जान मोहम्मदचे डी कंपनीशी संबंध : एटीएस

राज्यातील एटीएस प्रमुख विनीत अगरवाल यांनी घेतली पत्रकार परिषद

    15-Sep-2021
Total Views |

ATS_1  H x W: 0
 
मुंबई : दिल्लीमध्ये दिल्ली पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना अटक केली. यामध्ये मुंबईतील धारावीत राहणाऱ्या जान मोहम्मद अली मोहम्मद शेख याचादेखील समावेश आहे. यासंदर्भात महाराष्ट्रामध्ये वातावरण तापले असून 'राज्यातील एटीएस झोपली होती का?' असा प्रश्न विचारला जात आहे. यावर महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेत याबाबतीत अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये त्याचा दुबईतील डी कंपनीशी संबंध असल्याचे देखील एटीएसकडून सांगण्यात आले आहे.
 
 
एटीएस प्रमुख विनीत अगरवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे की, "मुंबईतील धारावीत राहणारा जान मोहम्मद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो गेल्या २० वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात होता. मात्र, या प्रकरणाची माहिती आमच्याकडे नव्हती. ही माहिती दिल्ली पोलिसांना केंद्रीय एजन्सींनी दिली. ९ तारखेला त्याने दिल्लीला जाण्याचे नियोजन केले. पण त्याचे तिकीट कन्फर्म होत नव्हते. मग १३ तारखेला 'गोल्डन टेम्पल एक्सप्रेस'साठी त्याने वेटिंग तिकीट घेतले. संध्याकाळपर्यंत त्याचे तिकीट कन्फर्म झाले. तो एकटाच तिथून ट्रेनने निघाला. ट्रेन कोटाला पोहोचली, तेव्हा त्याला अटक करण्यात आली."
 
 
"त्याच्याकडे कोणतीही स्फोटके, शस्त्र नाही मिळाली. जी काही माहिती आहे, ती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमचे एक पथक बुधवारी संध्याकाळी दिल्लीला जाऊन जान मोहम्मदची चौकशी करणार आहेत. दिल्ली पोलीस आणि आमच्यात माहितीची देवाण-घेवाण होईल." असेदेखील एटीएस प्रमुख अगरवाल यांनी सांगितले. "मोहम्मद जानच्या हालचालींवर एटीएसचे अनेक वर्षांपासून लक्ष होते. गेल्या अनेक दिवसांपासून तो आमच्या रडारवर होता. २० वर्षांपूर्वी पायधुनी पोलीस स्थानकात त्याच्याविरुद्ध एक केसदेखील आहे. या प्रकरणात एटीएसच्या हाती अपयश आले असे म्हणता येणार नाही. तसेच, पोलीस दलात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसून त्यांच्यावर कोणताही दबाव नाही." अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वी दिली आहे.