मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आता संयुक्त अरब अमिरात आणि दुबईवरुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी लावण्यात आलेल्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरात आणि दुबईमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता सात दिवसीय गृह विलगीकरण आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्याची आवश्यकता नाही. मुंबई महापालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी बनविण्यात आलेल्या नव्या सूचना सोमवार, दि. १७ जानेवारीपासून लागू करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिका प्रशासनातर्फे नुकतीच या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
महापालिकेने म्हटले आहे की, 'मुंबईमध्ये संयुक्त अरब अमिरातसह दुबईहून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता सक्तीने सात दिवसाच्या गृह विलगीकरणाचे आणि आरटीपीसीआर चाचणी करण्याचे कुठलेही बंधन ठेवण्यात आलेले नाही.' बुधवार, दि. २९ डिसेंबर रोजी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे दुबईसह यूएईमधून आलेल्या प्रवाशांना मुंबईत आल्यानंतर सात दिवसीय गृह विलगीकरण आणि आरटीपीसीआर चाचण्या करणे अनिवार्य करण्यात आले होते.