मुंबई (अक्षय मांडवकर) - आग्नेय आणि इशान्य आशियाई देशांमध्ये सापडणारी 'इरुरा' ही कोळ्याची पोटजात प्रथमच भारतात सापडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात संशोधकांना या पोटजातीमधील 'इरुरा मंदारिना' ही प्रजात आढळून आली. या संशोधनाच्या निमित्ताने भारतामधील 'जम्पिंग स्पायडर'च्या यादीत नव्या पोटजातीची भर पडली असून पश्चिम घाटाची जैवविविधता अधोरेखित झाली आहे.
'जम्पिंग स्पायडर' ही कोळ्यांची जात शरीरावरील डोळ्यांच्या विशिष्ट रचना आणि सतत उडी मारण्याच्या गुणधर्मामुळे ओळखली जाते. जैवविविधतेसाठी समृद्ध असलेल्या सह्याद्रीच्या भूप्रदेशामधून अनेक प्रजातींचा उलगडा होत असतो. यावेळी या प्रदेशामध्ये आढळलेली एक 'जम्पिंग स्पायडर'ची प्रजात भारतामध्ये प्रथमच नोंदवण्यात आली आहे. 'इरुरा' या पोटजातीचा भारतात पहिल्यांदाच शोध घेण्यास संशोधकांना यश आले आहे. सिंधुदुर्गमधील वन्यजीव अभ्यासक गौतम कदम, अरेक्नॉलॉजिस्ट ऋषिकेश त्रिपाठी (क्रिस्त कॉलेज,केरळ), आशिष जांगीड (डब्लूआयआय, देहराडून) अम्बालापरंबील सुधिकुमार (क्रिस्त कॉलेज, केरळ) आणि डेवीड़ हिल (यूएसए) यांनी हे संशोधन केले आहे. नुकतेच या संदर्भातील संशोधन १४ ऑगस्ट रोजी 'पेखामिया' या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झाले. 'इरुरा' ही 'जम्पिंग स्पायडर' या परिवारात मोडणारी पोटजात आहे. या पोटजातीमधील प्रजाती मुख्यतः चीन, व्हिएतनाम,मलेशिया,जपान तसेच श्रीलंका या देशांमध्ये सापडतात. या पोटजातीमध्ये १६ प्रजाती आढळतात.
कुडाळ तालुक्यातील वेताळ -बांबर्डे या गावात दि. १४ जून, २०२१ रोजी 'इरुरा' या पोटजातमधील 'इरुरा मंदारिना सायमन'ची मादी आम्हाला सापडल्याची माहिती संशोधक ऋषिकेश त्रिपाठी यांनी दिली. रात्रीच्या वेळी बांबू रोपवनात संशोधकांना ही प्रजात दिसली. मादी नमुन्याच्या शास्त्रीय तपासणीवेळी ही प्रजात 'इरुरा' असण्याची शक्यता जाणवल्याने संशोधकांनी पुन्हा गावात जाऊन नर नमुने शोधून काढले. या दोन्ही नमुन्यांच्या अंतिम पडताळणीनंतर ही प्रजात 'इरुरा' पोटजातच असल्याचे निष्पन्न झाल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले. 'इरुरा मंदारिना' या प्रजातीच्या पाठीवरती सोनेरी झाक आहे. ही प्रजात पुर्वी चीन आणि व्हिएतनाम मधून सापडल्याच्या नोंदी झाल्या आहेत. या प्रजातीबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे.