‘राष्ट्रीयता’ भावना नाही, तर आद्यकर्तव्य : पामर्ती वेंकटरमणा

    25-Sep-2021
Total Views |

vividh 2_1  H x

“राष्ट्रीयता ही एक भावना नाही तर प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. अगदी सैनिकांप्रमाणे राष्ट्रभक्ती आपल्या नसानसांत भिनलेली हवी,” असे विचार प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ, लेखक आणि पुरस्कारप्राप्त कवी पामर्ती वेंकटरमणा यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. पामर्ती वेंकटरमणा यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, गेल्या कित्येक वर्षांपासून ‘पद्म’ पुरस्कारांसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात येत आहे. ते एक महान कवी आणि लेखक आहेत. त्यांचे साहित्य तुर्की, अरबी, बंगाली, तेलुगू, तामिळ, ओडिया, पंजाबी, इटालियन आणि स्पॅनिश अशा विविध भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. साहित्यिक क्षेत्रामधून मिळणारे सर्व उत्पन्न ते आशिया आणि आफ्रिकेतील वंचित मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करतात. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव, सनातन धर्म, निजामाच्या दागिन्यांचा वाद, साहित्यिक प्रवास अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती देताना मनमोकळा संवाद साधला आहे.

पामर्ती वेंकटरमणा घटनातज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, वित्त, व्यापार याचबरोबर सनातन भारतीय संस्कृतीचाही त्यांचा गाढा अभ्यास आहे. हैदराबादच्या निजामाचे मौल्यवान दागिने, राजवाडे जतन करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. काही राष्ट्रविरोधी गटांनी ही राष्ट्रीय संपत्ती परकीय शक्तींना विकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पामर्ती वेंकटरमणा यांनी कायदेशीर मार्गाने लढा दिला. राष्ट्रविरोधी गटाकडून करण्यात आलेल्या साम, दाम, दंड, भेद अशा सर्व प्रकारच्या विरोधाला न जुमानता, त्यांनी दीर्घ व कठीण न्यायालयीन लढाई लढून या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण केले. यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रजासत्ताक भारताला शरण येण्यासाठी निजामाला भाग पडले होते. त्यानंतर त्याच संपत्तीसाठी पामर्ती वेंकटरमणा यांनी दीर्घ लढाई लढून एक नवा इतिहास घडविला.

तुम्ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एक नामवंत वकील आहात. तेव्हा कायद्यासारख्या क्षेत्राकडून तुमचा साहित्याकडे प्रवास कसा सुरू झाला?

माझ्यासमोर येणारी बहुतांश न्यायालयीन प्रकरणे नेहमीच ‘अशक्यातली गोष्ट शक्य करून दाखवणे’ या प्रकारातली असतात. एक वकील म्हणून ही प्रकरणे हाताळताना मला मानवी दु:खाच्या विविध छटा बघायला मिळाल्या. प्रत्येकाची दुःख वेगळी, त्याची कारणं वेगळी. प्रत्येकाला न्याय द्यायला सामाजिक व्यवस्था अपूर्ण आहेत. खरंतर हेसुद्धा अनेकांच्या दुःखाचे कारण आहे. या सार्‍यांमध्ये एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की, न्यायव्यवस्थेपलीकडे जाऊन सदाचारी लोकांचे रक्षण करणारी एक अदृश्य शक्ती या सृष्टीत अस्तित्वात आहे. कोणत्याही परिस्थितीत सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवणं आवश्यक असतं. हे सारं समाजाला पटवून देण्यासाठी लेखन हा उत्कृष्ट पर्याय आहे. मात्र, तुमच्या लेखणीला विवेकाची जोड असायला हवी. वकिली करतानाही तुमची विवेकबुद्धी जागृत असणे आवश्यक आहे. थोडक्यात, या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.

तुम्ही सुप्रसिद्ध कवी आहात. तुमची कवितेची पुस्तकेदेखील खूप लोकप्रिय आहेत. तेव्हा काव्यलेखन करताना आपण कवितांची रचना आणि वर्गीकरण नेमके कसे करता?

माझ्या सर्व कविता ‘आध्यात्मिक’ कविता या प्रकारात मोडतात आणि त्यामागचा मूलभूत विचार म्हणजे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. सनातन धर्माचे अनन्य सार म्हणजे ब्रह्मतत्त्व. जर समाजात मानवता धर्म जपायचा असेल, तर प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सनातन धर्माचे आचरण करणे आवश्यक आहे.

तुमचे नवीन पुस्तक ‘द व्हिस्परिंग स्टार’ हे आधुनिक गूढ लघुकथांचे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या लेखनामागील प्रेरणा काय होती?

‘द व्हिस्परिंग स्टार’ हे पुस्तक म्हणजे माझी अत्यंत प्रिय रचना आहे आणि ती कायमच प्रिय राहील. ब्रह्मांडामध्ये अनेक अदृश्य शक्ती अस्तित्वात आहेत. रोजच्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये व्यस्त असणार्‍या माझ्यासारख्या बुद्धिजीवीला या अदृश्य शक्तींनीच प्रेरणा दिली. ही प्रेरणा माझ्या अंतर्मनापर्यंत पोहोचली आणि या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. या पुस्तकांमध्ये काही मार्मिक विचार सुस्पष्टपणे मांडण्यासाठी लघुकथांचा आधार घेतला आहे. जेणेकरून वाचकांना याचा अर्थबोध होईल. मला खात्री आहे, या कथांमधून अनेक जणांना त्यांच्या आयुष्यासंबंधित अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि त्यांच्या जीवनातले दुःख कमी होईल.

या पुस्तकाच्या लेखनादरम्यान घडलेले काही महत्त्वाच्या किंवा गमतीशीर प्रसंगांच्या काही आठवणी आहेत का?

मी मगाशीच सांगितलं की, हे पुस्तक मला सर्वात जास्त प्रिय आहे. यामधील प्रत्येक लघुकथा 365 दिवसांच्या कामाच्या व्यापात असताना लिहिली आहे. यासाठी कोणतीही वेळ मी निश्चित केली नव्हती की, त्यासाठी कोणता विशेष अभ्यास अथवा वेगळा विचारही केला नव्हता. जे सुचलं ते लिहित गेलो. गमतीची गोष्ट म्हणजे, 2020च्या ‘लॉकडाऊन’मध्ये मला या सर्व लघुकथांचं मुद्रितशोधन आणि इतर प्रकाशकीय संस्कार करण्यासाठी व्यवस्थित वेळ मिळाला. हे काम गेल्या तीन वर्षांपासून करायचं राहून गेलं होतं. खरं सांगायचं तर या पुस्तकाला ‘कोविड’पश्चात अधिक महत्त्व प्राप्त होईल. कारण, या काळात प्रत्येक जण आत्मपरीक्षण करायला लागलेला असेल. आत्मपरीक्षण करताना आयुष्याच्या अस्तित्वासंदर्भात अनेक प्रश्न पडतील. या सर्व प्रश्नांचे निराकरण हे पुस्तक करेल.

प्राचीन भारतीय संस्कृती आणि आधुनिक भारतामध्ये आपल्याला कोणता मूलभूत फरक जाणवतो?
प्राचीन भारतीय संस्कृती वैदिक उपदेशांवर आधारित होती म्हणून ती संस्कृती निरंतर टिकणारी आहे. आधुनिक भारतात नीतिमत्ता घसरत चालली आहे. कारण, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रगती सामाजिक मूल्य निर्धारित करते. पण, हे सारं क्षणभंगूर आहे. हळूहळू सनातन धर्माचा पुन्हा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फक्त भारत नाही तर संपूर्ण जग हा शोध घेत आहे.

‘द व्हिस्परिंग स्टार’ या पुस्तकाचा भारतीय भाषांमध्ये अनुवाद करून प्रकाशित करण्याची तुमची काही योजना आहे का?

हो, काही प्रमुख भारतीय भाषांमध्ये तसेच परदेशी भाषांमध्ये या पुस्तकाच्या अनुवादाचे काम सुरु आहे. अर्थात, अनुवाद होत असताना शब्दांचे भाषांतर होत असते. परंतु, विचार मात्र स्थिर राहतात, ते बदलत नाहीत.

भारतीय साहित्याबद्दल तुमचे काय मत आहे? विशेषतः मराठी साहित्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

भारतीय साहित्य म्हणजे साहित्यविश्वातील एक तेजस्वी तारा आहे. प्राचीन काळापासून म्हणजेच महर्षी वेद-व्यासांच्या काळापासून भारतीय साहित्य समृद्ध आहे. स्वातंत्र्यापश्चात पुरस्कार व्यवस्थेतील झालेल्या राजकारणामुळे साहित्याचा दर्जा घसरत गेला. परंतु, अलीकडच्या काळात पुन्हा एकदा भारतीय साहित्यविश्वाला नवसंजीवनी मिळू लागली आहे. तंत्रज्ञानामुळे आणि स्व-प्रकाशनाच्या सुविधेमुळे निःपक्षपाती लेखणी आकार घेत आहे. दिग्गजांची मक्तेदारी मोडली जात आहे. चांगल्या लेखकांच्या लेखनामुळे नेहमीच वैचारिक क्रांती होण्यास मदत होते.मराठी साहित्य तर निरंतर सुंदर आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात मराठी साहित्य म्हणजे घनघोर अंधारात प्रकाशाचा दिवा ठरला. समकालीन मराठी साहित्य तरुणाईला आणि चित्रपट निर्मात्यांना नेहमीच आकर्षित करतं. विचारवंतही नेहमीच साहित्याच्या नवनवीन रचनांना प्राधान्य देतात.

आपण एक यशस्वी वकील आणि अर्थतज्ज्ञ आहात. त्याचबरोबर प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ता, कवी आणि लेखकही आहात. तुम्हाला स्वतःला यापैकी कोणत्या रूपात पाहायला सर्वात जास्त आवडते?

एकाच डोक्यावर घातलेल्या या वेगवेगळ्या टोप्या आहेत. मला सर्वात जास्त भावतो तो माझ्यातला कवी आणि न्यायालयाच्या चार भिंतींमध्ये मानवाच्या कायदेशीर हक्कांसाठी लढणारा माझ्यामधील वकील. सर्व देशवासीयांच्या जीवनमानाची पुनर्रचनेच्या नियोजनाचे धोरण ठरवणे हेदेखील एक महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे विधितज्ज्ञाची भूमिकाही मला तितकीच महत्त्वाची वाटते.

मोबाईल आणि टॅब्लेटसारख्या गॅझेटमुळे मुलांच्या आणि तरुणांच्या वाचनाच्या सवयीवर वाईट परिणाम होतोय, असे तुम्हाला वाटते का?

निःसंशयपणे हो. पुस्तक हातात धरून वाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कोरं पुस्तक हातात घेणे, त्याचा सुगंध अनुभवणे, या अनुभूतीचं वर्णन शब्दात करता येणार नाही. शिवाय यामध्ये रेडिएशनसारखे दुष्परिणाम होत नाहीत. उलट एकाग्रता वाढते आणि नजर सुधारायलाही मदत होते. ग्रंथालयांची संख्या म्युझियमप्रमाणे झपाट्याने कमी होत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की, गॅझेट्स आपल्यासाठी, आपल्या सुविधेसाठी आहेत. आपण गॅझेट्ससाठी नाही.

निजामाच्या दागिन्यांसंदर्भात जो खटला चालू होता, त्याचं नक्की कारण काय होतं?

निजामाच्या संपत्ती संदर्भातील न्यायालयीन लढाई म्हणजे स्वतंत्र भारतापूर्वीचा समाज आणि त्यानंतरची भारतातील राजनीती यांच्यातील एक सेतू आहे. हा सर्वात वेगळा आणि मोठा खटला आहे. या खटल्यामध्ये जगातील तत्कालीन श्रीमंत माणसाच्या वारसांचे वैयक्तिक हक्क आणि नव्याने उदयास आलेल्या लोकशाही राष्ट्राचे सार्वभौमत्व अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.या खटल्याचे अनेक पैलू आहेत. दोन्ही बाजूच्या वकिलांचा मोठा गट या खटल्याशी जोडला गेलेला आहे. राजकुमारी फातिमा फौजिया (हैदराबाद-एच ईएच नवाब सर मीर उस्मान अली खान बहादूरच्या शेवटच्या निजामाची मोठी नात) यांचा मुख्य सल्लागार म्हणून माझ्याद्वारे दाखल करण्यात आलेला ऐतिहासिक खटला (ओपी1/92) लढताना, मुसलमान समाजातील महिलांचे हक्क आणि लोकशाहीमधील सर्वोच्च अधिकार यांचा पुन्हा वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास झाला. घटनेने दिलेल्या अधिकारांच्या पश्चातही मुस्लीम महिलांना अजूनही त्यांचे हक्क मिळविणे कठीण जात आहे. भारताचे लोहपुरुष, सरदार वल्लभाई पटेल यांच्यानंतर राष्ट्रीय संपत्ती वाचवण्याचे, तसेच महिलांच्या आत्मसन्मानाचे आणि त्यांच्या वारसाहक्काचे संरक्षण करण्याचे श्रेय या खटल्याला जाते. (ही केस म्हणजे खरंतर एक मोठी कहाणी आहे, याबद्दल सविस्तर माहिती पुन्हा कधी तरी सांगेन.)

भारतातील महिला सक्षमीकरणाच्या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटते? ते बदलण्याची गरज आहे का?

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमापासून सुरुवात करून महिला-सक्षमीकरणाचे योग्य धोरण विकसित करण्याच्या दृष्टीने भारताने एक पाऊल पुढे टाकले आहे. तथापि, सदोष सरकारी यंत्रणा भ्रष्टाचार, लिंगभेद, तसेच सुशिक्षित महिला व गृहिणींसमोरील पुरुषी वर्चस्वाचे आव्हान यामुळे सक्षमीकरणामध्ये अडथळे येत आहेत.महिला सक्षमीकरण हा शब्द केवळ सरकारी कार्यालये, अथवा मंत्रालयाच्या भिंतीवरील एक घोषवाक्य बनून राहू नये. सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील उद्योजकांनी आपल्या कार्यालयात महिलांचे स्वागत केले पाहिजे. आज भारतातील महिला शास्त्रज्ञ, सैनिक, व्यावसायिक, पत्रकार, न्यायाधीश, कारागीर, डॉक्टर, शिक्षक, संगीतकार, बस कंडक्टर आणि राजकारणी अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. याबद्दल मला प्रचंड अभिमान वाटतो. तरीही, ही फक्त एक सुरुवात आहे, असंच मी म्हणेन.

तुम्ही कायदेतज्ज्ञ आहात, त्याबरोबर वित्तीय क्षेत्राचाही तुमचा दांडगा अभ्यास आहे. अनेक सामाजिक कार्यांमध्येही तुमचा विशेष सहभाग असतो. या सर्वांसाठी वेळ काढताना तुम्ही स्वतःसाठी वेळ कसा काढता?
शिस्तबद्ध जीवनशैली प्रत्येक व्यक्तीला अष्टपैलू बनवू शकते. लहानपणापासून घर आणि शाळा दोन्ही ठिकाणी शिस्तबद्ध वर्तणुकीचे संस्कार झाले आहेत. मुळात मी ‘वर्कोहोलिक’ आहे, त्यात अविवाहित. त्यामुळे या सर्वांचे व्यवस्थापन मला सहज जमतं. सरळमार्गी विचार, दृढनिश्चय आणि दूरदृष्टीने आपलं काम केल्यास प्रगती आणि यशाचे सर्व मार्ग मोकळे होतात. या दगदगीच्या आयुष्यात सर्वांसाठी (अगदी तुमच्या हितशत्रूंसाठीही) थोडा वेळ काढून प्रार्थना केल्यास एक वेगळेच समाधान मिळते.

तुम्ही कायदेतज्ज्ञ आहात, देशहितासाठी तुम्ही विशेष कार्य करता. तरुण पिढीसाठी तुम्ही म्हणजे आदर्श व्यक्तिमत्त्व आहात. ‘राष्ट्रीयता’ या संकल्पनेबद्दल तुमचं मत काय आहे?

राष्ट्रीयता ही अभिमानाची आणि सन्माननीय अस्तित्वाची बाब आहे. आई-वडील आणि संततीबद्दल जेवढे निरपेक्ष प्रेम आणि जिव्हाळा वाटतो, तेवढेच निरपेक्ष प्रेम आपल्या मातृभूमीवरही करायला हवं
‘ब्रेन ड्रेन’ (आपला देश सोडून दुसरीकडे विस्थापित होणे.) ही परिस्थिती रोजगार, शिक्षण इत्यादींशी संबंधित चुकीची राजकीय धोरणांमुळे उद्भवली आहे, तरीही परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या मनात आपल्या मातृभूमीसाठी असणारी तळमळ बघून मला मनापासून आनंद होतो.

राष्ट्रीयता ही एक भावना नाही तर प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. अगदी सैनिकांप्रमाणे राष्ट्रभक्ती आपल्या नसानसात भिनलेली हवी. माझ्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणं, मला महत्त्वाचं वाटत असल्यामुळे मी सहज चालून आलेली आकर्षक परदेशी ऑफर नाकारली आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे. राष्ट्रीयता ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल कमीपणा वाटता कामा नये. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटलेल्या देशभक्तांनी नेहमीच राष्ट्रीयतेचा सन्मान केला. राष्ट्रीय एकात्मतेची भावना शून्य असलेल्या अफगाणिस्तानमध्ये आज काय परिस्थिती उद्भवली आहे, ते आपण पाहतच आहोत. त्यामुळे आपल्या राष्ट्रीयत्वाचा अभिमान बाळगा. वंदे मातरम्!

-मानसी जोशी

अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121