कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी घेतली एनएसए अजित डोवाल यांची भेट

    30-Sep-2021
Total Views |
capt_1  H x W:

काँग्रेस सोडणार, मात्र भाजपमध्ये प्रवेश करणार नाही – कॅप्टन

 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : पंजाबचे माजी मुख्यमंत्री गुरूवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांची भेट घेतली. यावेळी पंजाबशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सिंग यांनी सांगितले.
 
 
काँग्रेस नेतृत्वाने चालविलेल्या खच्चीकरणाला कंटाळून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता कॅप्टन यांनी आपली पुढील वाटताल स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दिल्ली येथे एनएसए अजित डोवाल यांची भेट घेतली. त्याविषयी ते म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षेच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी डोवाल यांची भेट घेतली आहे. आता मी पंजाबचा मुख्यमंत्री नसलो तरीदेखील पंजाबच्या सुरक्षेची मला चिंता आहे, कारण हा थेट राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दा आहे. पंजाबमध्ये पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होऊन राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये, यासाठीच एनएसए डोवाल यांची भेट घेतल्याचे कॅप्टन यांनी स्पष्ट केले.
 
 
काँग्रेसचा लवकरच राजीनामा देणार असल्याचे कॅप्टन यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, सध्या तरी काँग्रेसमध्ये असलो तरीदेखील आता फार काळ येथे राहणार नाही. राजकारणात मी ५२ वर्षांपासून कार्यरत आहे आणि दीर्घकाळपासून काँग्रेसमध्येच आहे. मात्र, ५० वर्षांनंतरही माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानेच मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता काँग्रेस सोडणार असलो, तरी भाजपमध्ये प्रवेशाचा कोणताही विचार नसल्याचे कॅप्टन म्हणाले. पंजाबमध्ये सध्या आप आदमी पक्षाची लोकप्रियता वाढत असून काँग्रेसची लोकप्रियता २० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर जनतेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये आता नवी शक्ती उदयास येणार असून मी काही पाऊले उचलली तर ते योग्य वेळी कळेल, असा सुचक संकेतही कॅप्टन यांनी यावेळी दिला.