नवी दिल्ली : तामिळनाडू विधानसभेत द्रमुक सरकारने वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतून (NEET) सूट देणारे विधेयक पारित केले. भाजप वगळता सर्वच पक्षांनी या विधेयकाला पाठींबा दर्शवला. त्यामुळे आता १२ वीच्या गुणांवर आधारित एमबीबीएस, बीडीएसमध्ये प्रवेश मिळणार आहे. परंतु,एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत असताना दुसरीकडे काहींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
विधानसभेत पारित झालेल्या या विधेयकानुसार सरकारला त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांना केंद्रीकृत परीक्षेऐवजी वैद्यकीय प्रवेशासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून द्यायचे आहेत. याबाबती राज्य सरकारचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. “आम्ही सत्तेवर येताच नीट परीक्षा रद्द करण्यासाठी पावले उचलली. १२ वीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे.”, असे मुख्यमंत्री स्टालिन यांनी विधेयक मांडताना सांगितले होते.