आमदार गोपीचंद पडळकरांचे आता थेट राज्यपालांना पत्र
मुंबई: सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात बसविण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा अश्वारूढच असावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले आहे.अहिल्याबाईंची शिवपिंडीधारी प्रतिमा जनमानसात रुजलेली आहेच. मात्र, शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीतही निपूण असलेली त्यांची ख्याती अश्वारूढ पुतळ्याद्वारे अधिक गडद होते. यामुळे अहिल्याबाई होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारावा, असा आग्रह आमदार पडळकर यांनी धरला आहे.
विद्यापीठ आवारात उभारला जाणारा प्रस्तावित पुतळाही 'अश्वारूढ'च असावा
पात्रात पडळकर म्हणतात, परकीय आक्रमणाने छिन्नविछीन्न झालेल्या हिंदू संस्कृतीचा व मंदीरांचा जीर्णोद्धार माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्यामुळेच माँसाहेबांच्या कर्तृत्वाला 'पुण्यश्लोक' संबोधलं गेलं. माँसाहेबांची शिवपिंड धारी केलेली प्रतिमा आजही जनमानसात रूजलेली आहे. पण त्याच बरोबर माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक कुशल प्रशासक, एक मुत्सद्दी राजकारणी आणि महापराक्रमी महाराणी होत्या. त्यांच्या व्यक्तीमत्वातील पराक्रमी बाण्याचा पैलूही जनमाणसात रूजला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या महान कर्तृत्वाला साजेसा पुतळाही त्याच ताकदीचा असला पाहिजे. त्यासाठी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आवारात उभारला जाणारा प्रस्तावित पुतळाही 'अश्वारूढ'च असला पाहिजे. अशी सर्वसामान्य जनतेची आग्रही भावना आहे.
मॉंसाहेबांच्या अश्वारुढ पुतळ्यातूनच विशेषतः युवतींना प्रेरणा मिळणार
दुष्काळी भागातल्या या विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करत युवक-युवती येतात. त्यांच्या संघर्षाला प्रेरणा देण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा करु शकतो. त्यामुळं 'शस्त्र आणि शास्त्र' या दोन्हीची शिकवण देणाऱ्या मॉंसाहेबांच्या अश्वारुढ पुतळ्यातूनच विशेषतः युवतींना प्रेरणा मिळणार आहे. माँसाहेबांचे अनेक शिवपिंडधारी पुतळे इंदौरपासून ते जेजूरी संस्थान पर्यंत आहेत. जेजूरीतही शिवपिंडधारी पुतळा बसवण्यात आला आहे. पण अन्यायाविरूद्ध लढण्याची प्रेरणा देणारा पुतळा उभारला गेला पाहिजे. याविषयी कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही.
'जाईल तिथं राजकारण' करण्याची खोड असलेले 'पोस्टर बॉय' इथेही खोडा घालतायेत
आधीच्या स्मारक समितीने अश्वारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता. सर्वांनी मान्यताही दिली होती. पण 'जाईल तिथं राजकारण' करण्याची खोड असलेले 'पोस्टर बॉय' इथेही खोडा घालतायेत. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं पवित्र नाव लाभलेल्या विद्यापीठाला आपण राज्याचे राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती म्हणून कुणाच्याच राजकारणाचा अड्डा होऊ देऊ नका. ही आपणास विनंती आहे. माँसाहेबांचा भव्य अश्वारूढच पुतळा उभारण्यात यावा अशा सुचना आपण विद्यापीठ प्रशासनाला द्याव्यात. ही विनंती.