एखादी गोष्ट परत परत केली तर तिचा कंटाळा येतो. सिनेमा पाहणे असो, पुस्तक वाचणे असो, फिरावयास जाणे असो, खेळणे असो किंवा इतर काहीही असो, ती गोष्ट परत करावयास कंटाळा येतो. मात्र, रामायण-महाभारत हे असे काव्य आहे, जे परत परत वाचावेसे वाटते. परत वाचताना त्यात एक नवाच अर्थ मिळत राहतो.
कितीही वेळा रामायण-महाभारताबाबत वाचन केले, कथा ऐकल्या, चर्चा केली तरी त्यात वेगळेच नावीण्य अनुभवयास येते. द्वापार युगात घडलेले महाभारत आज कलीयुगातही वाचावेसे वाटते. महाभारतातील कथेचा संदर्भ आजच्या काळाशी कसे वागावे, याचाही संदर्भ जुळतो. आजही ते सर्वांच्याच मनाला भावते. आपल्याशी संबंधित आहे, असेच वाटते. असे वाटण्याचे कारण, राज्य पुरस्कारप्राप्त बाल साहित्यिक डॉ. गणेश गोविलकर यांचे ‘शंभर श्रीकृष्ण कथा’ हे पुस्तक पाहावयास मिळाले. गोविलकर यांनी कोरोनाचे गेले वर्षभराचे कालावधीत घराबाहेर पडण्यास बंदी असल्यामुळे आपणास महाभारत कथेमध्ये गुंतवून घेतले होते. गेले वर्षभर त्यांनी महाभारतातील विविध कथांचे ऑडियो रेकॉर्डिंग केले. या कथा त्यांनी सोशल मीडियाचे माध्यमातून विविध ठिकाणी पाठविल्यात. प्रामुख्याने या कथा त्यांनी लहान मुलांकरिता सांगितल्यात. मात्र, मुलांपेक्षाही सर्वांनाच या कथांनी मोहून टाकले. या कथा सांगताना गोविलकरांनी फक्त त्या कथा सांगितल्या नाहीत, तर त्या कथांचे आजच्या काळात तात्पर्य काय हेसुद्धा आवर्जून सांगितले. त्यामुळे या कथा सर्वांनाच अत्यंत रोचक व आपल्या जीवनाशी संबंधित वाटू लागल्यात. कोरोना ‘लॉकडाऊन’च्या काळात शाळांनाही सुटी होती. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू होते. शिक्षणाबरोबर काहीतरी वेगळे देणे आवश्यक वाटू लागले होते. त्यामुळे या कालावधीत या कथा अनेक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाठवल्यात. त्यावर विविध प्रश्नमंजूषा कार्यक्रम झालेत. गोष्टींचा खजिना असा उपक्रम या कथांच्या माध्यमातून अनेक शाळांनी राबविला. पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करीत अभ्ाुतपूर्व असे स्वागतच केलेले आहे.
या सांगितलेल्या कथाच गोविलकरांनी पुस्तक रूपाने वाचकांच्या भेटीस आणल्यात. या कथा त्यांनी १४ भागांत विभागलेल्या आहेत. बासरी, पक्षी, राधा, रुक्मिणी, द्रौपदी, सत्यभामा, कर्ण, भीष्म, अर्जुन, युधिष्ठिर, दुर्योधन वध, कृष्णभक्त, कृष्ण अशा विविध १४ विभागांत या कथा विभागलेल्या आहेत. महाभारतातील ज्या व्यक्तीबद्दल आपणास कथा हवी असेल तो भाग काढला की, आपणास ती कथा मिळू शकेल. विभागसुद्धा खूप कल्पकतेने गोविलकरांनी पाडलेले आहेत. या १४ विभाग मिळून एकूण शंभर कथा होत असल्यामुळे पुस्तकाला ‘शंभर श्रीकृष्ण कथा’ असे खूप आकर्षक व प्रत्येकास उत्सुकता निर्माण होईल, असे सुंदर नामकरण केले आहे. या सर्व एकत्रित कथा म्हणजे महाभारतातील श्रीकृष्णाचे समग्र चरित्र दर्शनच घडते.
या कथा प्रामुख्याने लेखकाने लहान मुलांकरिता केलेल्या असल्या, तरी त्या सर्वच कृष्णभक्त व महाभारत अभ्यासकाला उपयुक्त अशाच आहेत. कथेची अत्यंत सोपी व आपली वाटेल अशी भाषा आहे. अत्यंत सोप्या व बोली भाषेमुळे सहजतेने त्याचे वाचन होते. कोठेही कंटाळवाणे वाटत नाही. पुस्तक हातात घेतल्यावर पूर्ण वाचन झाल्यावरच ते बाजूस केले जाते. पुस्तकातील कोणतेही पान उघडून वाचावयास सुरुवात केली, तरीही चालू शकते. पुस्तक लहान मुलांना भेट देण्यास योग्य असे आहे. तसेच प्रत्येकाच्या घरात व प्रत्येक शाळांच्या ग्रंथालयात हे पुस्तक असावे, असे उत्कृष्ट पुस्तक आहे. कोरोना ‘लॉकडॉऊन’च्या कालावधीचा योग्य तो उपयोग करून घेऊन हे पुस्तक वाचकांसमोर सादर केल्याने लेखकाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. गोविलकर आता रामकथांचा उपक्रम राबवित आहेत. गोविलकरांचे यापूर्वीही बालकांकरिता स्वातंत्र्य योद्ध्यावरील पुस्तक आलेले आहे. गोविलकरांकडून बालकांसाठी विविध विषयांवर पुस्तकरूपाने गोष्टींचा खजिना द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गोविलकरांना भावी उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव : १०० श्रीकृष्ण कथा
लेखक : डॉ. गणेश गोविलकर
प्रकाशक : श्री. बिपीन बाकळे, अल्टिमेट असोसिएट्स, नाशिक
पृष्ठसंख्या : २०८
किंमत : रु. २२०/-
संपर्क क्रमांक : ९८२२१९५९५२९
- शरद जाधव