मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 'रेडिओ कॉलर' प्रकल्पाअंतर्गत शुक्रवारी एका मादी बिबट्याला रेडिओ कॉलर बसवण्यात आले. ठाण्याच्या येऊर वनपरिक्षेत्र परिसरात हे काम करण्यात आले. यामुळे ठाणे शहरातील बिबट्यांच्या वावरावर प्रकाशझोत टाकण्यास मदत होणार आहे.
मुंबईच्या मध्यभागी वसलेल्या नॅशनल पार्कमध्ये एकूण ४७ बिबट्यांचे वास्तव्य आहे. या बिबट्यांवर रेडिओ कॉलर बसवून त्यांचा भ्रमणमार्ग, अधिवास आणि आवास क्षेत्र समजून घेण्याच्या अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत गेल्या वर्षभरात तीन बिबट्यांना रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे. आता या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी एका मादी बिबट्याला रेडिओ कॉलर लावण्यात आले. हे काम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वनपरिक्षेत्रामध्ये करण्यात आले. या मादी बिबट्याचे नाव ‘क्रांती’ ठेवण्यात आले. यावेळी ‘वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी इंडिया‘च्या संचालक डॉ. विद्या अत्रेय, निकीत सुर्वे, 'वाईल्डलाईफ एसओएस'चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखील बनगर, उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जून आणि विभागीय वनाधिकारी ढगे उपस्थित होते.
दुसऱ्या टप्प्याअंतर्गत अजून दोन बिबट्यांना रेडिओ कॉलर लावणार असल्याची माहिती जी. मल्लिकार्जून यांनी दिली. मानव आणि बिबट्या यांचे परस्पर संबंध कसे निर्माण होतात. तसेच बिबट्या हा प्राणी मानवी जीवनासोबत कसं जुळवून घेतो, याचा अभ्यास सध्या या माध्यमातून सुरू आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बिबटे तेथील जागेचा वापर कसा करतात? तसेच त्यांचे भ्रमण कसे होते, याबाबत या अभ्यासातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे बिबट्या व मानव यांच्यातील संघर्ष कसा कमी करता येईल याबाबतही या प्रकल्प अभ्यासातून माहिती, निष्कर्ष उपलब्ध होणार असून उपाययोजना सुचविल्या जातील. डॉ. विद्या अत्रेय यांनी यापूर्वी मानव व बिबट्या संबंध व संघर्ष या बाबत संशोधन केले असून त्यांचा या क्षेत्रात गाढा अभ्यास आहे.