सांगली - कृष्णा नदीच्या पात्रात पाणमांजरांचे दुर्मीळ दर्शन; याठिकाणी आहे अधिवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2022   
Total Views |
otter
(छायाचित्र - डाॅ. अनिरुद्ध पाटील, सुजित चोपडे))



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सांगलीतील अंकलखोप हाळभाग येथील कृष्णा नदीच्या पात्रात पाणमांजरांचे ( otter ) दुर्मीळ दर्शन झाले आहे. स्थानिक वन्यजीव प्रेमींनी या पाणमांजरांची छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. मगरींच्या अधिवासाकरिता प्रसिद्ध असणाऱ्या कृष्णा नदीच्या खोऱ्यात पाणमांजरांचे ( otter ) दर्शन झाल्याने तेथील जैवविविधता अधोरेखित झाली आहे.

 
कृष्णा नदीचे पात्र ते मगरींच्या अधिवासाकरिता प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या नदीच्या खोऱ्यात वेगळ्याच पाहुण्याचे आगमन झाले आहे. हा पाहुणा आहे पाणमांजर ( otter ). १५ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास अंकलखोप हाळभाग येेथे आपल्या शेतात डॉ.अनिरुध्द पाटील हे काम करत होते. त्यावेळी त्यांना नदी काठावर हालचाल जाणवली आणि पाणमांजर ( otter ) सदृश्य प्राणी दिसला. त्यांनी लागलीच वन्यजीव प्रेमी सुजित चोपडे यांना बोलवून उत्सुकता म्हणून त्या प्राण्याची खात्री केली. सोबत असलेल्या कॅमेरा मध्ये त्याचे फोटो घेतले. फोटो पाहिल्यानंतर हा प्राणी पाणमांजर ( otter ) असल्याचे निश्चित झाले.
 
 
या पाणमांजरांसंबधीची माहिती आम्ही वन विभागाला दिली असून या परिसरात कॅमेरा ट्रॅप बसवण्यासंदर्भात त्यांच्याकडे विचारणा केल्याची माहिती डाॅ. पाटील यांनी दिली. तसेच या पाणमांजरांच्या विष्टेचे नमुने गोळा केल्याचे त्यांनी सांगितले. 'वाईल्ड लाईफ रेस्कूअर्स कम्यूनिटी' या संस्थेमध्ये डाॅ. पाटील आणि चोपडे कार्यरत आहेत. यापूर्वी ७ जानेवारी रोजी डिग्रज बंधाऱ्यावर काम करणारे वनमजूर इकबाल पठाण आणि ढवळे यांना देखील नदीच्या काठावर फिरणारी पाणमांजरे ( otter ) दिसली होती. या परिसरातील शेतकऱ्यांच्या मते, गेले काही दिवस हे प्राणी या परिसरात दिसत आहेत आणि गेल्यावर्षी ही थोडे दिवस याठिकाणी ते आढळल्याची माहिती त्यांनी दिल्याचे सांगलीचे मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील म्हणाले.

 
पाणमांजरांविषयी...
  
पाणमांजराला ( otter ) इंग्लिश नाव 'ऑटर' आहे. तो मस्टॅलिडे (mustelidae) कुळात मोडतो. याचा मार्जार कुळाशी थेट संबंध नाही. गुळगुळीत कातडीचे पाणमांजर सर्वांत मोठे असून त्याचे वजन ७ –११ किग्रॅ. आणि लांबी १-१·३ मी. असते. शेपूट सु. ४५ सेंमी. लांब असते. पाठीवरील केस तोकडे व मऊ असतात. रंग पिवळट तपकिरी असून पोटाकडे तो फिकट करडा असतो. त्याच्या मुस्कटावर केस नसतात. शरीर लांब व निमुळते असते. पायांचे पंजे बळकट असतात आणि बोटांना नख्या असतात. बोटे अपुऱ्या पडद्यांनी जोडलेली असून त्यांचा उपयोग सफाईदारपणे पोहण्यासाठी होतो. विशिष्ट स्नायूंच्या साहाय्याने नाक आणि कान बंद करून ते पाण्यात बुडी मारून भक्ष्य शोधते. पाण्यात बुडी मारल्यानंतर ते ३-४ मिनिटे पाण्याखाली राहू शकते. त्याला शिट्टी मारल्यासारखा आवाज काढता येतो. भरपूर पाणी आणि जवळ लपण्याजोगी जागा असणारी सरोवरे, तलाव, नद्या, कालवे, दलदलीच्या जागा, खारफुटीची वने आणि दगडांच्या राशी असलेले नदीकिनारे या ठिकाणी पाणमांजरांच्या वसाहती असतात. नर, मादी व पिले एकत्र वावरतात. शेपटीच्या बुडाशी असलेल्या ग्रंथीतून विशिष्ट गंध सोडून ते त्यांच्या अधिवासाच्या टापूची मालकी प्रस्थापित करतात.
 
 
 
मासे हे पाणमांजराचे मुख्य अन्न आहे. याखेरीज उंदीर, पाणसाप, बेडूक तसेच छोटे पक्षीही ते खाते. पाणमांजरे बऱ्याचदा गटाने माशांच्या थव्याचा पाठलाग करून त्यांना पकडतात. त्यांच्या विणीचा हंगाम सप्टेंबर–फेब्रुवारी महिन्यांत असतो. या हंगामात ते एका जागी स्थिरावतात व तात्पुरती घरे करतात. गर्भधारणेचा काळ ६१–६५ दिवसांचा असतो. मादी एका वेळी २–५ पिलांना जन्म देते. नर आयुष्यभर मादीशी एकनिष्ठ असतो. पिले दोन महिन्यानंतर स्वतंत्रपणे पोहू शकतात. एका वर्षानंतर ती स्वतंत्रपणे राहू लागतात. पाणमांजराचे आयु:काल सु. ४–१० वर्षे असते. मगर हा पाणमांजराचा नैसर्गिक शत्रू आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@