तणावाच्या अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे वा त्याचा प्रतिकार कसा करायचा, हे एक जबरदस्त आव्हान खेळाडूंच्या समोर उभे ठाकलेले असते. उच्च प्रतीच्या राष्ट्रीय व जागतिक खेळांच्या मॅचेस किंवा अॅथलेटिक स्पर्धेतयश आणि अपयश हे अतिशय छोट्या फरकामुळे मिळत जाते. विशेषतः खेळाडूंची तांत्रिक, शारीरिक आणि विधायक क्षमता किती आहे आणि त्याचा ते मैदानावर खेळताना किती सशक्तपणे वापर करतात, यावर त्यांचे यश अवलंबून असते.
तणाव हा हल्ली प्रत्येक पेशामध्ये आपल्याला दिसून येतोच. इतकेच काय तर विद्यार्थी, इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक, गायक, कलाकार मंडळी किंवा खेळाडू या सगळ्यांच्या आयुष्यातही तणाव प्रचंड उलथापालथ निर्माण करतो. खेळाडूंच्या आयुष्यात तणावाचे महत्त्व यासाठी की, त्यांना मर्यादित वेळात जबरदस्त ‘परफॉरमन्स’ द्यायचा असतो. त्यांची खेळी ही केवळ त्यांच्यापुरतीच मर्यादित नसते, तर त्या स्पर्धेसाठी, देशासाठीही तितकीच महत्त्वाची असते. शिवाय त्या खेळाचे, स्पर्धेचे पडसाद खूप काळासाठी खेळाडूंवर पडत असतात. एखाद्या खेळाडूचे आयुष्य तो जर त्याक्षणी चमकला नाही, तर कायमसाठी काळोख्या गुहेत गडप होऊ शकते. अलीकडच्या संशोधनात तर असे सिद्ध झाले आहे की, मानसिक तणाव खेळाडूची ताकद आणि कौशल्य यांचे पुनर्वसन करण्यात अडथळे आणू शकतो. काहीवेळा जर खेळाडूंकडे आवश्यक लवचिकपणा नसेल, तर त्यांना तणावाचा प्रतिकार करणे अवघड जाते. पर्यायाने त्यांच्या विश्लेषणात्मक वैचारिक प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते. एक खेळाडू म्हणून जगणं सोप नसतं. सामान्य माणसाच्या तुलनेत या खेळाडूंच्या शारीरिक गरजा जास्त तर असतातच, शिवाय स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये त्यांना प्रखर मानसिक दबावाला सामोरे जावे लागते. बर्याच खेळाडूंना यामुळे शारीरिक आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामनाही करावा लागला.
ब्रिटिश टेनिसपटू एमा जेव्हा या वर्षी विम्बलडनमधून वयाच्या अठराव्या वर्षीच बाहेर पडली, तेव्हा तिला श्वासाचा गंभीर त्रास आणि चक्कर येण्याच्या लक्षणांनी घेरले होेते. आपण त्या स्पर्धेत फार काळ तग धरू शकणार नाही, हे तिच्या लक्षात आले आणि ती अस्वस्थ झाली. ती मैदानातून निघून गेली आणि पुन्हा खेळायला मागे आलीच नाही. तिला आपला श्वास नियमित करताच येत नव्हता. नंतर हळूहळू ती शांत झाली आणि तिला बरे वाटू लागले. यावर्षीचीच घटना ही. पण, खेळाभोवती जो झगमगाट आणि प्रसिद्धीचे वलय निर्माण झाले आहे, त्यात स्वतःचा टिकाव धरताना खेळाडू प्रचंड मानसिक दडपणातून जात असतात. आता ती पुन्हा मैदानात उतरेल तेव्हा तिला मानसिक तणावाला कसे सामोरे जायचे, यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. खेळाच्या मैदानात खेळ खेळताना येणारा तणाव, दबाव तसा टाळता येण्यासारखा नसतो. पण, तणावाच्या अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे वा त्याचा प्रतिकार कसा करायचा, हे एक जबरदस्त आव्हान खेळाडूंच्या समोर उभे ठाकलेले असते. उच्च प्रतीच्या राष्ट्रीय व जागतिक खेळांच्या मॅचेस किंवा अॅथलेटिक स्पर्धेतयश आणि अपयश हे अतिशय छोट्या फरकामुळे मिळत जाते. विशेषतः खेळाडूंची तांत्रिक, शारीरिक आणि विधायक क्षमता किती आहे आणि त्याचा ते मैदानावर खेळताना किती सशक्तपणे वापर करतात, यावर त्यांचे यश अवलंबून असते. तसे पाहिले तर ‘ऑलिम्पिक’, ‘कॉमनवेल्थ’, ‘एशियन’ खेळ स्पर्धा, ‘टेनिस चॅम्पियनशिप’ वा ‘बॅडमिंटन चॅम्पियनशिप’, ‘क्रिकेट वर्ल्डकप’, ‘टी-२०’ स्पर्धा यामध्ये निवडलेल्या खेळाडूंची तांत्रिक क्षमता आणि सामर्थ्य यामध्ये तुल्यबळता असते. अंतिम फेरीत पोहोचलेल्या खेळाडूंसाठी या उच्च शिखराच्या टोकावर असणार्या संधी साहजिकच नित्यासंबंधी आणि खेळाच्या तयारीचा अविभाज्य घटक असतात. पण, या संधीबरोबर येणारा जबरदस्त तणाव ते कसा सांभाळतात, त्यावर ते त्या उत्कटक्षणी मात करू शकतात का नाही, यावर विजयपताका आकाशात झळकणार की नाही, याचा निर्णय ठरतो.
आपण यावर्षी ‘ऑलिम्पिक’मध्ये सिमॉन बाईल या खेळाडूने टोकियोला ‘ऑलिम्पिक’च्या ‘फायनल इव्हेंट’मधून माघार घेतल्याची बातमी ऐकली. ती अतिशय प्रसिद्ध ‘जिमनॅस्ट’ आहे. तिने रिओमध्ये चार वर्षांपूर्वी जवळजवळ सगळी सुवर्णपदकं मिळवली होती. तिच्या खेळाबद्दल आणि अफाट क्षमतेबद्दल कोणालाच कणभरही संशय नव्हता. खेळापूर्वीच सुवर्णपदकाची खात्री देणार्या खेळाडूंपैकी ती एक आहे, पण तिला तणावाचा प्रचंड मानसिक त्रास झाला. तिच्या मनामध्ये ‘मेंटल ब्लॉक’ असल्यामुळे तिला ‘जिमनॅस्टिक’ची खेळी करताना आपले शरीर हवेत नेमके कुठे स्थिरावते आहे वा कुठे भरकटते आहे, याची इतक्या वर्षांची सवय असूनसुद्धा अंदाज लागत नव्हता. स्पर्धेतून बाहेर पडायचा निर्णय खरंच ‘सिमॉन’साठी महत्त्वाचा आणि धैर्याचा होता. एखाद्या जगतजेत्या खेळाडूने असा निर्णय घ्यायचे, हे अत्यंत धाडसाचे पाऊल आहे. तिने कदाचित खूप ऐहिक नुकसान सहन केले असेल, पण ती खेळाच्या या बाह्य चकाकीत वाहून गेली नाही. आपल्या मानसिक आरोग्याला तिने इतर सर्व गोष्टींपेक्षा प्राधान्य दिले. आपल्या मनाचा समतोल राखला. थकलेल्या आणि खेळाच्या व्यावसायिक दुनियेत या ‘जिमनॅस्टिक’ने स्वत:चा ‘बॅलन्स’ राखला, यात तिची प्रगल्भ निर्णयक्षमता दिसून येतेच. सिमॉन चार वेळा ‘ऑलिम्पिक’मध्ये सुवर्णपदक विजेती आहे. स्वत:च्या भावनिक आणि मानसिक स्वास्थ्याला मूलभूत महत्त्व देणार्या सिमॉनचा हा निर्णय पूर्ण जगासाठी दिशादायक आहे.
मानसिक आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. तुम्ही जेव्हा मानसिक आरोग्याची काळजी घेता, तेव्हा तुम्ही स्वत:च्या संपूर्ण अस्तित्वाची काळजी घेता.
- डॉ. शुभांगी पारकर