शेतकर्यांचे नेते राकेश टिकैत यांनी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देऊन आपल्या आंदोलनाची भावी ‘दिशा’ काय असेल, हे दाखवून दिले. राकेश टिकैत यांनी या कार्यक्रमात ‘अल्ला हू अकबर’ आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देण्यात येतील असे म्हटले होते. पण, राकेश टिकैत हे केवळ ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत असल्याचे दिसून आले.
संयुक्त किसान मोर्चा’च्या वतीने उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाने जे कृषीविषयक तीन कायदे केले आहेत ते रद्द करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’च्या वतीने दिल्लीच्या सीमेवर गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चाही केली. पण, त्यातून तोडगा निघू शकला नाही. सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले, तरी आंदोलन करणार्या शेतकरी नेत्यांनी मात्र तशी तयारी दर्शविली नाही. दिल्लीलगत सुरू असलेल्या या आंदोलनास देशातील सर्व शेतकरीवर्गाचा पाठिंबा आहे, असेही नाही. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी असल्याचे प्रारंभी दिसून आले. नंतरच्या काळात या आंदोलनाने भलतेच वळण घेतले. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. त्यांच्यावर विश्वासून या मोर्चास अनुमतीही देण्यात आली.
पण, या मोर्चात सहभागी झालेल्यांनी प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत आणि ऐतिहासिक लाल किल्ल्यात जो हैदोस घातला, तो पाहिल्यावर या आंदोलनात सहभागी झालेल्यांना, शेतकर्यांचे प्रश्न सोडवायचे नसून, देशातील वातावरण कसे बिघडेल, यामध्ये अधिक रस असल्याचे लक्षात आले. शेतकर्यांच्या या आंदोलनात खलिस्तानच्या घोषणा, खलिस्तानचे झेंडे फडकविले गेले, हे सर्व कशाचे द्योतक होते? या आंदोलनाच्या निमित्ताने देशामध्ये गोंधळाची परिस्थिती कशी निर्माण होईल, हा त्या आंदोलकांचा हेतू असल्याचे दिसून आले. प्रजासत्ताक दिनी झालेल्या आंदोलनात खलिस्तान समर्थकांनी धुडगूस घातला होता, तर रविवारी मुझफ्फरनगर येथे ज्या किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते, त्या महापंचायतीपुढे शेतकर्यांचे नेते राकेश टिकैत यांनी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देऊन आपल्या आंदोलनाची भावी ‘दिशा’ काय असेल, हे दाखवून दिले. राकेश टिकैत यांनी या कार्यक्रमात ‘अल्ला हू अकबर’ आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देण्यात येतील असे म्हटले होते. पण, राकेश टिकैत हे केवळ ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत असल्याचे दिसून आले.
किसान महापंचायतीमध्ये शेतकर्यांच्या प्रश्नांवर सखल विचार करण्याऐवजी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा आगामी निवडणुकीमध्ये कसा पराभव होईल, यावरच अधिक खल झाला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये आपली संघटना आपले उमेदवार उभे करील, याचे सूतोवाचही या वेळी करण्यात आले. शेतकरी नेते राकेश टिकैत हे आपले आंदोलन अराजकीय असेल, असे म्हणत होते. पण, या आंदोलनास पूर्णपणे राजकीय वळण लागल्याचे दिसून येत आहे. आपण सक्रिय राजकारणात उतरणार नाही, असेही राकेश टिकैत म्हणत असत. पण, आपली ती वक्तव्ये विसरून भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी टिकैत हे प. बंगालच्या प्रचारात सहभागी झाले होते हे सार्या देशाने पाहिले आहे. किसान महापंचायतीस पश्चिम उत्तर प्रदेशात मिळालेला प्रतिसाद पाहून टिकैत यांनी येत्या २७ सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे.
केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार शेतकर्यांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचे आरोप करून उपस्थित जनसमुदायास या दोन्ही सरकारांविरुद्ध भडकविण्याचे काम टिकैत यांनी केले. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी हेच राकेश टिकैत भाजपच्या बाजूने प्रचारासाठी उतरले होते, हे लक्षात घ्यायला हवे. मात्र, या मेळाव्यात राकेश टिकैत यांनी भाजपवर आणि केंद्र व उत्तर प्रदेश सरकारवर जेवढे तोंडसुख घेता येईल, तेवढे घेतले. सरकारने देश विकायला काढला असल्याचे खोटेनाटे आरोप करण्यासही ते विसरले नाहीत! राकेश टिकैत यांनी मुझफ्फरनगर येथे जे शक्तिप्रदर्शन केले, त्यामुळे आपल्या आंदोलनास बळ मिळेल, असे त्यांना वाटले असावे. पण, आपल्या आंदोलनाचे केंद्र दिल्लीच्या सीमेवरून उत्तर प्रदेशात नेण्याचा जो निर्णय त्यांनी घेतला, तो पाहता दिल्लीमध्ये त्यांच्या या प्रदीर्घ आंदोलनाची डाळ शिजली नाही, असे म्हणता येईल.
आपल्या देशात लोकशाही असल्याने आपल्या हक्कांसाठी लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण, आपली संघटना कोणत्या कारणांसाठी लढत आहे, त्याचाच विसर टिकैत यांना पडला. उघड उघड त्यांनी या महापंचायतीस जातीय, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. या किसान महापंचायतीमध्ये ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा कशासाठी? ही घोषणाबाजी काहींना क्षुल्लक वाटेल. पण, राकेश टिकैत यांची पावले या आंदोलनास कोणती दिशा देऊ पाहत आहेत, याची कल्पना यावी. या आंदोलनात आधी खलिस्तानला समर्थन देणार्या घोषणा आणि आता ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा! पण, राकेश टिकैत आणि त्यांना चुकीचे सल्ले देणार्या राजकारण्यांच्या मागे जनता धावणार नाही, हे गेल्या काही महिन्यांपासून या आंदोलनास जो ‘प्रतिसाद’ मिळत आहे, त्यावरून दिसून आले आहे!
माजी राज्यपाल कुरेशी यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा
राज्यपाल या पदावर राहिलेली व्यक्ती बोलताना काही तारतम्य बाळगून बोलेल, अशी अपेक्षा असते. पण, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरेशी यांना ते भान राहिले नसल्याचेच त्यांच्या बेफाम वक्तव्यांवरून दिसून आले आहे. रामपूरमध्ये एका महिला आमदारास भेटण्यासाठी अजीज कुरेशी गेले असता त्या ठिकाणी कुरेशी महाशयांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. कुरेशी यांनी जी भाषा वापरली ते लक्षात घेऊन भाजपच्या एका कार्यकर्त्याने कुरेशी यांच्याविरुद्ध तक्रार केली. ती तक्रार लक्षात घेऊन पोलिसांनी कुरेशी यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे. योगी आदित्यनाथ सरकारबद्दल काय म्हणाले हे माजी राज्यपाल? योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल या राज्यपालांच्या मनात असूया असू शकते. म्हणून काय अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरून मुख्यमंत्र्यांचा अपमान करायचा? अजीज कुरेशी यांनी योगी आदित्यनाथ यांचे सरकार हे रक्तपिपासू राक्षसांचे सरकार असल्याचे वक्तव्य केले होते. ते लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आणि आता त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा आणि अन्य गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. “अजीज कुरेशी यांच्या अशा वक्तव्याने जातीय तणाव निर्माण होऊ शकतो. एवढेच नाही, तर त्याद्वारे जातीय दंगली भडकू शकतात,” असे तक्रारदार आकाश सक्सेना यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
गिलानी यांचे शव
पाकिस्तानी ध्वजात!
काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी याचे नुकतेच निधन झाले. पण, त्याच्या निधनानंतर काश्मीर खोर्यामध्ये अजून फुटीरतावादी, भारतविरोधी शक्ती कशा कार्यरत आहेत त्याचे दर्शन सर्वांना झाले. गिलानीचे निधन झाल्यानंतर त्याचे शव पाकिस्तानी राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आले होते. तसेच गिलानीचे समर्थक यावेळी भारतविरोधी घोषणा देत असल्याचेही दिसून आले. पण, पोलीस जेव्हा गिलानीचे शव ताब्यात घेण्यासाठी गेले, त्यावेळी या फुटीरतावादी नेत्याच्या पाठीराख्यांनी गिलानीच्या शवाभोवतीचा पाकिस्तानी राष्ट्रध्वज काढून टाकला. यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप लक्षात घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा नोंदविला. पण, पोलिसांनी जो गुन्हा नोंदविला ती बाब माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना रुचली नाही. “काश्मीर हा खुला तुरुंग करण्यात आला असून, त्यातून मृत व्यक्तीही सुटल्या नाहीत,” असे भाष्य त्यांनी समाज माध्यमावर केले. “गिलानी यांच्या इच्छेनुसार त्यांना अखेरचा निरोप दिला गेला नाही,” असेही मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. खरे म्हणजे मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुला या नेत्यांनी, गिलानीचे शव पाकिस्तानी ध्वजामध्ये गुंडाळण्याच्या कृतीचा एकमुखाने निषेध करायला हवा होता. पण, या सर्व नेत्यांची मानसिकता पाकिस्तानधार्जिणी कशी आहे, हे या घटनेवरून दिसून आले!