‘मोतीबाग’च्या मधुर आठवणी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2021
Total Views |

Motibagh _1  H



टप्प्याटप्प्याने बांधकाम करत आजची दिमाखदार वास्तू ‘भारतीय संस्कृती संवर्धक संस्था’ उभी आहे. या इमारतीसमोर ज्या छोट्याश्या वास्तूत संघाचे काम १९५१ साली सुरू झाले, ज्या वास्तूने संघाच्या अनेक प्रगतींचे टप्पे पाहिले, अनेक जुन्या-जाणत्या व्यक्तींचे पाय ज्या वास्तूला पवित्र करून गेले. ती इमारत मात्र आता मोडकळीस आली आहे, ती जीर्ण इमारत लवकरच पाडली जाणार आहे आणि नवीन रूपात, नवीन सोयीसुविधेसह सर्वांच्या दिमतीला हजर होणार आहे.
 
पुणे आणि पेशवे हे नाते जसे घट्ट, जेवढे जुने आहे, तसेच पुणे आणि वाडे हे नाते पण जुने आहे. त्याचमुळे ‘मोतीबाग’ची जुनी इमारत पाडली जाणार, हे वृत्त वृत्तपत्रात येताक्षणी, त्या इमारतीला भेट देण्यार्‍यांची गर्दी वाढली होती. मी पण त्याच गर्दीचा एक भाग होते. ‘मोतीबाग’च्या वास्तूत प्रवेश केल्यावर समोरच दृष्टीस पडते ती ‘भारतीय संस्कृती संवर्धक संस्थे’ची मोठी इमारत.
 
 
या इमारतीसमोरच एक जुनी इमारत १०० ते १०३ वर्ष जुनी आहे, जी आता पाडली जाणार आहे. संघाचे जुने जाणते कार्यकर्ते श्रीधरजी फडके जुन्या आठवणींमध्ये रमले होते आणि सर्वकाही जणू कालच तर घडले आहे, अशा ओघवत्या शैलीत सुरेख वर्णन करीत होते. मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.
 
 
कारण, जुन्या आठवणी तशाच असतात, मोहक, रंजक, मनाच्या खोल डोहात जपून ठेवाव्यात अशा आणि अशी एखादी ऐतिहासिक वास्तू पाडली जात असेल, तर नक्कीच जीव वरखाली होतो. पण प्रगतीसाठी काळजावर दगड ठेवून अशी जुनी जाणती माणसे नक्कीच त्याला सामोरी जात असतात.
 
 
संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे हे कार्यालय आहे. २७ सप्टेंबर, १९२५ रोजी नागपूर येथे संघाची स्थापना पूज्य हेडगेवारजी यांनी केली आणि बघताबघता संघाचे कार्य वाढू लागले. जागोजागी संघाच्या शाखा स्थापन होऊ लागल्या. पुणे शनिवार पेठेतही संघाची शाखा स्थापन झाली. अगदी सुरुवातीला ही शाखा शनिपारजवळ अगदी छोट्या जागेत होती, ज्याला राम कार्यालय म्हटले जात असे, तिथे होती.
 
 
संघाचे या शाखेचे कामकाज वाढू लागले, तशी मोठ्या जागेची आवश्यकता भासू लागली आणि (पेशव्यांच्या काळातील) बिवलकरांना जेव्हा ही वार्ता समजली, तेव्हा त्यांनी ही वास्तू संघकार्यासाठी दिली. साधारणपणे १९५१-१९५२ मध्ये एक लाखांपेक्षा कमी किमतीत ही वास्तू दिली गेली आणि तेव्हा पूर्ण रक्कम एकरकमी देणे शक्य नव्हते, तर दोन/तीन हप्त्यांमध्ये दिली गेली. या वास्तूत संघाचे काम चालू झाले. सुरूवातीला फक्त ही इमारत, त्याच्या समोर पत्र्याची शेड, एक-दोन छोट्या खोल्या, आवारात एक चिंचेचे झाड, एक भलीमोठी विहीर, एवढ्याच मालमत्तेवर संघाची शाखा सुरू झाली. मोकळ्या मैदानात शाखा भरत असे.
 
 
हे कार्यालय घेतले, त्याआधी या आवारात खासगी ‘गणेश मोटर सर्व्हिस’ म्हणून एक कार्यालय होते आणि यामार्फत बाहेर गावी जाणार्‍या प्रवाशांच्या साठी वाहनाची सोय केली जात असे. मात्र, नंतर एसटी रस्त्यावर धावू लागल्या आणि प्रवासी एसटीला पसंती देऊ लागले. साहजिकच, ‘गणेश मोटर सर्व्हिस’ची सेवा बंद पडली.
 
 
पुण्यात १२ जुलै, १९६१ रोजी पानशेत धरण फुटले आणि एकच कल्लोळ माजला. सगळीकडे पाणीच पाणी होते. मात्र, पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य होते, त्या काही कठीण दिवसांत संघाच्या कार्यालयातील ही विहीर सगळ्यांच्या मदतीला धावली. मोठेमोठे हंडे, घागरी, कळशा घेऊन दोन-तीन किमींच्या रांगेत लोक उभे होते आणि थंड, मधुर पाण्याने आपली तृष्णा भागवत होते. या विहिरीचे पाणी अवघ्या पंचक्रोशीने चाखले.
 
 
संघाने ही जागा घेतली. त्यानंतर सुरुवातीचा काही काळ ही जागा मंगल कार्यासाठीही वापरली आहे. बाबासाहेब सरदेशपांडे हे संघाचे जुने कार्यकर्ते ही व्यवस्था पाहत असत. त्यांचे ‘भारत दुग्धालय’ याच परिसरात होते. रामभाऊ म्हाळगी यांचा विवाहसोहळा तसेच ‘गोवर्धन कार्यालया’चे मालक मुकुंदराव लेले यांचा विवाहसोहळाही याच वास्तूमध्ये झाला होता.
 
 
१९६१च्या पुरानंतर या ठिकाणी असलेली पत्र्याची शेड पाडून त्या ठिकाणी स्वयंपाकघर बांधले गेले. कारण, दहा वर्षांत या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची वर्दळ चांगलीच वाढली होती. जागा अपुरी पडायला लागली होती. त्याच दरम्यान बैठका घेण्यासाठी एखाद्या सभागृहाची गरज लक्षात घेऊन समोरच्या मोकळ्या जागेत एक सभागृह बांधले गेले. मोरोपंत पिंगळे नावाचे हे ते सभागृह होय, तर कार्यकर्त्यांना मुक्कामी राहण्याच्या दृष्टीने पहिल्या मजल्याचे काही बांधकाम केले आणि खोल्या बांधल्या गेल्या.
 
 
१९८३ मध्ये अजून एक सभागृह बांधले गेले, ते ‘माधव सभागृह’ होय. २००३ मध्ये वरचा मजला बांधला आणि काही खोल्या तसेच ‘केशव सभागृह’ बांधले गेले, अवघ्या इमारतीची शान वाढली. टप्प्याटप्प्याने बांधकाम करत आजची दिमाखदार वास्तू ‘भारतीय संस्कृती संवर्धक संस्था’ उभी आहे. या इमारतीसमोर ज्या छोट्याश्या वास्तूत संघाचे काम १९५१ साली सुरू झाले, ज्या वास्तूने संघाच्या अनेक प्रगतींचे टप्पे पाहिले, अनेक जुन्या-जाणत्या व्यक्तींचे पाय ज्या वास्तूला पवित्र करून गेले. ती इमारत मात्र आता मोडकळीस आली आहे, ती जीर्ण इमारत लवकरच पाडली जाणार आहे आणि नवीन रूपात, नवीन सोयीसुविधेसह सर्वांच्या दिमतीला हजर होणार आहे.
 
 
श्रीधरजी फडके हे १९७५ पासून पूर्णवेळ संघाचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी कामानिमित्त विविध कार्यकर्ते येत असतात. त्यात प्रांतप्रचारक अण्णा वाळिंबे, देशभर कार्यासाठी भ्रमंती करणारे दिनेश कुलकर्णी, सोमनाथ खेडकर, शिरीष भेडसगावकर, रवी किरकोळे, क्षीरसागर (सांस्कृतिक वार्तापत्रे जबाबदारी सांभाळणारे), ताम्हणकर, तर कार्यालयीन जबाबदारी सांभाळणारे काही कार्यकर्ते या ठिकाणी असतात. ‘मोतीबाग’ची जुनी वास्तू जाऊन नवीन सुसज्ज जागेत संघाचे काम चालू होईल, पण इतिहास किंवा ऐतिहासिक वास्तूचा वारसा जतन करण्यासाठी पुणेकर नेहमीच अग्रेसर असतात, याची साक्ष म्हणजे आजची गर्दी होती.
 
 
 
-  सुलभा राजीव 
९९२३८६६५८०
@@AUTHORINFO_V1@@