संघर्ष सैनिक आणि संस्कृतीचा शिलेदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2022   
Total Views |

Gulab Vaze
 
 
समाजहितासाठीच्या संघर्षात अग्रेसर आणि साहित्य, संस्कृतीच्या संवर्धनासाठी सर्वस्वी झटणारे ‘संघर्ष समिती’चे पदाधिकारी आणि ‘आगरी युथ फोरम’चे अध्यक्ष गुलाब वझे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...

 
गुलाब वझे यांचा जन्म डोंबिवलीतील मानपाडा येथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण प्रारंभी जिल्हा परिषदेच्या शाळेतून आणि नंतर यशवंत विद्यालयातून पूर्ण केले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पेंढारकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. गुलाब वझे १९८८च्या दरम्यान पेंढारकर महाविद्यालयात ‘जीएस’ (जनरल सेके्रटरी) म्हणूनही कार्यरत होते. त्यातूनच त्यांच्यात समाजकारणाचे बीज रोवले गेले. गुलाब वझे यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीची वाट न धरता आपला स्वत:चा व्यवसायच करायचा, हे मनोमन पक्के केले होते. पण, कुठलाही व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेण्यापूर्वी कायद्याचे किमान प्राथमिक ज्ञान असले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. म्हणूनच मग त्यांनी न्यू रुपारेल महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांच्या मते, कायद्याचा अभ्यास केल्याने त्याचा व्यवसायात निश्चितच चांगला फायदा होतो.
 
 
 
१९९४ साली ‘प्लास्टिक युनिट’चा शुभारंभ करुन गुलाब वझे यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. वझे यांच्याकडे जी जागा उपलब्ध होती, त्याच जागेत त्यांनी हे युनिट सुरू केले. ते ‘प्लास्टिक युनिट’ आता बंद झाले आहे. पुढे १९९४च्या दरम्यान गुलाब हे कल्याण-डोंबिवलीमधील ‘२७ गाव संघर्ष संरक्षण हक्क समिती’मध्ये सहभागी झाले. त्यावेळी कडोंमपा हद्दीत २७ गावांचा लढा सुरू होता. त्या २७ गावांची स्वतंत्र नगर परिषद व्हावी, अशी ‘संघर्ष समिती’ची मागणी होती. त्या २७ गावांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर २७ गावांची वेगळी नगर परिषद झाली तरच ते शक्य होईल, या मतावर गुलाब वझे ठाम होते. त्यामुळे त्यांनी ‘संघर्ष समिती’त प्रत्यक्षात सहभागी होऊन २७ गावांच्या लढ्याला पाठिंबा दिला. हा लढा आजसुद्धा सुरू आहे. तसेच वझे यांनी ‘गायरान बचाव कृती समिती’तर्फे गायरान जमिनींसाठीचा लढादेखील दिला होता. त्यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे तीन लाखांची वस्ती येणार होती. त्या विरोधात त्यांनी मोठा लढा दिला. या लढ्यात त्यांना शाबीर शेख, नकुल पाटील, प्रकाश परांजपे यांची मदत झाली. त्यांच्यासोबतीने त्यांनी ही लढाई लढली आणि ते यशस्वीही झाले. गुलाब वझे यांनी कामगारांसाठी देखील लढा दिला. ‘प्रीमियर’ कंपनीतील कामगारांना वेतन मिळत नव्हते. त्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी वझे कामगारांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. तसेच आजवर त्यांनी कित्येक शेतकर्‍यांचे प्रश्नही सोडविले.
 
 
 
गुलाब वझे यांच्या अध्यक्षतेखाली १९९१ साली ‘आगरी युथ फोरम’ या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेतर्फे ग्रामीण भागातील तरूणांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे, त्यांचा सत्कार-सन्मान करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबीर घेणे असे विविध समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबविले. २००४ साली गुलाब वझे यांना ‘आगरी महोत्सवा’ची संकल्पना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षातही यशस्वी करुन दाखविली. गेली दोन वर्षं कोरोनामुळे त्यात खंड पडला असला तरी १७ वर्षं हा महोत्सव अविरतपणे सुरू असून लोकांच्याही पसंतीस पडला आहे. ‘आगरी युथ फोरम’तर्फे ‘आगरी महोत्सवा’चे आयोजन केले जाते. या महोत्सवाच्या माध्यमातून आगरी समाजामध्ये विविध विषयांवर चर्चासत्र घेऊन सामाजिक प्रबोधन करण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. या महोत्सवात अनेक दिग्गजांनी आजवर उपस्थिती लावली असून आपले विचारदेखील मांडले आहेत. या यादीमध्ये साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, शं. ना. नवरे, बाबासाहेब पुरंदरे, बाबा आमटे, मंदाताई आमटे आदींची व्याख्यानांनी महोत्सवाची शोभा वृद्धिंगत केली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडामोडींचे एक केंद्र असलेल्या डोंबिवलीत ‘आगरी युथ फोरम’तर्फे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चेही आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली ही ‘सांस्कृतिक नगरी’ असली तरी ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा मान मिळण्यास ९०वे संमेलन उजाडावे लागले होते. साहित्य संमेलनाचे यजमानपद ‘आगरी युथ फोरम’ला मिळाले आणि डोंबिवलीकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा तेव्हा संपुष्टात आली.
 
 
दिग्गजांच्या व्याख्यानांनी प्रेरित झालेल्या गुलाब वझे यांना वाचनाचीही तितकीच आवड. पण, साहित्यातील वाचन वेगळे असून त्याची गोडी ‘आगरी महोत्सवा’तील या मान्यवरांच्या विचारांमुळे लागली, आपल्या विचारांना दिशा मिळाली, असे ते मनमोकळेपणाने सांगतात. तसेच आगरी समाज हा नानासाहेब व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निरूपणामुळे अध्यात्माकडे जास्त वळल्याचेही ते विशेषत्वाने अधोरेखित करतात. त्यातच ‘नवव्याआगरी महोत्सवा’त विश्वास पाटील यांची मुलाखत सुरू होती. त्यांनी कार्यक्रमातील शिस्तबद्धता, व्यवस्था आणि कार्यक्रमाची रुपरेषा पाहून तुम्ही साहित्य संमेलन का भरवित नाही, असे गुलाब वझे यांना विचारले. तेव्हा वझे यांना मनात पहिल्यांदा साहित्य संमेलन भरवावे, असा विचार मनात घोळू लागला. त्यांच्या पाठोपाठ ‘फोरम’मधील सर्व कार्यकर्त्यांनाही साहित्य संमलेन आयोजित करावे, असे वाटू लागले. त्यासाठी संमेलन कसे आयोजित करावे, त्याचे नेमके स्वरुप कसे असते, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी सासवड येथील साहित्य संमेलनाला हजेरी लावली. अनेक साहित्यिकांच्या भेटीगाठी घेतल्या. साहित्य संमेलनच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही समाजाच्या संघटनेला साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला नव्हता. पण, तो प्रथमच ‘आगरी युथ फोरम’ संस्थेला मिळाला अन् त्यांनी ‘९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ डोंबिवलीत यशस्वी करुन दाखविले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्या ‘दि. बा. पाटील नामकरण समिती’मध्ये गुलाब वझे हे सरचिटणीस म्हणून सध्या कार्यरत आहेत. विमानतळाला दिबांचेच नाव द्यावे, यासाठी विविध मार्गांनी त्यांचा लढा सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार्‍या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@