे ठेवून धोरणे आखत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “आगामी काळासाठी भारताने अर्थव्यवस्था वाढ, नागरिकांचे कल्याण आणि त्यांच्यासाठी निरोगी आरोग्य अशी लक्ष्ये ठेवली आहेत. भारताच्या वाढीचा हा कालखंड पर्यावरणपूरक असेल, याची जगाला भारत खात्री देत आहे. जागतिक व्यवस्थेमध्ये आज मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे जागतिक कुटुंब म्हणून आपल्यासमोरच्या आव्हानांचा सामना सामूहिकरित्या करण्याची गरज आहे. पुरवठा साखळीतील व्यत्यय, महागाई आणि हवामानबदल ही त्यातील प्रमुख आव्हाने आहेत. ‘क्रिप्टोकरन्सी’चाही त्यामध्ये समावेश होतो. यांचा सामना करण्यासाठी कोणत्याही एकाच देशाने निर्णय घेणे अयोग्य आहे. त्यामुळे जागतिक आव्हानांचा विचार करताना एकवाक्यता असणे गरजेचे आहे,” असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.
सुधारणा करण्यावर भर देणे, ही प्रत्येक लोकशाही देशाची जबाबदारी
“विद्यमान जागतिक परिस्थिती पाहता, नवीन जागतिक व्यवस्था आणि नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बहुपक्षीय संघटना तयार आहेत का; हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, या संस्थांची स्थापना झाली, त्यावेळची जागतिक परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी या संस्था सक्षम होतील, यासाठी त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यावर भर देणे, ही प्रत्येक लोकशाही देशाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.