अरे, पेशंट्सचे बेड तयार आहेत का? रुग्णवाहिकेची आज ‘डिलिव्हरी’ होती. येतील ना वेळेवर? वॉर्डमधील ‘लाईट्स’ कधी लागणार? प्रत्येक रूममध्ये डॉक्टर आणि नर्स हवेत, हे सगळे संवाद कुठल्या हॉस्पिटलमधील नाहीत, तर लंडनजवळच्या ‘स्लाव्ह मित्र मंडळा’च्या (डचच्) यंदाच्या गणेशोत्सवाच्या देखाव्याच्या तयारीचे आहेत.भारतीय संस्कृती आणि परंपरा साहेबांच्या देशात जपण्याचा विचारांतून स्थापन केलेल्या ‘एसएमएम’चे हे ११ वे महत्त्वाचे वर्ष.
इंग्लंडच्या सरकारने १९ जुलैपासून संपूर्णपणे ‘लॉकडाऊन’ उठवण्याचा धाडसी निर्णय घेतला, तो इथली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सांभाळणार्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’च्या जोरावर. अत्यंत खंबीरपणे आणि धीराने गेले दीड वर्ष अहोरात्र ‘एनएचएस’चे डॉक्टर्स, नर्स आणि त्यांचे सहकारी कोरोनाच्या संकटाशी लढत आहेत. यावर्षीचा ‘एसएमएम’चा गणेशोत्सव हा त्यांच्या सेवेला दिलेली छोटी पोचपावती होती. ‘एसएमएम’नेसुद्धा विविध कार्यक्रमांतून आणि इतर सेवाभावी संस्थांमार्फत या कोरोना लढ्यात शक्यतोपरी हातभार लावला. काही दिवसांपूर्वीच मंडळाच्या सात समिती सभासदांनी स्थानिक हॉस्पिटलच्या देणगीसाठी एका उपक्रमाद्वारे २२मतास अखंडित सायकल चालवून अष्टविनायक यात्रेचे प्रतीकात्मक ४८९ किमी अंतर पूर्ण केले आणि १ लाख, २५ हजार रुपये निधी जमवला.
या वर्षी ‘एनएचएस’च्या हॉस्पिटलची प्रतिकृती हे गणपती देखाव्याचे प्रमुख आकर्षण होते. प्रवासाच्या वेगवेगळ्या अडचणींना तोड देत मुंबईमधून बाप्पाची सुबक मूर्ती सुखरूप पोचली तेव्हाच मंडळाच्या उत्सवाला बाप्पाचा आशीर्वाद मिळाला. मागील वर्षी ‘लॉकडाऊन’मुळे गणेशोत्सवाला मुकलेल्या भक्तांनी या वर्षी त्याची भरपाई केली. स्वयंसेवकांची मजबूत फळी, भक्तांकडून मिळणारी यथाशक्ती देणगी आणि प्रायोजकांचा पाठिंबा या ‘एसएमएम’च्या मोठ्या जमेच्या बाजू आहेत. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर मिरवणूक काढून मोठ्या दिमाखात बाप्पाच्या पालखीचे आगमन झाले. ‘स्लाव्ह’च्या देवळात अत्यंत उत्साहात पाच दिवस पार पडलेल्या उत्सवात सहस्रावर्तन, लहान-मोठ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि रोजच्या बाप्पाच्या आरतीला मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन भक्तांनी छान प्रतिसाद दिला. ‘एनएचएस’ च्या डॉक्टर आणि नर्स यांनीसुद्धा उपस्थित राहून त्यांचे अनुभव कथन केले आणि भाविकांना मार्गदर्शन केले. देवळाच्या आवारातच बांधलेल्या मंडपात वाटलेल्या महाप्रसादाचा जवळपास १५०० भाविकांनी लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे बाप्पाचा विसर्जन सोहळा जवळच्याच ‘ज्युबिली’ नदीवर पार पाडून या वर्षीच्या उत्सवाची सांगता झाली. गेले वर्षभर न झालेल्या मित्रमंडळींच्या भेटीगाठी या उत्सवाच्या निमित्ताने घडून आल्या. भाविकांना आता सर्वकाही पूर्ववत होणार आहे, असे संकेतच जणू बाप्पाने दिल्याचे कुठेतरी जाणवले आणि त्यांनी एका वेगळ्याच समाधानाने बाप्पाला निरोप दिला.
- अजय मुरुडकर