जेव्हा उच्चशिक्षित, एक विशिष्ट दृष्टिकोन घेऊन मनाने पवित्र असणारे लोक समाजकार्यात पुढाकार घेतात, तेव्हा त्या कार्याची जागतिक पातळीवरही दखल घेतली जाते. नाशिक येथील संदीप सुनीता श्रीधर भानोसे हे अशाच ध्येयनिष्ठांपैकी एक.
संदीप भानोसे यांचे शिक्षण बीई (इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग), एमबीए (एचआर), पीजीडीएम (मटेरिअल मॅनेजमेंट), क्वालिटी इंजिनिअरिंग, बटालाज लंडन येथून लीड ऑडिटर कोर्स, तीन वेळा व्यवस्थापनास केंद्रभूत ठेवून पीएच.डी त्यांनी केली आहे. गरुड पक्षी हा त्याच्या कोणत्या गुणांमुळे पक्ष्यांचा राजा आहे, हे केंद्रभूत ठेवून त्यावर भानोसे यांनी पीएच.डी केली आहे. एवढेच नाही तर गरुड पक्ष्याचे ७२ गुण तर कॉर्पोरेट क्षेत्रासाठीही महत्त्वाचे असल्याचे संशोधन भानोसे यांनी केले आहे.
यात त्यांनी गरुडाच्या ‘व्हिजन’, नियोजन क्षमता, निर्णय क्षमता, ध्येय निश्चिती आदी ७२ गुणांवर संशोधन केले आहे. आपल्या दुसर्या पीएच.डीत गरुडाचे ७२ गुण हे जगातील महान थोर पुरुषांच्या बाबतीत कसे प्रकट होतात, यावरही संशोधन करताना त्यांनी स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर आदी महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाचा व जडणघडणीचा खोलवर अभ्यास केला. गरुडाचे उद्योजकीय गुण त्यांनी अभ्यासले. तिसर्या पीएच.डीत या गुणांचे मोजमाप करण्यासाठी त्यांनी कार्य केले.
यासाठी प्रसंगी भारतभ्रमणही त्यांनी केले. महापुरुषांच्या गुणांचे मोजमाप झाल्यास व्यक्तीला त्याची जीवनदिशा ठरवता येईल. हा हेतू डोळ्यांसमोर ठेवत भानोसे हे मानवाच्या ३८ गुणांचे विश्लेषण करतात. त्यामुळे लोकांना त्यांची जीवनदिशा ठरवता येते. यामुळे करिअर निवडणेदेखील सोपे होते. भारतात ‘कलमापन चाचणी’ ही आठवी ते दहावीच्या पातळीवर होत असते. त्यापुढेदेखील संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत भानोसे व्यक्त करतात. व्यक्तीच्या क्षमता व्यक्तीने जाणून घेतल्यास तो निश्चितच गरुडझेप घेऊ शकतो, असा विश्वास भानोसे व्यक्त करतात.
म्हणूनच भानोसे यांच्या ‘गरुडझेप’ संस्थेकडे आजवर २२ जागतिक विक्रमांची नोंद आहे. त्यात सात विक्रम त्यांचे स्वतःचे आहेत. एवढ्यावरही न थांबता भानोसे आज स्वत:च स्वतःचे रेकॉर्ड्स तोडत आहेत. दि. २५ मार्च या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी २०१८ साली संकल्प सोडून वाहतूक सुरक्षेसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले. गेल्या काही वर्षांपासून ते पोलीस दलाला व्यवस्थापनाबाबत मोफत अध्ययन करत आहेत. वाहतूक समस्या ही जागतिक समस्या आहे, हे संशोधनातून भानोसे यांना जाणवले.
या विषयावर काम करण्यासाठी तत्कलीन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्यासोबत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. यासाठी भानोसे यांनी समाजिक संस्थांचा ग्रुप बनवून त्यांना याकामी पुढाकार घेण्याचे आवाहनही केले. परिणामी, नाशिकमधील विविध सामाजिक संस्थां एकत्र आल्या. या संस्थांचे स्वयंसेवक काही महत्त्वाच्या अशा १५० ते २५० ‘ब्लॅक स्पॉट’वर वाहतूक नियमावलीचे फलक घेऊन उभे राहिले व त्यांनी जनजागृती केली. तसेच लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांचे वाहतूक नियमांविषयी प्रबोधनही केले.
परंतु, आठ दिवसांनंतर काही समाजिक संस्थांनी या अभियानातून माघार घेतली. कालांतराने उर्वरित संघटनाही या मोहिमेतून बाहेर पडल्या. मात्र, भानोसे व त्यांच्या ‘गरुडझेप’चे यासंबंधीचे कार्य अविरत सुरू होते आणि आजही आहे. याच दरम्यान मुंबई नाका परिसरात भानोसे यांच्या डोळ्यांदेखत एक भीषण अपघात झाला. उपचारांची पराकष्ठा करूनही अपघातग्रस्त मुलगी वाचू शकली नाही, हे शल्य कायम मनात असल्याचे ते सांगतात. रुग्णवाहिका १५ मिनिटांनी आल्याने ती मुलगी मृत झाली. म्हणूनच आता भानोसे कधी मदतीची गरज पडेल, यासाठी सदैव स्वतःची कार सोबत बाळगतात. दि. १३ सप्टेंबर रोजी भानोसे यांच्या मोहिमेने १,२६९ दिवस पूर्ण केले आहेत.
नाशिक पोलिसांनी मोहिमेच्या १००व्या दिवशी गौरवपत्र देऊन ३२ कार्यकर्त्यांचा सत्कारही केला. भानोसे यांच्या या कार्याची जागतिक विक्रमात नोंद झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या कार्याबाबत भानोसे यांचा सन्मान केला आहे. ३५ वर्षांपासून भानोसे गड-किल्ल्यांची भ्रमंती करत आहेत. प्रतिवर्षी ते शिवनेरी व रायगडला भेट देत असतात. या भ्रमंतीदरम्यान भानोसे यांना गड-किल्ल्यांचे विद्रुपीकरण झाल्याचे जाणवले.
तसेच तेथील ऐतिहासिक वास्तूंचे मोजमाप होत नसल्याचे जाणवले, कचरा दिसला. यामुळे त्यांनी गड-किल्ल्यांच्या सफाईचे कार्य हाती घेतले. यासाठी त्यांनी पुरातत्त्व विभागाचे काही कोर्स केले, जे त्यावेळी खासगी स्वरूपात होते. ते करून शास्त्रीय पद्धतीने गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यास चालना दिली. सध्या नाशिक जिल्ह्यात ६५ शिवरायांचे किल्ले आहेत. त्यांचे संवर्धन करण्याचे काम भानोसे यांनी हाती घेतले आहे.
दर महिन्याला अनेक युवकांना सोबत घेऊन एका किल्ल्यावर जात भानोसे यांनी आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. तसेच, यामुळे अनेक अपरिचित किल्लेदेखील समाजाला सांगण्याचे कार्य भानोसे यांच्या माध्यमातून होत आहे. शिवरायांचे कार्य हे केवळ त्यांच्यासारखी वेशभूषा, केशभूषा करून नव्हे, तर त्यांच्या गड-किल्ल्यांना कचरामुक्त करत त्यांचे विद्रुपीकरण होणार नाही, याची काळजी घेत करणे आवश्यक असल्याचे भानोसे सांगतात. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!