भारतात राहून भारताची-भारतीयांची इच्छाशक्ती खच्ची करण्यासाठी कामाला लागलेल्या यातल्या कोणाहीकडे मोदींनी लक्ष दिले नाही, ते आपले काम करतच राहिले. परिणामी, आज भारताने दर चारपैकी एका पात्र लाभार्थ्याचे लसीकरण करण्याची कामगिरी करून दाखवली, जी नरेंद्र मोदींच्या व भारताच्याही विरोधकांना बसलेली सणसणीत चपराकच आहे.
यंदाच्या जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोनाविरोधी लसीकरण अभियानात ऐतिहासिक कामगिरी करणार्या भारताने मंगळवारी आणखी एक उपलब्धी प्राप्त केली. आता भारताच्या दर चारपैकी एका पात्र लाभार्थ्याचे म्हणजेच २४.८ टक्के नागरिकांचे दोन्ही लसमात्रांसह कोरोनारोधी लसीकरण पूर्ण झाले आहे, तर ४३.५ टक्के नागरिकांना कोरोनाविरोधी लसीची किमान एक मात्रा देण्यात आली आहे. एकूण लसमात्रांची संख्या ८७.६२ कोटी इतकी झाली असून, चीननंतर सर्वाधिक नागरिकांचे पहिली वा दुसरी लसमात्रा देऊन लसीकरण करणारा भारत दुसर्या क्रमांकाचा देश ठरला आहे. भारताची दैनंदिन लसीकरणाची गती पाहता १०० कोटी, १५० कोटी, १८० कोटी व त्यानंतर पुढील कोटीच्या कोटी लसमात्रांचा पल्लाही लवकरच गाठला जाईल. मात्र, भारत वेगाने आपल्या नागरिकांचे लसीकरण करत असतानाच त्याआधी इथल्या विरोधी राजकीय पक्षांसह तथाकथित बुद्धिमंत, विचारवंत आणि मराठीसह मुख्य प्रवाहातील अनेक प्रसारमाध्यमे, पत्रकार-संपादकांनी मोदी सरकारची व त्या माध्यमातून देशी आरोग्य यंत्रणेची, त्यात काम करणार्या प्रत्येकाची टिंगल-टवाळी केली होती. भारत निश्चित कालावधीत अचाट आणि अफाट कामगिरी करूच शकत नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. भारताला नेहमी मागासलेला ठरवण्यात, भारतीयत्वाचा न्यूनगंड बाळगण्यात व भारताची हेटाळणी करण्यात धन्यता मानत अन्य पाश्चिमात्य देशांची उदाहरणे देणारी ही सर्व मंडळी होती. त्यातल्या कित्येकांनी समाजमाध्यमांवर भारताच्या कोरोनासमोरील संभाव्य पराभवाची साग्रसंगीत, आकडेवारीनिशी मांडणी केली होती, तर अनेकांनी लेख-अग्रलेखांचे रतीब घालत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या, भाजपच्या सत्ताकाळातील भारतासारखा विकसनशील देश कोरोनारोधी गतिमान लसीकरण करूच शकत नाही, असे तारे तोडले होते. एक देश म्हणून जगाच्या पाठीवर भारत उभाच राहू शकत नाही, एक देश म्हणून आपल्यावर कोसळलेल्या संकटाचा भारत सामना करूच शकत नाही, पर्यायाने कोरोनासमोर भारताचे पतन निश्चित, याकडे डोळे लावून लिहिणारे-बोलणारे हे टोळके होते. अर्थात, भारतात राहून भारताची-भारतीयांची इच्छाशक्ती खच्ची करण्यासाठी कामाला लागलेल्या यातल्या कोणाहीकडे मोदींनी लक्ष दिले नाही, ते आपले काम करतच राहिले. परिणामी, आज भारताने दर चारपैकी एका पात्र लाभार्थ्याचे लसीकरण करण्याची कामगिरी करून दाखवली, जी नरेंद्र मोदींच्या व भारताच्याही विरोधकांना बसलेली सणसणीत चपराकच आहे.
दरम्यान, भारताच्या बरोबरीनेच किंवा महिनाभर आधी कोरोनाविरोधी लसीकरण सुरू करणार्या अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आदी पाश्चिमात्य देशांची लोकसंख्या किंवा पात्र लाभार्थी अतिशय कमी आहेत. भारताच्या एखाद्या राज्याची लोकसंख्या वा पात्र लाभार्थीदेखील यापैकी कितीतरी देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक आहेत, तरीही या देशांतील नागरिकांचे अजूनही १०० टक्के लसीकरण झालेले नाही. विशेष म्हणजे, भारताला हिणवणार्या इथल्या बुद्धिमंत, विचारवंत, संपादक-पत्रकारांच्या मते या विकसित देशांतली आरोग्य यंत्रणा, लसनिर्मिती करणार्या संस्था वगैरेंची क्षमता अवाढव्य आहे. भारतासारख्या देशातील मागास व्यवस्थेची या देशांशी तुलना करताना आपला देश कोरोनाशी लढताना, लसीकरण करताना त्यांच्यासमोर फार फार मागे राहणार, असेही या लोकांचे म्हणणे होते. पण, परिस्थिती नेमकी त्याच्या उलट आहे. भारतात पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने ‘कोव्हिशिल्ड’ तर बंगळुरूतील ‘भारत बायोटेक’ने ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे उत्पादन केले. त्या लसींचा भारतासारख्या विशाल देशाच्या कानाकोपर्यात सुसूत्रपणे पुरवठा केला. भारतीय आरोग्य यंत्रणेने अथक परिश्रम घेत त्या लसी पात्र लाभार्थ्यांना दिल्या व भारताने वर उल्लेख केलेल्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिकांचे लसीकरण पूर्ण केले. पण, भारताने कोरोनाविरोधी लसीकरणात आघाडी घेतली तरी त्याबद्दल दोन चांगले शब्द लिहिण्याचा-बोलण्याचा दिलदारपणा मात्र टीका करणार्या, खिल्ली उडवणार्यांनी दाखवला नाही, कारण कितीही झाले तरी त्यांना पाश्चिमात्य देशांचे उष्टे-खरकटेच गोड वाटते.
भारतातील कोरोनारोधी लसीकरणाच्या परिघात अधिकाधिक नागरिक येत आहेत, तसतसे नव्याने कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी कमी होताना दिसते. मंगळवारीच देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली व एका दिवसांत २० हजारांपेक्षाही कमी कोरोना रुग्ण आढळले, एकूण सक्रिय रुग्णसंख्याही तीन लाखांपेक्षा कमी झाली. कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेवेळी मात्र, देशात दररोज नव्याने सापडणार्या कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड होती. अधिक रुग्णसंख्येमुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता, तरीही त्या परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, रुग्णालयांनी मेहनत केली व रुग्णांना सेवा दिली. पण, कोरोनाविरोधी लसीकरणामुळे रुग्णसंख्येत घट होत आहे व आरोग्य यंत्रणेवरील ताण बर्यापैकी कमी झाला आहे. सोबतच सार्वजनिक आरोग्यावरही लसीकरणाचा लक्षणीय परिणाम होत असून, दुसर्या लसमात्रेनंतर मृत्यू रोखण्यात लसीचा प्रभाव वाढला आहे. लसीकरणामुळे मृत्यूपासून ९७.५ टक्के संरक्षण मिळत आहे. परिणामी, कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता कमी झाली आहे. लसीकरणाची व्यापकता वाढत आहे, तसतशी कोरोनाची तिसरी लाट येणार नाही वा आली तरी ती कमी नुकसानकारक असेल, पहिल्या व दुसर्या लाटेच्या तुलनेत होणारे नुकसान नगण्य असेल, असे आरोग्य क्षेत्रातील विशेषज्ञांचे मत आहे.
एकूणच भारतातील लसीकरणाने वेग घेतलेला आहे, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरणाचे प्रमाण कैक पटींनी अधिक आहे, लसीकरण देशाला अनेक अर्थाने लाभदायक ठरत आहे. पण, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधक त्याचे कौतुक करण्याऐवजी टीकाच करताना दिसतात. पण, ती टीका मोदी वा केंद्र सरकारवर नसते, तर भारतावरच असते. भारताच्या सामूहिक मनोनिग्रहावर असते. अर्थात, स्वतः काही करण्याची धमक नसलेल्या नाकर्त्या टीकाकारांमुळे भारत थांबणार नाही, पराभूत होणार नाही, तर कोरोना असो वा अन्य कुठलेही संकट त्यासमोर ठामपणे उभे राहणारच, यश मिळपर्यंत सामना करणारच, त्यावेळी विरोधकांचा मात्र दारुण पराभव होणार, हे नक्की!