मुंबई : मराठी सुपरस्टार अभिनेता भरत जाधव हा गुणी अभिनेत्यांमध्ये येतो. विशेष म्हणजे, मराठीमध्ये सुपरस्टार असूनही त्याने अनेकवेळा आपले साधेपण सिद्ध केले आहे. असे असताना त्याने सर्वांसमोर आणखी एक आदर्श ठेवला आहे. भरत जाधवने आपल्या आई-वडिलाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले आहे. वडील गणपतराव जाधव आणि आई शांताबाई जाधव यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथील शेतात त्यांचे स्मारक उभारले आहे.
भरत जाधवने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याने म्हंटले आहे की, आई वडिलांच्या स्मरणार्थ आज कोल्हापूर येथील आमच्या शेतात त्यांचं स्मारकं उभारलं. मी सर्व मुला मुलींना सांगू इच्छितो की आपले आई वडील सदेह आपल्यात आहेत तोपर्यंत त्यांची भरपूर सेवा करून घ्या. त्यांना आदराने- सन्मानाने वागवा. त्यांच्या नजरेत आपल्यामुळे आनंद आणि अभिमान दिसावा यासाठी प्रामाणिक कष्ट करा. आई वडिलांच्या मुखातून मनापासून आलेल्या आशीर्वादाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही."
भरतच्या या पोस्टवर त्याने केलेल्या या कृत्याचे सर्वच कौतुक करत आहेत. 'धन्य ते माता पिता ते सर तुमच्या रुपात आम्हास हसणे शिकवले.', 'थोर आणि नशीबवान माता पिता', 'वा भरतदादा सही रे सही काम करून श्रीमंत भरतपंत झालास', अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.