मुंबई : इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंडचा चौथा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. पहिल्या ३ कसोटींमध्ये भारतीय संघाने १ - १ अशी बरोबरी साधल्यानंतर चौथ्या कसोटीमध्ये तरी काही बदल अपेक्षित होते. सध्या कसोटीमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आर. अश्विनला पुन्हा एकदा चौथ्या सामन्यात स्थान न दिल्याने क्रिकेटप्रेमी चांगलेच संतापले आहेत.
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट कोहलीने संघात दोन बदल केले. यावेळी सर्वांना चौथ्या सामन्यात भारतीय फिरकीपटू आर. अश्विन असेल अशी अपेक्षा होती. मात्र, विराटने मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्या जागी शार्दुल ठाकूर आणि उमेश यादवचा संघात समावेश केला. याच निर्णयानंतर भारताने पुन्हा अपेक्षित बदल केले नाहीत, यामुळे सोशल मिडीयावर कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापनावर टीका करण्यास सुरुवात केली.
एकाने ट्विट केले आहे की, "कोहलीने म्हंटले होते की, इंग्लंडच्या संघात ४ डावखुरे फलंदाज आहेत. तर रवींद्र जडेजासाठी हे चांगले आहे. पण अश्विनने २००हून अधिक डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले आहे." तर एकाने म्हंटले आहे की, "जर सर्वोत्तम जागतिक गोलंदाजांला एखादा कर्णधार अंतिम ११मध्ये जागा देत नसेल तर मग त्याने कर्णधार पद सोडायला हवे." असे म्हणत विराटवर टीका केली आहे.
एका ट्विटर युझरने मिर्झापूर या वेब सिरीजमधील एका प्रसिद्ध संवाद टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर दुसरीकडे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी ट्विट केले आहे की, "अश्विन शिवाय पुन्हा एकदा भारत मैदानात उतरतो आहे. मी आशा करतो की, हे काम करेल."
तर समालोचक आकशा चोप्रा याने सांगितले आहे की, "जडेजाला एक गोलंदाज म्हणून अश्विनच्या बदल्यात निवडलेले नाही. तर तो एक उत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. ५ गोलंदाजांच्या रणनीतीचा विचार करता संघात संतुलन ठेवण्यासाठी त्याची निवड केली गेली आहे." असे स्पष्टीकरण दिले आहे.