'शिवसेनेसारख्या राज्यकर्त्यांची शरम वाटते'

भायखळ्यातील अग्नितांडवावर प्रवीण दरेकरांची संतप्त प्रतिक्रिया

    18-Jan-2022   
Total Views | 171
 
pravin darekar
 
 
 
मुंबई : भायखळ्यातील मुस्तफा बाग परिसरातील 'ग्लोरिया गर्ल्स कॉन्व्हेंट स्कुल' आवारात झालेल्या अग्नितांडवाला आठवडा उलटला. या प्रकरणी अद्यापही कुठलीही ठोस कारवाई महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली नसून अनधिकृत बांधकामांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि पालकांनी केला आहे. दरम्यान मंगळवार दि. १७ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी दरेकर यांनी शाळेच्या आवारात लागलेली आग, शाळेच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि या सर्व प्रकरणावर महापालिकेची भूमिका या संपूर्ण विषयावर प्रविण दरेकर यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधला.
 
 
अग्नितांडवाच्या घटनेला आठ दिवस पूर्ण दिवस झाले आहेत ? त्या पार्श्वभूमीवर या प्रकाराकडे कसे पाहता ?
'खरं सांगायचं तर मला मुंबईवर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांची शरम वाटते. एकीकडे पेंग्विनचे लाड पुरविण्यात आणि त्यांच्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात ही मंडळी व्यस्त आहेत. परंतु या शाळेत शिकणाऱ्या गोरगरिबांच्या २००० मुलींकडे आणि त्यांच्या दुःखाकडे लक्ष द्यायला सत्ताधाऱ्यांना वेळा नाही हे दुर्दैवी आहे. या शाळेपासून हाकेच्या अंतरावरच मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान आहे, मात्र त्यांना या पीडितांच्या दुःखाकडे पाहण्यासाठी अश्रू पुसण्यासाठी वेळ नाही. मागील आठ दिवसांपासून शाळा अंधारात आहे, मोठ्या दुरवस्थेला शाळेला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे मात्र ज्या वखारींमुळे या ठिकाणी आग लागते, त्या वखारी अवघ्या काही तासांमध्ये पुन्हा नव्याने उभ्या राहतात. त्यांना सर्व सुविधा पुरविल्या जातात, त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी नक्की पाठीशी कुणाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत ? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. जी शाळा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात काम करत आहे, त्या शाळेच्या संदर्भात इतका मोठा प्रकार घडून गेल्यानंतरही भायखळ्याच्या स्थानिक आमदार, महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव ही सर्व मंडळी अनधिकृत वखारी आणि गोदामांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात पीडितांना न्याय देण्याचे आम्ही काम करून त्या संस्थेला उभारी कशी देता येईल या साठी आम्ही प्रयत्नशील राहू. घटना घडून गेल्यानंतरही या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाटी यावी असा आमचा आग्रह आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश करून स्थानिकां न्याय देण्यासाठी आम्हची प्रयत्नशील राहू.'
 
 
 
आग लागल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये सर्व गोदामे पुन्हा उभारली गेली ? हे कुणाच्या आशीर्वादाने शक्य झाले ?
'शाळेच्या इमारतीपासून अगदी हाकेच्या अंतरावर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, त्यांच्या पत्नी आणि आमदार यामिनी जाधव, महापौर किशोरी पेडणेकर ही सर्व सत्ताधारी मंडळी या परिसरात राहतात. आगीची चौकशी आणि आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता होण्याची आणि त्यातून सत्य बाहेर पडण्याची वाट पाहणे आवश्यक होते. एकीकडे सर्व आवश्यक त्या बाबी पूर्ण होण्यापूर्वी तात्काळ ती सर्व गोदामे आणि वखारी तिथे नव्याने उभारतात आणि दुसरीकडे विद्यादानाचे पवित्र काम करणाऱ्या शाळेला मात्र अंधकाराचा सामना करावा लागतो. याचा महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मुंबईकरांच्या जीवाशी खेळते आहे, असाच होतो. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी पुन्हा एकदा समोर आली आहे.'
 
 
 
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी गोदामांच्या पुनर्बांधणीला थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आदेश देईपर्यंत ते काम पूर्ण झाले होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने केलेली कारवाई दिखाव्यापुरती आहे असे तुम्हाला वाटते का ?
'अगदी बरोबर आहे. पालिकेने केलेली कारवाई ही शंभर टक्के दिखाव्यापुरतीच होती. मुळात त्या गोदामांना बांधकाम सुरु करण्यासाठी मदत करायची, ते बांधकाम कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ द्यायचे, त्यांना न्यायालयात जाण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यायची आणि हे सर्व झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि जनतेच्या रोषाला लक्षात घेऊन त्या कामाला स्थगिती देण्याचे नाटक करायचे. शिवसेनेने जनतेला दुधखुळे आणि समजू नये. जनतेला सर्व गोष्टी समजतात. शिवसेनेच्या आशीर्वादानेच या ठिकाणी अनधिकृत बांधकामे होतायत आणि तुमचे पालक आणि विद्यार्थ्यांकडॆ दुर्लक्ष होत आहे हे सर्व मुंबईकर जनतेला समजले आहे. तुमच्या करणी आणि कथनीतील फरक जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे. जनतेच्या रेट्यामुळेच पालिका प्रशासनातर्फे हा कारवाईचा दिखावा करण्यात आला आहे.'
 
 
 
'दै. मुंबई तरुण भारतने प्रकर्षाने हा मुद्दा लावून धरला होता आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. आता या प्रकरणावर भाजपची पुढची भूमिका काय ?
'मुंबईतील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि त्यांच्या भवितव्याशी निगडित असलेला हा विषय अतिशय परखडपणे मांडल्याबद्दल मी सर्वप्रथम 'दै. मुंबई तरुण भारत'चे मनःपूर्वक अभिनंदन करतो. 'दै. मुंबई तरुण भारत'ने मुंबई महापालिकेचा कारभार आणि त्यांची व्यवस्था कशाप्रकारे काम करते हे आपण जनतेच्या समक्ष मांडले. त्यासोबतच मी इतर प्रसारमाध्यमांना विनंती करतो की त्यांनी अशाचप्रकारे या विषयाकडे लक्ष द्यावे. भाजप पूर्णपणे तडीस घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. पालकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि अनधिकृत गोष्टींना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.'
 
 
 
'उर्दू भाषा केंद्राबाबत सेनेची मनमानी चालणार नाही'
'केवळ काही घटकांच्या तुष्टीकरणासाठी, लांगूलचालनासाठी जर शिवसेना हे उर्दू भाषा भवन उभारत असेल तर त्यावरती आम्ही काहीही बोलणार नाही. मात्र अशा प्रकारे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या या जागेवर विकासाच्या नावाखाली जर उर्दू भाषा शिक्षण केंद्राची उभारणी केली जात असेल शिवसेनेची ही मनमानी भाजप अजिबात खपवून घेणार नाही. एकीकडे मराठीच्या नावाखाली मुंबईकरांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे उद्योग करायचे आणि दुसरीकडे तुष्टीकरणाच्या नावाखाली असे प्रकार सुरु करायचे हे आम्ही सहन करणार नाही. देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संपूर्ण भाजप, विहिंप आणि आम्ही सर्व स्थितीत स्थानिकांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत.'
 
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121