‘मॅड काऊ डिसीज’ : भारताने सावध राहण्याची आवश्यकता

    25-Sep-2021
Total Views |

mad cow disaese_1 &n

इंग्लंडमधील ‘सोमरसेट काऊ फार्म’मध्ये एका गाईला ‘मॅड काऊ डिसीज’ झाल्याने त्या देशातील पशुवैद्यक यंत्रणा गंभीर झाली आहे. इंग्लंडपाठोपाठ ब्राझील देशातही दोन गाईंना हा रोग आढळला आहे. हे लक्षात येताच त्या देशाने चीनला जाणारी त्यांची गोमांसाची निर्यात रोखली आहे. हा रोग संसर्गजन्य रोगासारखा वेगाने पसरणारा नाही. तरीही जगातील एकूण सव्वाशे लाख कोटी रुपयांच्या गोमांस व्यवहारापैकी निम्मा व्यवहार अनियंत्रित व बेकायदा चालतो. त्यामुळे त्याचा धोका नाकारता येत नाही. शिवाय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सारे जग सावध झाले आहे.

याबाबत भारताची स्थिती तर काही निराळी आहे. गेल्या सहा-सात वर्षांत गोविज्ञानाच्या आधारे अवघ्या दहा किलो शेणात एक एकराची शेती आणि कॅन्सर, किडनीसारख्या व्याधीतून वेदनारहित मुक्तीची शक्यता यामुळे भारतात गोजीवन हे फक्त धार्मिक दृष्टिकोनापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्याला राष्ट्रीय विज्ञानाचे स्वरूप येऊ लागले आहे.४० वर्षांपूर्वी प्रथम जगात मोठ्या प्रमाणावर पसरलेला ‘मॅड काऊ डिसीज’ या रोगाचा गोवंशातून गोमांसात आणि गोमांसातून माणसात प्रसार होतो. त्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे माणसाचे मज्जारज्जूसंस्थेवरील नियंत्रण जाते. ब्राझीलवरून जगातील ५० देशांना गोमांस निर्यात होते. तरी सर्वच आघाडीवर त्यांनी आणीबाणी जाहीर केलेली नाही, कारण चीनला जाणार्‍या गोमांसाच्या भागातच त्याची लागण झाली आहे. दोन वर्षांपूर्वीही ब्राझीलमधील एका गाईमध्ये हा प्रकार आढळल्या आढळल्या त्यांनी चीनची निर्यात रोखली हेाती आणि यावेळीही रोखली आहे. ‘मॅड काऊ डिसीज’ हा गाय-बैलांना होणारा रोग आहे. तो प्रामुख्याने त्या जनावरांच्या ‘सेंट्रल नर्व्हस सिस्टीम’वर परिणाम करतो. भारतात गोआधारित शेती सुरू झाली तर शेती तर सुधारणार आहेच. पण, दहा लाख कोटी रुपयांच्या रासायनिक खताऐवजी एक टक्क्यापेक्षा कमी खर्चातील गोजैविक खत वापरले जाणार आहे. त्यामुळे गोवंश (म्हणजे अगदी मोकाट गोवंशही) देशातील महत्त्वाचा घटक ठरणार आहे. त्याचा प्रसार जर गोमांसातून होणार असेल, तर भारतात गोमांसावर बंदीची आवश्यकता आहे.
काही वर्षांपूर्वी या रोगाने युरोपमध्ये मोठा काहूर माजला होता. याच आठवड्यात एक गाय त्या व्याधीने मेल्याचे लक्षात येताच ‘द अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड प्लॅनेट हेल्थ एजन्सी’ या जागतिक पातळीवरील संघटनेने जगातील गोमांस खाणार्‍या देशांना यावर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला आहे. या आजाराचा सध्या तरी इंग्लंड आणि ब्राझील सोडून अन्य देशांच्या पातळीवर कोणताही धोका नाही, तरीही आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, कारण, कोरोनाही एका प्राण्याच्या मांसाला नीट न हाताळण्यातून निर्माण झाला व जगभर पसरला. दोन वर्षे झाली तरी त्याची दहशत संपलेली नाही. सध्या ब्रिटनमध्ये या विषयाला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. एका गाईला तरी ही व्याधी का झाली याची कसून तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती ‘अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड प्लॅनेट हेल्थ एजन्सी’च्या पशुतज्ज्ञ ख्रिस्तीना मिडलमिस यांनी सांगितले. या व्याधीला शास्त्रीय नाव ‘बोविन स्पॉन्जीफॉर्म एन्सफेलॉपॅथी’ म्हणजे ‘मॅड काऊ डिसीज’ म्हटले जाते. आम्ही सध्या त्या परिसरातील ‘काऊ फार्म’ म्हणजे गोशाळांची फारच काळजी घेत आहोत. यापूर्वी २०१४ मध्ये ब्रिटनमध्ये पाच गाई या रोगाने मृत्युमुखी पडल्या होत्या.
हा रोग प्रथम १९८० मध्ये इंग्लंडमध्येच आढळला होता आणि तेथून जो युरोपभर पसरला होता. सध्याच्या कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर या घटनेची जगभर गांभीर्याने दखल घेतली जात आहे.

- मोरेश्वर जोशी