मुंबई : पालघरमध्ये जन्मलेल्या शार्दुल ठाकूरने भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात धमाकेदार कामगिरी करत 'लॉर्ड' असे टोपण नाव मिळवले आहे. सोशल मिडीयावर सध्या त्याची 'लॉर्ड शार्दुल ठाकूर' म्हणूनच प्रसिद्ध आहे. ओव्हल मैदानावर केलेल्या कामगिरीमुळे सर्वांनी त्याचे कौतुक केले. भारताने चौथा कसोटी सामना हा १५७ धावांनी जिंकत ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २ - १ अशी आघाडी मिळवली.
पालघरच्या शार्दुलची अशी झाली चौथ्या कसोटीत एन्ट्री
चौथ्या कसोटीमध्ये कर्णधार विराट कोहलीने मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी दिली. त्याची निवड होण्याआधी काहींनी टीका केली होती की, शमीची चांगली गोलंदाजी असताना शार्दुलला संधी देण्याचे काय कारण? मात्र, पहिल्याच डावामध्ये त्याने त्याने सर्वांची तोंड बंड केली. रोहित, राहुल, रहाणे आणि पुजारासारखे फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यानंतर भारताची स्थिती ११७ वर ६ बाद अशी झाली होती. शार्दुल फलंदाजीला आल्यानंतर सुरुवातीपासूनच निर्भीडपणे दटके मारायला सुरुवात केली. थोड्याच वेळात रिषभ पंतदेखील बाद झाला. मात्र, याचेही दडपण न घेता त्याने एका बाजूने प्रहार सुरूच ठेवला आणि फक्त ३१ चेंडूमध्ये अर्धशतक केले.
लॉर्ड शार्दुलची रेकॉर्ड ब्रेक खेळी
एकीकडे सर्व गोलंदाज भारतीय संघावर भारी पडत असताना शार्दुलने एकामागे एक चेंडू सीमारेषेबाहेर पाठवत आपला धडाका चालूच ठेवला. त्याने ३ षटकार आणि ७ चौकारांसह ३६ चेंडूत ५७ धावा केल्या. फक्त ३१ चेंडूंमध्ये अर्धशतक एकरात त्याने वीरेंद्र सेहवागचा ३२ चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम मोडीत काढला. तसेच, अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. याआधी कपिल देव यांनी १९८२मध्ये ३० चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे. त्यानंतर दुसऱ्या डावामध्येही त्याने ७२ चेंडूत ६० धावा करत अनोखा विक्रम केला. कसोटी इतिहासात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन्ही डावांमध्ये अर्धशतके झळकावणारा तो सहावा खेळाडू ठरला.
पालघर ते ओव्हल
शार्दुलचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१मध्ये झाला आणि सर्व बालपण हे पालघर आणि भोईसरच्या मैदानावर गेले आहे. सोशल मिडीयावर त्याचा प्रवास अनेक वेळा समोर आला आहे. बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये असताना त्याने ६ चेंडूंमध्ये ६ षटकार लावण्याचा पराक्रमही केला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने गोलंदाजीने चांगला प्रभाव तर पडलाच शिवाय, ६६ सामन्यांमध्ये ९ अर्धशतकेदेखील केली आहेत. २०१८मध्ये कसोटीत पदार्पण केल्यानंतर दुखापत झाल्यामुळे काहीकाळ कसोटीपासून लांब होता. मात्र, २०२१ हे वर्ष त्याच्यासाठी खऱ्या अर्धाने लाभदायी ठरले. जानेवारीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ब्रिस्बेनच्या मैदानावर त्याने पहिले अर्धशतक लगावले. यानंतर आता ओव्हालमध्ये केलेल्या खेळीमुळे त्याला 'लॉर्ड शार्दुल ठाकूर' असे टोपण नाव देण्यात आले.