आपतत्त्वाचा साधक
आपतत्त्वाच्या साधकाचे शरीर दिव्य सुगंधयुक्त असते. अशा साधकांना ‘गंधर्व’ही म्हणतात. साधकाची ‘गंधर्व’ ही एक उच्च आपतत्त्वीय अवस्था आहे. सर्व सिद्ध, यक्ष, गंधर्व याच तत्त्वाच्या आधाराने राहतात. कारण, याच तत्त्वात सर्व सिद्धींची प्राप्ती होते. आपतत्त्व हे सर्व सिद्धींचे माहेरघर आहे. आपतत्त्व सिद्धीसंबंधी वेदांमध्ये अनेक सुंदर ऋचा लिहिलेल्या आहेत व संध्यावंदनाच्या वेळी द्विज या ऋचा म्हणतात. ‘आपोहिष्ठा मयोभुवः तान उर्जे दधातनः। महेरणाय चक्षसे योवः शिवतमो रसः तस्य भाजयतेह नः। उशतीरीव मातर: तस्मा अर गमाम वः। यक्ष क्षयाय जिन्वथः।’ इत्यादी. आपतत्त्वाची साधना कशा प्रकारे केली जावी आणि त्यापासून काय प्राप्त होऊ शकेल, याचे हे वैदिक वर्णन आहे, ज्याचे रहस्य साधक समजू शकतील.
आपतत्त्वाचा निराकार साक्षात्कार म्हणजे शुभ्र जगत आहे. काही साधक चंद्र वा आधुनिक ट्यूब किंवा मर्क्युरी दिवेसुद्धा पाहतात, याकरिताच भगवान शिवाच्या मस्तकावर चंद्र दाखविलेला आहे. आपतत्त्व साधनेच्या अनुभवाचे हे वाङ्मयीन वर्णन आहे. हा प्रत्यक्ष इतिहास नाही. साधकाने त्याला प्राप्त झालेल्या सिद्धींचा व्यवहारात उपयोग करू नये. अन्यथा अशाने त्याचे निश्चित पतन होईल. साकारपिंडी साधकाला प्रथम शंखनादासारखा दिव्य नाद ऐकू येईल. नंतर त्यांना नंदीरूप आनंदमय अवस्थेचा अनुभव येईल. आनंदातील ‘आ’ काढल्यास ‘नंद’ राहतो, तोच हा नंदी. नंदी दर्शनानंतरच शिवदर्शन होते. म्हणून भगवान शिवाच्या दर्शनात हिमालय, गंगा, नंदी, पार्वती, शंख इ. शुभ्र वस्तूंचे दर्शन दाखविले जाते. वैदिक कलाकार आणि शास्त्रकार अवश्य आपतत्त्वाची साधना करीत होते व आजसुद्धा ही साधना केली पाहिजे.
गायक, ज्योतिषी, वैद्य, कलाकार, नर्तक, साहित्यिक या सर्वांनी आपतत्त्वाची साधना आवश्य करावी. त्यामुळे या व्यक्ती आपल्या शास्त्रात किंवा कलेत निपुण होतील. शुभ्र ज्योतीवर ध्यान केल्याने आपतत्त्वाची साधना होते. ‘ओम नमः शिवाय’ मंत्राच्या जपानेसुद्धा आपतत्त्व प्राप्ती होते. आपतत्त्वाची सर्वोत्तम साधना म्हणजे हिमालयाचे ध्यान व दर्शन करणे किंवा कुंडलिनीची जागृती करून भगवान शिवांचे कर्पूरगौर ध्यान करणे. ओंकारनाद करून खर्ज साधना केल्यास आपतत्त्वाची प्राप्ती होऊ शकते. आपतत्त्व शुभ्र वर्णाचे असल्यामुळे भगवान शिवाचा साक्षात्कार शुभ्रच राहील. शिवाचा सर्व परिवार शुभ्र आहे. दर्शनाचेसुद्धा एक शास्त्र आहे. आजकाल शिवाला निळ्या रंगातसुद्धा दाखविले जाते. अशाप्रकारचे चित्र काढणे, हे दर्शनशास्त्राविरुद्ध आहे. भगवान शिवाचे दर्शन शुभ्रच राहील. देवतेचे दर्शन कसे होते, याचे एक महत्त्वपूर्ण रहस्य आहे. आपण इतर वस्तू पाहतो, त्याप्रकारे देवता दर्शन होत नाही. देवतेचे सर्व अंगप्रत्यंग एकसमयावच्छेदेकरून एकाच दृष्टिक्षेपात दिसतात. दर्शनप्राप्त साधकाचे शरीर, मन आणि चित्त धन्य होतात, असे धन्य साधक पुन्हा जगरहाटी, कामिनी, कांचन आणि कीर्ती यांच्या मोहात पडत नाहीत.
आपतत्त्वाच्या साधकाचे शरीर
आपतत्त्व साधकाचे जड शरीर साधारणत: गौरवर्ण, आकर्षक चेहरा, मोठे कान, सरळ दीर्घ नाक, सरळ आणि प्रदीर्घ नेत्र, शंखाकार मान, रुंद खांदे, हातपाय लांब आणि मोठी जिव्हणी असे असते. असे साधक कफ प्रकृतीचे असतात. पोट पुढे आलेले नसते, पण ते कलावान आणि भोगी असतात. साधारणतः सर्व गायक, वादक, नर्तक, चित्रकार, आणि कलाकार यांचा पिंड आपतत्त्वाचा असतो. साहित्यिक आणि कवीसुद्धा आपतत्त्वाशी परिचित असतात. सिद्धी प्राप्त करण्याच्या मागे लागलेले महात्मे, भगवान आणि भक्त यांची उडी आपतत्त्वापर्यंतच मर्यादित असते.
मागच्या जन्मात काही सुयोग्य साधना केल्यामुळे इह जन्मात ज्यांचे ओजस तत्त्व विकसित झालेले आहे, असे पूर्वपुण्याई प्राप्त केलेले लोक कवी, साहित्यिक, कलाकार, गायक, वादक, नर्तक आदी होतात. पूर्वपुण्याईने त्यांना ही उच्च अवस्था प्राप्त झालेली असते. परंतु, दुर्भाग्याची गोष्ट अशी की, असे ओजसयुक्त लोक आपल्या कविता, लेख, वाङ्मय, कला, वक्तृत्व, गायन आदी गुणांचे प्रदर्शन करुन अहंकारी बनतात व या जन्मात मागच्या जन्माहून अधिक उन्नती न करता अधिक खालच्या थरावर घसरतात. या लोकांनी लौकिकदृष्ट्या कीर्ती मिळविलेली असल्यामुळे सामान्य जनांच्या दृष्टीने असे लोक मोठे आणि धन्य असतात. परंतु, त्यांचा आध्यात्मिक स्तर मात्र अधिकच खालावलेला असतो. अशाप्रकारे मागच्या जन्मात केलेल्या साधनेमुळे त्यांना इह जन्मात जी उच्च अवस्था मिळालेली असते ती साधनेद्वारे अधिक उन्नत करण्याऐवजी आपल्या अहंकाराने ते अधिक खोल गर्तेत जातात. बाह्य जगतात त्यांच्या कीर्तीचा आणि नावाचा बोलबाला असेल, पण आंतरिक जगतात ते खालच्या थरावरच असतात. हे एक सत्य आहे आणि सत्य लिहिणे हेही एक कर्तव्य आहे. याप्रकारे प्रत्येक व्यक्तीने आपले गुण व शरीरचना यांचा विचार करून आपले साधनातत्त्व जाणून घ्यावे व तद्नुसार तत्त्वसाधना किंवा देवतासाधना करावी.
संत आणि कवित्वकला
एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, सर्व संतजन हे उत्कृष्ट कवी होते. याचे कारण म्हणजे त्यांच्यात साधनेमुळे प्राप्त झालेले ओजस्तत्त्व प्रकट होते. कविता करण्यात किंवा लेख लिहिण्यात त्यांना फारसे प्रयास पडत नाहीत. ती एक त्यांची सहजावस्था असते. संत मीराबाई, संत सूरदास आणि संत तुकाराम चांगले संगीत तज्ज्ञ आणि गायकसुद्धा होते. ‘मीरामल्हार’ आणि ‘सूरमल्हार’ या रागांची निर्मिती क्रमशः मीरा आणि सूरदास यांनी केली. मीराबाई, गौरांग महाप्रभू, गोरा कुंभार वगैरे संत चांगले नर्तकसुद्धा होते. परंतु, त्यांचे नृत्य स्वाभाविक होते, ते कोणापासून नृत्यकला शिकले नाहीत. पूर्ण साधक हा पूर्ण पुरुष असतो. भगवान वेदव्यासांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून याचे सुमधूर आणि शास्त्रीय वर्णन करुन जगाच्या समोर एक आदर्श जीवन उभे केले. भगवान श्रीकृष्ण त्रिभुवनसुंदर असूनसुद्धा सुदृढ मल्ल आहेत. ते चांगले गायक आणि कलाकार आहेत. राजनीती आणि मुत्सद्दीपणात ते कोणासोबत हरत नव्हते. ते अत्युच्च दार्शनिक (तत्त्वज्ञानी) आणि वाक्पटूसुद्धा होते. या सर्वांहून वरचढ म्हणजे ते चांगले भक्त होते म्हणून भगवान होते. पूर्णपुरुष, पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण! ‘शिवो भूत्वा शिव यजेत्’ म्हणजे शिवाचे यजन करुन स्वत: शिव बनले पाहिजे. याप्रकारे भगवान श्रीकृष्णाचे चरित्र आदर्श मानून साधकाने स्वतः भगवान बनण्याचा प्रयत्न करावा, हेच साधनेचे ध्येय आहे. (क्रमशः)