Custom Heading

करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2021
Total Views |

Beed_1  H x W:


बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी गंभीर आरोप केल्यानंतर त्या बीडमधील परळीत आल्या होत्या. यावेळी पोलिसांनी त्यांची गाडी तपासल्यानंतर एक पिस्तुल आढळून आले. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आणि करुणा शर्मा यांना परळी पोलिसांनी अटक केली. अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याचबरोबर त्यांच्या वाहनचालकास एक दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली गेली आहे.
 
 
धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने पिस्तुल ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केली. त्यानंतर करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलम ३०७ आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवले व घेराव घालण्याचा प्रयत्न केला. रविवारी करुणा शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
 
 
करुणा शर्मा यांना अटक झाल्यानंतर आता एक व्हिडियो समोर आला आहे. यामध्ये एक व्यक्ती त्यांच्या गाडीमध्ये काहीतरी ठेवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावरून आता या प्रकारची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये ती बंदूक सापडली की ती आधीच कोणाकडून तरी त्यांच्या गाडीत ठेवण्यात आली होती? असा प्रश्न आता विरोधकांकडून विचारण्यात येत आहे.
 
 
करुणा यांचा दोन दिवसांपूर्वी एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही येत असल्याचे त्यांनी सांगितले. या विरोधात आवाज उठविण्यासाठी परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे परळीत तणावपूर्ण वातावरण होते. परळी पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सात-आठ महिन्यांपासून राज्याची सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंचा विवाद सुरू आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@

Custom Heading

जरुर वाचा