मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकसाठी महत्त्वाच्या बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने झेंडा फडकवला आहे. भाजपचे ३०, काँग्रेसचे चार, महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन, एमआयएमचा एक, असा निकाल लागला आहे. मात्र, संजय राऊतांची जाहीर सभा होऊनही शिवसेनेला बेळगावात एकही जागा मिळवता आलेली नाही यावरून भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी राऊतांवर टीका केली आहे.
निलेश राणे म्हणाले, "बेळगाव नगरपालिका निवडणूक ५८ जागा, भाजपला ३६, काँग्रेस ९, महाराष्ट्र एकीकरण समितीला २, एमआयएमला केवळ एक जागा मिळाली आहे. इतर संज्या आणि शिवसेना (०) पुन्हा तोंडावर पडले, तुमची औकात काय आणि बोलता किती."
बेळगावात ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी एकूण ३८५ उमेदवार रिंगणात होते. प्राथमिक माहितीनुसार, या निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले होते. यामध्ये आता भाजपला ३३ जागांचे बहुमत मिळाले असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ४ जागा निवडून आल्या आहेत. तर कॉंग्रेसच्या नावावर १०, अपक्ष ८ आणि एमआयएमच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. सत्तेसाठी ३३ जागांची गरज असते आणि भाजपने हा आकडा पार केला असून आता बेळगाव नगरपालिकेवर विजय मिळवला आहे.