गोल्डन बॉय नीरज चोप्रा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2021   
Total Views |


chopra_1  H x W


टोकियो ऑलिम्पिक २०२१मधील ‘भालाफेक’ या प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया...

 

 

सध्या टोकियो येथे होणार्‍या ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताचे अनेक खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. गेले १५ दिवस अपेक्षेप्रमाणे भारताला पदके मिळाली नव्हती. प्रत्येक खेळाडूने स्वतःच्या अडचणींवर मात करत ‘ऑलिम्पिक’मध्ये प्रवेश तर मिळवलाच, याशिवाय अनेक जगजेत्यांना टक्कर देत त्या-त्या प्रकारात भारताचे नाव उंचावले. सध्या असेच एक नाव चर्चेत आहे. ते म्हणजे, भालाफेकपटू नीरज चोप्रा. सध्या सुरू असलेल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये कारकिर्दीतील सर्वोच्च अंतर तर गाठलेच. तसेच, पदकासाठी सर्वात तगडा दावेदार म्हणूनही समोर आला. एक शेतकर्‍याचा मुलगा ते ‘ऑलिम्पिकपटू’ हा त्याचा प्रवास उल्लेखनीय आहे. जाणून घेऊया त्याबद्दल...

 
 
 
 

 

 

नीरज चोप्राचा जन्म २४ डिसेंबर, १९९७ रोजी हरियाणातील पानिपत येथे झाला. त्याचा जन्म पानिपत जिल्ह्यातील खांद्रा या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे वडील सतीशकुमार हे शेतकरी आहेत, तर आई सरोजदेवी या गृहिणी आहेत. त्याला पाच भाऊ-बहीण आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून होते. नीरजला तसा लहानपणापासूनच अभ्यासापेक्षा खेळांमध्ये जास्त रस होता. त्याने हरियाणामध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केल्यानंतर यादरम्यान अनेक खेळांमध्ये भाग घेतला. तसेच, चंदिगढमधील डीएव्ही महाविद्यालयातून तो पदवीधर झाला. शालेय शिक्षणादरम्यान वयाच्या ११ व्या वर्षी त्याने भालाफेकीचे तंत्र अवगत केले. सुरुवातीला त्याचे काका सुरेंद्र चोप्रा हे त्याचे वजन कमी करण्यासाठी आणि तो फिट राहावा म्हणून शिवाजी स्टेडियमवर घेऊन जात होते.

 

 तिथे त्याला अनेक क्रीडा प्रकारांची त्यांनी ओळख करुन दिली. तसेच, लांब उडी, उंच उडी अशा अनेक प्रकारांत त्याने प्रयत्न केल्यानंतर एकदिवस मैदानात काही मुले भालाफेकीचा सराव करत होती. यावेळी नीरज त्यांच्या रांगेत जाऊन उभा राहिला. तेव्हा तेथील प्रशिक्षकाने त्याला भालाफेकीसाठी विचारले. त्याने ते स्वीकारले आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने २५ मीटरचे अंतर गाठले. तेव्हा या खेळातील त्याची प्रतिभा ओळखून प्रशिक्षक जितेंद्र यांच्याकडून भालाफेकीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण त्याला मिळाले. यासाठी त्याच्या कुटुंबीयांनीदेखील प्रोत्साहन दिले. २०११ ते २०१५ पर्यंत त्याने पंचकुलाच्या ताऊ देवीलाल स्टेडियमवर भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात भालाफेकीचे कौशल्य अधिक परिपक्व केले. यावेळी त्याने एकाग्रचित्ताने, अभ्यासपूर्वक या प्रकारात पकड बनवली.

 

नीरज चोप्राने प्रशिक्षणादरम्यान अनेक छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. यावेळी प्रत्येक गेमनंतर त्याने आपल्या खेळामध्ये सुधारणा केली. २०१६ मध्ये तो प्रकाशझोतात आला. २०१६च्या ‘दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धे’त नीरजने ८२.२३ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. जिथे त्याने भारतातील राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली.

 

पोलंडमधील बायडगोस्झ्झ येथे झालेल्या २० वर्षीय ‘आयएएएफ विश्वचषक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये सुवर्णपदक पटकावले. एवढेच नव्हे, तर त्याने कनिष्ठ विश्वविक्रम प्रस्थापित केला. ८६.४८ मीटर भाला फेकून एक नवा विश्वविक्रम रचला. तरीही त्याची ‘रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये निवड झाली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता. मात्र, तरीही त्याने जिद्द सोडली नाही. दरम्यान, त्याच्या कामगिरीवरून भारतीय लष्करात त्याची नायब सुभेदार पदासह ‘ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर’ म्हणून निवड करण्यात आली. नीरजने ८५.२३ मीटर थ्रोसह ‘आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०१७मध्ये आणखी एक सुवर्णपदक जिंकले. २०१८ मध्ये नीरजने ‘राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धे’त पुरुष भालाफेक प्रकारात ८६.४७ मीटरचे अंतर पार करत हंगामातील सर्वोत्तम प्रयत्नांची नोंद केली. याचसोबत, ‘राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धे’च्या पदार्पणात सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारतीय खेळाडूंच्या सर्वोच्च यादीत आपले नाव समाविष्ट केले. तसेच, ‘राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धे’त भालाफेकमध्ये विजय मिळवणारा पहिला भारतीय बनला.

 

 

२०१८च्या मे महिन्यात नीरजने ‘दोहा डायमंड लीग’मध्ये ८७.४३ मीटर फेकून राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. २२ वर्षीय नीरज हा एकमेव ‘ट्रॅक’ आणि ‘फिल्ड अ‍ॅथलिट’ आहे, ज्याला ‘एएफआय’ने २०१८च्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्यानंतर २०१८ मध्येच त्याला ‘अर्जुन पुरस्कारा’नेदेखील गौरवण्यात आले. याचवर्षी ऑगस्टमध्ये ‘आशियाई क्रीडा स्पर्धे’त पुरुषांच्या भालाफेक फेरीत सुवर्ण जिंकण्यासाठी ८८.०६ मीटर अंतर फेकले आणि नवीन भारतीय राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्याने स्वतःचा विक्रम मोडीत नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने केलेल्या कामगिरीमुळे ‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये त्याची निवड करण्यात आली आणि पहिल्याच फटक्यात त्याने ८६.६५ मीटर अंतर पार करत पात्रता फेरीत पहिला क्रमांक पटकावला होता. अंतिम फेरीमध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने केलेल्या कामगिरीमुळे देशभरातून त्याचे चांगलेच कौतुक होत आहे. येत्या भविष्यातही त्याला असेच यश मिळत राहो, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...

 

 

 
@@AUTHORINFO_V1@@