शिवाजी महाराज ते नरेंद्र मोदी ही आपली परंपरा आहे. तेव्हा अफगाणिस्तानात तालिबानी काय करतात, याच्यावर नजर जरूर ठेवायला हवी. त्याची काळजीही करायला पाहिजे, पण आपण उत्तर देण्यास सशक्त आणि समर्थ आहोत. वैचारिकदृष्ट्यादेखील, लष्करी सामर्थ्यातदेखील आणि राजकीय इच्छशक्तीच्या संदर्भातदेखील.
अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता आपल्या हातात घेतलेली आहे. त्यांची सत्ता अजून स्थिर व्हायची आहे. आताचा कालखंड अस्थिरतेचा आहे. हा अस्थिर कालखंड किती काळ चालेल, हे सांगता येणार नाही. १९९० साली अफगाणिस्तानातून रशियाने माघार घेतली. रशियन सेनेशी लढण्याचे काम ‘मुजाहिद्दीन’ या इस्लामी गटाने केले. त्यांना सर्व प्रकारची मदत अमेरिकेने केली. सर्व प्रकारची मदत म्हणजे, आधुनिक शस्त्रास्त्रे, विमान आणि हेलिकॉप्टर पाडणारी स्टिंगर मिसाईल्स, गनिमी काव्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे, ज्यात दुर्बिणी, रात्रीच्या अंधारात दृष्टीसाठी वापरता येणारे चश्मे इत्यादी साहित्य येते. या अफगाण युद्धात अमेरिकेने १९८७ अखेरपर्यंत ६३० दशलक्ष डॉलर खर्च केले. ही अफाट रक्कम आहे. एवढ्या रकमेत किती शाळा आणि किती रुग्णालये, तसेच रस्ते-रेल्वेमार्ग बांधून झाले असते, याचा हिशोब आपल्या देशातील पुरोगाम्यांनी केला पाहिजे. कारण, ते यातले तज्ज्ञ आहेत.
‘मुजाहिद्दीन’ सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यात आपापसात मारामार्या सुरू झाल्या. ते वेगवेगळे गट आहेत. अफगाणिस्तान हा एकवंशीय देश नाही. तसाच एक भाषिक देश नाही. इस्लाम हा जरी ८५ टक्के लोकांचा मुख्य धर्म असला, तरी त्यांच्यात शिया, सुन्नी हे भेद आहेत. सुन्नीमध्ये वहाबी सुन्नी हा आणखी एक स्वतंत्र गट आहे. अफगाणिस्तानची भाषा एक नाही. पख्तुन, ताजिक, हजारा, तुर्कमेन, बलुच, उझबेक अशा भिन्न-भिन्न वांशिक गटाचे लोक अफगाणिस्तानात असतात. ते सर्व टोळ्या करून राहतात. टोळ्यांचेसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची नावे अशी आहेत- दुराणी, गिलझायी, वाझेरी, खटक, आफ्रिदी, मोहम्मद, युसुफझायी, सिनवारी इत्यादी. या टोळ्यांचे आणखी उपविभागात विभाजन झालेले असते. त्यांचीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत. सर्वांची भाषा एक नाही. ‘दारी’ ही अफगाणिस्तानची मुख्य भाषा आहे. पख्तुन लोकांची ‘पख्तु’ बोली आहे. तुर्की आणि उझबेक यांच्या भाषा वेगळ्या आहेत. भारतात ज्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात विविधता आहे. परंतु, तेवढीच आंतरिक सांस्कृतिक एकतादेखील आहे, ती अफगाणिस्तानात नाही. ‘मुजाहिद्दीन’ यांची विभागणी या सर्व गटात झाली होती. त्यांचे आपापसात रक्तरंजित संघर्ष सुरू झाले.
या संघर्षात सामान्य माणसं मरू लागली. अस्थिर राजवटीने भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराला जन्म दिला. लुटमार, खुन-बलात्कार सामान्य गोष्टी झाल्या. त्याविरुद्ध नवीन गट उभा राहिला. त्याचे नाव ‘तालिबान.’ तालिबान म्हणजे विद्यार्थी. या तालिबानी लोकांचा नेता होता मुल्ला मोहम्मद ओमर. तो पख्तुन जमातीचा होता आणि होटक टोळीचा होता. असे सांगतात की, सुरुवातीला मुल्ला मोहम्मद ओमरचे ४७ शिष्य होते. त्याची शिकवण अशी होती की, ‘शरिया’च्या आधारे राज्य निर्माण केले पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त आणि सुशासन निर्माण केले पाहिजे. ‘मुजाहिद्दीन’ राजवटीला लोकं वैतागले होते, त्यांना स्थिरता हवी होती. म्हणून तालिबानने जेव्हा हातात शस्त्र घेऊन कंदहार, जलालाबाद इत्यादी शहरांवर चाल केली, तेव्हा आजच्या प्रमाणे न लढता तेव्हाचे सैन्य त्यांना शरण गेले. त्यांच्या गटात सामील झाले. आपल्याकडील सर्व शस्त्रेसाठे त्यांना दिले आणि त्यानंतर तालिबान्यांची संख्या पुराच्या पाण्यासारखी वाढत गेली. शेवटी त्यांनी काबूलवर ताबा मिळविला आणि अफगाणिस्तानात त्यांची राजवट सुरू झाली.
राजवट सुरू झाल्यानंतर त्यांनी ‘शरिया’ कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. त्याचा फटका स्त्रियांना बसला. नखशिखांत बुरखा घालणे अनिवार्य झाले. शिक्षण बंद झाले. नोकरी-व्यवसाय बंद झाला. हे तालिबानी पाकिस्तानने निर्माण केले. तालिबानी निर्माण करण्यामागे पाकिस्तानचा विचार समजून घ्यायला पाहिजे. राष्ट्रवादाची भावना वाढली त्यामुळे पूर्व पाकिस्तान फुटून निघाला आणि त्याचा बांगलादेश झाला. पाकिस्तानात बलुची राष्ट्रवाद, सिंधी राष्ट्रवाद, पख्तुनी राष्ट्रवाद आहेत. या राष्ट्रवादावर ताबा मिळवायचा असेल आणि तो पुसून टाकायचा असेल, तर आपली ओळख फक्त इस्लामी झाली पाहिजे, असे धोरण जनरल झियाने ठेवले. अफगाणिस्तानात जर राष्ट्रवाद प्रबळ झाला, तर त्यापासून पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. जेवढे पख्तुन अफगाणिस्तान आहेत, तेवढेच ते पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रांतात आहेत. ते जर एकत्र आले, तर हा सर्व प्रदेश स्वतंत्र होईल आणि पाकिस्तानच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल. म्हणून इस्लामी जिहादी निर्माण करणे हे जनरल झियाने धोरण ठेवले. त्यातून तालिबानचा जन्म झालेला आहे.
हे तालिबानी निर्माण करण्यात अमेरिकेचा थेट संबंध नाही. अमेरिकेचा थेट संबंध ‘मुजाहिद्दीन’ निर्माण करण्यात आहे. तेव्हा अमेरिकेने मुसलमानांच्या डोक्यात हे भरून दिले की, हा संघर्ष देव न मानणार्या नास्तिक, पण तरीही ख्रिश्चन असलेल्या रशियाशी आहे. हा संघर्ष कम्युनिझम विरुद्ध भांडवलशाही, लोकशाही यांच्याशी आहे, असे अमेरिकेने सांगितले नाही. ही इस्लामी हवा मुजाहिद्दीनांच्या डोक्यात शिरली. सौदी अरब आणि अमेरिका यांनी या मुजाहिद्दीनांना अफाट लष्करी आणि आर्थिक साहाय्य केले. मुजाहिद्दीनांनंतरची सुधारित आवृत्ती म्हणजे तालिबान आहेत. याचा अर्थ असा झाला की, ‘मुजाहिद्दीन’ हे कडवे आणि तालिबानी हे अतिकडवे झाले.
सोव्हिएत रशियाला अफगाणिस्तानात रोखण्याचे सत्ताकारण एकोणिसाव्या शतकापासून चालू आहे. या सत्तासंघर्षाला, ‘द ग्रेट गेम’ असे नाव दिले जाते. रशियाने अफगाणिस्तानात येऊ नये, अफगाणिस्तान हा रशियन साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्य यांच्यामधील ‘बफर स्टेट’ असावा, असा हा या ‘ग्रेट गेम’चा मुख्य उद्देश होता. १९०७ साली रशियन साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्य यांच्यात करार होऊन अफगाणिस्तान हा दोन्ही साम्राज्यातील ‘बफर स्टेट’ राहील, असे ठरले. ‘बफर स्टेट’ याचा अर्थ असा होतो की, दोन महासत्तांच्या सीमा एकमेकांना लागून असू नयेत. दोन महासत्तांच्यामध्ये एखादा देश असावा, जो म्हटला तर स्वतंत्र, म्हटला तर तटस्थ राहील. त्याची तटस्थता भंग पावू नये म्हणून दोन्ही महासत्ता डोळ्यात तेल घालून लक्ष देऊन राहतात. १९७९ साली रशिया अफगाणिस्तानात शिरला. ‘ग्रेट गेम’चा पुढील अध्याय सुरू झाला. शेवटी रशियाला पराभूत होऊन अफगाणिस्तानातून माघार घ्यावी लागली. हा सर्व कालखंड शीतयुद्धाचा कालखंड आहे. अमेरिकेने या शीतयुद्धात रशियाचा पराभव केला. आपण युद्ध जिंकलो, या आनंदात ते मग्न झाले. अफगाणिस्तानला त्यांनी वार्यावर सोडून दिले.
तालिबान्यांची राजवट कोणते संकट निर्माण करेल, हे अमेरिकेला ‘९/११’, २००१च्या दहशतवादी हल्ल्यानंतरच लक्षात आले. न्यूयॉर्कमधील ‘ट्विन टॉवर्स’ उद्ध्वस्त झाले. ‘पेंटॅगॉन’वर विमान जाऊन कोसळले. काही तास अमेरिका स्तंभित झालेली होती, भयभीत झालेली होती आणि नंतर अमेरिकेचे अफगाण युद्ध सुरू झाले. ओसामा बिन लादेनला ठार करण्याचा प्रयत्न झाला. तालिबानी राजवट अमेरिकेने संपवली. २० वर्षे अमेरिका अफगाणिस्तानात गुंतून राहिली. या २० वर्षांत तीन ट्रिलियन डॉलर अमेरिकेने खर्च केले. २३०० अमेरिकन सैनिक ठार झाले. ३५ हजार अफगाणी सैनिक ठार झाले. एवढा प्रचंड पैसा खर्च करून आणि मनुष्यबळाची एवढी किंमत मोजूनही अमेरिकेला तालिबानी संपविता आले नाहीत. फेबु्रवारीत दोहा येथे तालिबानी आणि अमेरिका यांच्यात वाटाघाटी झाल्या आणि पुढील १४ महिन्यांत अफगाणिस्तान खाली करण्याचे अमेरिकेने जाहीर केले. पुन्हा अमेरिकेने अफगाणिस्तानला वार्यावर सोडून दिले आहे. तालिबानी कूच करत काबूलला आले. सरकारी सैन्याने त्यांना विरोध केला नाही. त्या सर्वांनी शस्त्रे खाली ठेवली. २० वर्षांपूर्वी ‘मुजाहिद्दीन’ यांच्या शासनाबाबत जे झाले, त्याची आता पुनरावृत्ती झालेली आहे.
हे तालिबानी शासन जगापुढे कोणते संकट उभे करेल, याची सध्या भरपूर चर्चा चालू आहे. इस्लामी दहशतवादी गटांचे संरक्षित आश्रयस्थान म्हणून अफगाणिस्तान राहील का? तसा राहिल्यास दहशतवादी हल्ले कुठे कुठे होतील? भारतावर त्याचे काय परिणाम होतील? युरोपातील देशांवर त्याचे काय परिणाम होतील? प्रत्यक्ष अमेरिकेवर दहशतवादी हल्ले होतील का? तालिबानी राजवटीमुळे स्थलांतरित अफगाणी लोकांचे जथ्थेच्या जथ्थे शेजारी देशांत जातील, त्यांचे करायचे काय? असे असंख्य प्रश्न उपस्थित झालेले आहेत.भारताचा विचार करता, भारतात तालिबानी सत्तेवर आल्यामुळे अनेक भयगंड लोकांचे ढाबे दणाणले आहे. तालिबान्यांचे संकट फार भीषण असून अनेकांनी कंदहार विमान अपहरणाची जुनी टेप वाजवली आहे. काश्मीरमध्ये तालिबानी घुसून ते दहशतमाजवतील, अशीही भविष्यवाणी अनेकांनी केली आहे. भारतीय मुस्लीम समुदायातील तरुण आणि तरुणी तालिबानमध्ये भरती होतील, तेही एक मोठे संकट असल्याची जाणीव या मंडळींनी करून दिलेली आहे.
तालिबानी राजवटीचा भारताला गंभीरपणे विचार करावा लागेल, ही गोष्ट खरी आहे. भारतावर जेवढी इस्लामी आक्रमणे झाली, ती सर्व अफगाणिस्तान मार्गाने झाली आहेत. अहमदशहा अब्दाली हा शेवटचा अफगाणी होता, ज्याने भारतावर स्वारी केली होती. (१७६१) हा इतिहास विसरणारे राज्यकर्ते आणि गांधीशांततेचे जपमाळ ओढणारे राज्यकर्ते आज सत्तेवर नाहीत, हे पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आज सत्तेवर असलेले राज्यकर्ते आपल्या सीमारक्षणाच्या बाबतीत अत्यंत जागरुक आहेत. ‘आपला एक मारला की त्यांचे दहा मारायचे,’ हे त्यांचे धोरण आहे. आपणहून कोणाला मारायचे नाही. पण, कोणी आपल्याला मारायला आला, तर त्याला जिवंत ठेवायचे नाही. त्याला जिवंत ठेवण्यासाठी गांधी उपवास करायचा नाही किंवा पंचशीलाची माळ जपायची नाही. हे या राज्यकर्त्यांचे धोरण आहे. आपण अशा शूर स्त्री-पुत्रांचे वंशज आहोत, ज्यांनी इतिहास काळात अशा दहशतवाद्यांनी हल्ला केला असता, त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलेले आहे. अफजलखान पठाणचे पोट छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडले. अटलबिहारी वाजपेयींनी कारगील युद्धात आक्रमक पाकिस्तान्यांना चोपून काढले आणि पुलवामा हत्येनंतर नरेंद्र मोदी यांनी बालाकोटवर हल्ला करून ३०० दहशतवादी ठार मारले. शिवाजी महाराज ते नरेंद्र मोदी ही आपली परंपरा आहे. तेव्हा अफगाणिस्तानात तालिबानी काय करतात, याच्यावर नजर जरूर ठेवायला हवी. त्याची काळजीही करायला पाहिजे, पण आपण उत्तर देण्यास सशक्त आणि समर्थ आहोत. वैचारिकदृष्ट्यादेखील, लष्करी सामर्थ्यातदेखील आणि राजकीय इच्छशक्तीच्या संदर्भातदेखील. भारताकडून कोणती वागणूक आपण स्वीकारायची, विश्वबंधुत्वाचा विचार घ्यायचा, सहकार्याचा हात स्वीकारायचा की कृष्णाचे सुदर्शन घ्यायचे, हे तालिबान्यांनी ठरवायचे आहे.