नाशिक येथील दारणा आणि वालदेवी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी कार्यरत असलेल्या उदय थोरात यांच्या कार्याविषयी...
नाशिक येथील दारणा आणि वालदेवी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी येथील उदय थोरात हे आत्मीयतेने कार्यरत आहेत. तसेच उदय थोरात यांच्याकडे नाशिक महानगर भाजपच्या पर्यावरण आघाडीचे संयोजक म्हणूनही जबाबदारी आहे.
स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या थोरात यांनी केवळ पर्यावरणावरील प्रेमापोटीच या विद्याशाखेत शिक्षण घेतले. तसेच निसर्गाशी संबंधित विविध विषयांवर काम करण्यातही ते अग्रेसर असतात.शालेय-महाविद्यालयीन जीवनापासून वृक्षारोपणावर थोरात यांनी भर दिला. पर्यावरणाचे, निसर्गाचे रक्षण होईल, अशा चळवळींमध्ये त्यांनी आवर्जून सहभाग घेतला. सन २०१० पासून नाशिकमधील गोदावरी नदी व उपनद्यांची प्रदूषणाची तीव्रता थोरात यांच्या निदर्शनास आली. नदीची हानी पाहून त्यांचे मन अस्वस्थ होऊ लागले. यासाठी काही तरी ठोस करण्याची आणि हे प्रदूषण मिटवण्याची व आपल्या नद्या स्वच्छ सुंदर अविरत वाहण्यासाठी आपण काम केले पाहिजे, हे त्यांनी मनाशी निश्चित केले.गोदावरी व उपनद्यांचे जलप्रदूषण हे प्रशासकीय, राजकीय नेतृत्वामधील पर्यावरणीय विचारसरणीच्या अभावामुळे वाढले आहे, हे त्यांच्या लक्षात आले. मग त्याअनुषंगाने अनेक पद्धतींनी काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार निसर्गाचे स्वराज्य संपुष्टात आणण्याच्या दृष्टिकोनातून चालला आहे, हेदेखील लक्षात आल्याचे थोरात सांगतात. आणि म्हणूनच हा भोंगळ कारभार थांबवण्यासाठी थोरात यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली.
अनेक वेळा नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडे पर्यावरणसंबंधी, नदीसंदर्भात पत्रव्यवहार करून त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. प्रत्यक्ष प्रशासनाच्या गाठीभेटी घेऊन नदी स्वच्छ कशी राहील, नदीतील गटारी बंद कशा होतील, यासाठी थोरात व त्यांच्या सहकार्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. नदीपात्रातील अतिक्रमण हटविण्याचे काम करताना आगामी काळात संपूर्ण नदी अतिक्रमणमुक्त करण्याचे ध्येय थोरात उराशी बाळगून आहेत.नदी परिसर म्हणजे पूर्णपणे नैसर्गिकरीत्या नदीचीच मालकीची जागा. नदीला पूर्ण स्वातंत्र्याने एक ‘जीवनवाहिनी’ म्हणून ती करत असलेल्या नैसर्गिक कार्याला पुढे कोणतेही अडथळे निर्माण होणार नाही, यासाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे मत थोरात मांडतात. यासाठी 26 जानेवारीला प्रत्येक वर्षी नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी, नदीविषयी, प्रदूषण थांबण्यासाठी जनजागृती होण्याकरिता ‘प्रजासत्ताक ते पर्यावरण आस्था’ हे अभियान थोरात यांनी सुरू केले आहे. याअंतर्गत वालदेवी नदी देवळाली गाव येथे सकाळीच झेंडावंदन होते. वर्षभरातील कार्य हे देशकार्याबरोबर नदीला समर्पित करण्यात येत असल्याचे थोरात सांगतात. तसेच या दिवशी सायंकाळी सर्व पर्यावरणक्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, अधिकारीवर्ग, आवर्जून वालदेवी नदीकिनारी दीपोत्सव साजरा करण्यासाठी हजर असल्याचे ते सांगतात. सामाजिक प्रबोधनातून नागरिकांमध्ये प्रदूषणाविरोधात जनजागृती करून नदी स्वच्छ, सुंदर व अविरत वाहण्यासाठी सर्वांचे विचारमंथन होण्यासाठी थोरात यांचे सांघिक प्रयत्न सुरू आहेत.
नदी आणि नागरी वस्ती जवळ असली की, नागरिकांचा नदीजवळील वावर अधिक वाढतो. नदीचा किनारा स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांना नदीपर्यंत धार्मिक विधीसाठी, पर्यटनासाठी, व्यवसायासाठी घाट आदी महत्त्वाचे आहेत. ‘घाट’ ही संकल्पना आताची नसून, शतकानुशतकांपासून चालत आली आहे व ती तितकीच आवश्यक आणि योग्यदेखील आहे. ‘घाट’ संकल्पनेमुळे नदी परिसर स्वच्छ राहण्यास व नागरिकांना नदीविषयी आस्था, प्रेम व्यक्त करण्यास खूप मदत होते, असे मत ‘नदीला घाट असावेत का,’ याविषयी बोलताना थोरात व्यक्त करतात.नद्यांमधील जलप्रदूषण थांबवण्यासाठी नदीकिनारी राहणार्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा घनकचरा नदीपात्रात फेकू नये. निर्माल्य हे नदीपात्रात न टाकता त्याचे खत होणे आवश्यक असल्याचे थोरात आवर्जून मांडतात. तसेच नदी ही आपली जीवनवाहिनी आहे, पृथ्वीवरील रक्तवाहिनी आहे. त्यामुळे नद्या सुरक्षित आणि विना-अडथळा प्रवाहित राहिल्यास आपल्याला आरोग्य संपन्नता प्रदान करतील, असा विश्वास मनात बाळगून, रोगराईमुक्त वातावरणात जगण्यासाठी नदी परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचे विचार थोरात आवर्जून नमूद करतात.
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. पण, खरोखरच सत्ता उपभोगत असताना, लोक लोकांसाठी जगत असताना पर्यावरणाचा किती विचार करतात? आजच्या पिढीने आपल्याबरोबर पुढच्या पिढीसाठी काय नैसर्गिक वारसा मागे ठेवायचा आहे, हा विचार तरुणांनी आताच करणे गरजेचे असल्याचे थोरात सांगतात.
स्थापत्य अभियंता आणि पर्यावरण यांचे नाते तसे पाहिले तर व्यस्त स्वरुपाचे. मात्र, उदय थोरात हे पर्यावरणस्नेही स्थापत्य अभियंता आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!