
करोनाचा कोणताही प्रकार असो, लस हाच उपाय
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेचा रोजगार, आर्थिक व्यवहार आणि अर्थव्यवस्थेचा वेग यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेऊन करोनाविरोधी रणनिती तयार करा. त्यासाठी जास्तीत जास्त स्थानिक प्रतिबंधांवर भर द्या, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद साधला. यावेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया, आरोग्य सचिव राजेश भुषण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्या देशासमोर ओमिक्रॉन या नव्या प्रकाराचे आव्हान उभे राहिले आहे. मात्र, त्याचा सामना करण्यासाठी देशातील आरोग्य व्यवस्था अतिशय सक्षम आहे. देशात कोणत्याही प्रकारची भिती न पसरता त्याचा सामना करण्यासाठी देशवासी सक्षम आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना संसर्गाचा सामना देश करीत आहे, त्याविषयीचा पुरेसा अनुभव आता आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा रोजगार, आर्थिक व्यवहार आणि अर्थव्यवस्थेचा वेग यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेऊन करोनाविरोधी रणनिती तयार करा. त्यासाठी जास्तीत जास्त स्थानिक प्रतिबंधांवर भर द्या, असा महत्वाचा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी राज्यांना दिला.
करोनाविरोधी भारतीय लस प्रभावी असल्याचे जगभरात सिद्ध झाले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, करोनाचा कोणत्याही प्रकारावर लस हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्याची गरज असून हर घर दस्तक योजनेस गती देणे आवश्यक आहे. भारताने आतापर्यंत ९२ टक्के प्रौढ लोकसंख्येस लसीची पहिली तर ७० टक्के प्रौढ लोकसंख्येस दुसरी मात्रा दिली आहे. गेल्या १० दिवसात भारताने जवळपास ३ कोटींहून अधिक किशोरवयीन लोकसंख्येस लस दिली आहे.
देशात जास्तीतजास्त गृहविलगीकरणास प्राधान्य देणे आवश्यक आहे, त्यामुळे रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. केंद्र सरकार राज्यांच्या पूर्णपणे पाठिशी असून यापूर्वी राज्यांसाठी दिलेल्या २३ हजार कोटी रूपयांच्या निधीतून आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे. अनेक राज्यांनी करोना नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी विविध यशस्वी प्रयोग केले आहेत. त्याचवेळी करोनाच्या संभाव्य प्रकारांसाठीदेखील तयार राहण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.