इंजिनिअर ते उद्योजक

    24-Sep-2021
Total Views |
मुंबईमध्ये जो कोणी येतो त्याची स्वप्ने पूर्ण होतात. मात्र, आपण बाहेर नोकरी करत भटकतोय, हे दिपक यांना कुठेतरी मनात खटकायचं. आयुष्यात जर मोठ्ठं काही करायचं असेल, तर ते नोकरीमध्ये शक्य नव्हतं. त्यासाठी स्वत:चा उद्योग-व्यवसाय करणेच योग्य आहे, हे त्यांना उमजले होते. लग्न झाले होते. चांगल्या पगाराची नोकरी सोडून उद्योग करणे, खरेतर धाडसाचे होते. घरी सांगितले असते, तर या अनिश्चिततेला त्यांनी नकारच दिला असता. सारासार विचार करुन त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले. ती मात्र त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली. दिपकना आभाळाएवढा आधार वाटला. २००३ मध्ये ‘डेल्टा इंजिनिअरिंग’ कंपनी सुरू झाली.
नुकताच ‘अभियांत्रिकी दिन’ भारतात साजरा झाला. भारताचे अभियांत्रिकीतील सर्वोच्च नाव म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी १९५५ साली ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर ब्रिटनच्या राजानेदेखील त्यांना सन्मानित केले होते. त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय अभियांत्रिकी दिन’ म्हणून साजरा केला जातो. अभियंत्यांमुळे मानवी जीवन सुसह्य झाले आहे. उद्योजक अभियंता होईल की नाही, हे सांगता येणार नाही. पण, अभियंता नक्कीच उद्योजक होऊ शकतो. अभियंता असलेले असे अनेकजण आज यशस्वी उद्योजक म्हणून समाजात प्रस्थापित आहेत. अशाच उद्योजकांपैकी ‘ते’ एक. इंजिनिअरिंग क्षेत्रात 11 वर्षांचा अनुभव घेतल्यावर त्यांनी स्वत:चा उद्योग सुरू केला. काही कोटी रुपयांची उलाढाल करत त्यांची ही उद्योजकीय वाटचाल सुरू आहे. हे अभियंता उद्योजक म्हणजे ‘डेल्टा इंजिनिअरिंग’ कंपनीचे दिपक खंडागळे.
पांडुरंग खंडागळे आणि प्रमिला खंडागळे हे दाम्पत्य उमरखाडी मुंबईमध्ये राहायचे. पांडुरंग खंडागळे हे ‘नेव्हल डॉक’मध्ये ‘इन्स्ट्रुमेन्टेशन डिपार्टमेंट’मध्ये नोकरीस होते, तर प्रमिला संसाराला हातभार म्हणून वखारीमध्ये कामाला जात. या दाम्पत्यास एकूण चार मुले. दोन मुली आणि दोन मुलगे. दिपक सर्वात लहान. शीव येथील ‘साधना विद्यालया’त त्यांचे शालेय शिक्षण झाले. खर्‍या अर्थाने या शाळेने दिपक यांच्यावर संस्कार केले. शाळेतील एक मस्तीखोर, पण नवव्या इयत्तेनंतर गुणी, अभ्यासू विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती. शालेय जीवनातले ते निरागस जीवन संपले. दहावीचा निकाल लागला. त्या काळात मध्यमवर्गात अभियांत्रिकी शाखेला अनन्यसाधारण महत्त्व होते. दिपक यांनी ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ची पदविका पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी डिग्रीसाठी प्रवेश घेतला. प्रचंड मेहनत घेतली. अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.
डिग्री करत असतानाच एका ‘कॅम्पस इंटरव्यूव्ह’मध्ये एका नामांकित ‘लार्सन अ‍ॅण्ड ट्युब्रो’ कंपनीसाठी दिपक यांची ‘शिकाऊ इंजिनिअर’ म्हणून निवड झाली. त्यावेळेस त्याला दरमहा साडेचार हजार रुपये, घर आणि जीप विद्यावेतनासोबत मिळत असे. जगद्विख्यात अशा त्या कन्स्ट्रक्शन कंपनीत ते ‘प्लान्ट अ‍ॅण्ड मशीनरी’ विभागात अनेक मोठ्या मशीन्समधील रिपेअर आणि मेंटेनन्समधील बारकावे शिकले. दोन वर्ष तिथे त्यांनी खूप मेहनत केली. दोन वर्षांनंतर त्याची दुसर्‍या मोठ्या कंपनीमध्ये किर्लोस्कर कंमिन्समध्ये निवड झाली. या कंपनीमध्ये फक्त दीड हजार रुपये पगार होता. पण, अभियांत्रिकीमध्ये आवश्यक असलेले ‘हेवी-ड्युटी इंजिन रिपेअरिंग’चे प्रात्यक्षिक ज्ञान त्याला या कंपनीत मिळाले. अवाढव्य क्रेन्स, जनरेटर बनविणार्‍या या कंपनीमध्ये ते अनेक गोष्टी शिकले. तिथेपण त्यांनी दोन वर्षे नोकरी केली.
त्यानंतर जेसीबी मशीन तयार करणार्‍या कंपनीमध्ये ते नोकरीस लागले. मोठे रस्ते आणि बांधकामासाठी प्रचंड मोठ्या जेसीबी मशीन्स कशा वापरल्या जातात, याचे बारकावे ते शिकले. तिथेदेखील दोन वर्षे ते रमले. कोणत्याही नोकरीमधला ‘कम्फर्ट झोन’ त्यांना मान्य नव्हता. ज्यावेळी त्यांना त्या कंपनीमध्ये काही शिकावयास उरले नाही असे वाटायचे, त्यावेळेस नवीन काहीतरी शिकण्यासाठी दुसरी कंपनी ते ‘जॉईन’ करत.
यानंतर ते जनरेटर तयार करणार्‍या एका बहुराष्ट्रीय ’होंडा जनरेटर’ कंपनीमध्ये रुजू झाले. या कंपनीमध्येच कदाचित त्यांच्या भावी उद्योगाची बीजे रोवली होती. इथे ते पाच वर्षे राहिले. जनरेटर मशीनचे अनेक प्रकार त्यांनी पाहिले, अभ्यासले. एकप्रकारे ते त्यातले ‘एक्सपर्ट’ बनले.याचदरम्यान त्यांचा स्मिता नावाच्या सुविद्य तरुणीसोबत विवाह झाला. अभियांत्रिकी शाखेतील ‘मास्टर्स डिग्री’ मिळवलेली ही तरुणी दिपक यांच्या नोकरदार ते उद्योजक या प्रवासाची साक्षीदार ठरली.
मुंबईमध्ये जो कोणी येतो त्याची स्वप्ने पूर्ण होतात. मात्र, आपण बाहेर नोकरी करत भटकतोय, हे दिपक यांना कुठेतरी मनात खटकायचं. आयुष्यात जर मोठ्ठं काही करायचं असेल, तर ते नोकरीमध्ये शक्य नव्हतं. त्यासाठी स्वत:चा उद्योग-व्यवसाय करणेच योग्य आहे, हे त्यांना उमजले होते. लग्न झाले होते. चांगल्या पगाराची नोकरी सोडून उद्योग करणे, खरेतर धाडसाचे होते. घरी सांगितले असते, तर या अनिश्चिततेला त्यांनी नकारच दिला असता. सारासार विचार करुन त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले. ती मात्र त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली. दिपकना आभाळाएवढा आधार वाटला. 2003 मध्ये ‘डेल्टा इंजिनिअरिंग’ कंपनी सुरू झाली. जोपर्यंत एक वर्ष होत नाही, तोपर्यंत घरी कळू द्यायचे नाही, असे त्याने मनाशी पक्क केले होते.
एवढेच नव्हे, तर नातेवाईक आणि मित्रांना पण त्यांनी सांगितले नाही. त्याकाळी मराठी माणसे उद्योग-व्यवसायात फार कमी होती. ‘उद्योगापेक्षा नोकरी बरी’ असे समजणार्‍यांचा तो काळ होता. आपले यश हेच इतरांसाठी प्रेरणा ठरेल, यावर दिपक यांचा विश्वास होता.उद्योग करताना भाड्याने जागा घेऊन करायचा, हे दिपकना मान्य नव्हतं. कारण, स्वत:ची जागा घेऊन व्यवसाय केला, तर त्या जागेसाठी जे कर्ज घेतले ते फेडण्यासाठी माणूस जीवाचे रान करतो. त्यामुळे उद्योगात तो यशस्वी तर होतोच, पण एक मालमत्ता त्याच्या मालकीची होऊन जाते, हे गणित त्यामागे होते. साहजिकच हे दिपक यांचं स्वत:चं गणित होतं.

स्वत:ची काही साठवलेली जमापुंजी आणि बँकेतून घेतलेलं कर्ज असं मिळून दिपक खंडागळे यांनी ठाण्यात एक गाळा घेतला.दोन माणसे सुरुवातीला कामाला होती. २००५मध्ये लोडशेडिंगमध्ये अचानक खूप वाढ झाली. मात्र, ही समस्या ‘डेल्टा’साठी संधी ठरली. ‘इन्व्हर्टर’ आणि ‘जनरेटर’चा व्यवसाय वाढला. घर असो वा मोठ्या इंडस्ट्री त्यासाठी लागणारे ‘जनरेटर्स’, ‘इन्व्हर्टर्स’ ‘डेल्टा’ पुरवू लागली.२००८ मध्ये जागतिक मंदी आली. मात्र, मंदीमध्ये संधी शोधत ‘एअरकंडिशन रिपेअर’ आणि ‘सर्व्हिसिंग’ हा नवीन विभाग त्यांनी सुरू केला. घरातला एसी असो वा मोठ्या कंपनीचे (अ‍ॅडक्टेबल तसेच व्हीआरव्ही) ‘एसी डेल्टा’ सगळ्यांसाठी तारणहार ठरली.


विक्रीनंतर जी सेवा लागते ती चोख देण्यावर कंपनीने भर दिला. परिणामी, अनेक ग्राहक कंपनीसोबत जोडले गेले. अनेक कंपन्या तर वर्षभराचे करार कंपनीसोबत करू लागल्या. आज ‘डेल्टा ११ ’पेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि २० पेक्षा अधिक लोकांना अप्रत्यक्ष रोजगार देते.या सगळ्या उद्योजकीय प्रवासात त्यांना कुटुंबीयांनी मोलाची साथ दिली. त्यांची पत्नी स्मिता एका महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. ईशा ही कन्या ‘फायनान्स’ आणि ‘अकाऊंट’ या विषयात पदवी वर्गात शिकत आहे. मुलगा अवधूत आता आठवीत शिकतोय.“प्रत्येक व्यक्तीकडून, संस्थेकडून काही न काही शिकण्यासारखे असते. ते मी शिकून इथपर्यंत पोहोचलोय. व्यवसाय आणखी विस्तारायचा आहे, पण इतर उद्योजकांना सोबत घेऊन,” असे प्रांजळपणे दिपक खंडागळे आपल्या उद्योगाचे इंगित सांगतात. आपण आपल्या ऊबदार सुरक्षित कोशातून बाहेर पडलो, तर जे यश मिळते त्याची आपण कल्पनादेखील केलेली नसते, एवढे ते मोठे असते. दिपक खंडागळेंची यशोगाथा हेच अधोरेखित करते.