वांद्रे कोर्ट आणि बीकेसीला स्कायवॉकद्वारे जोडणार

येत्या स्थायी समितीच्या बैठकीत 18.69 कोटींचा प्रस्ताव

    11-Jan-2022   
Total Views |
 
BANDRA-WEST-SKYWALK-(21)
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील सध्या अस्तित्वात असलेला स्कायवॉक पाडून त्या जागी नव्या स्कायवॉकची उभारणी महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, या उभारणीसाठी पालिका प्रशासनातर्फे सुमारे १८ कोटी ६९ लाख रुपयांचा प्रस्ताव महापालिका स्थायी समितीच्या येत्या बैठकीत मंजुरीस आणला जाण्याची शक्यता आहे. या स्कायवॉकच्या माध्यमातून वांद्रे कोर्ट आणि बीकेसीला परस्परांशी जोडण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.
 
 
 
२००७-०८ मध्ये एमएमआरडीएतर्फे बांधण्यात आलेला हा स्कायवॉक काही कालावधीनंतर देखभाल आणि इतर बाबींसाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला होता. मात्र, प्रामुख्याने स्टीलचा उपयोग करून बांधण्यात आलेला हा स्कायवॉक काही कालावधीत प्रदूषणामुळे दुरवस्थेकडे झुकू लागला होता. 2019 मध्ये, वांद्रे पूर्व परिसरात एका स्कायवॉकबाबत घडलेल्या घटनेमुळे मुंबईतील अनेक स्कायवॉकची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले होते.
 
 
 
2019 पासून हा स्कायवॉक सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला आहे. काही कालावधीनंतर संबंधित स्कायवॉकच्या कामासाठी एका कंपनीची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या कामासाठी प्रशासनातर्फे १६ कोटी २० लक्ष रुपयांचा अंदाजे खर्च निश्चित करण्यात आला असून त्यासाठी निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. या निविदांवर एकूण ८ कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.