रूग्णसेवेचा वसा घेतलेले जितेंद्र नेमाडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2021   
Total Views |
jitendra _1  H




रूग्णाला औषधोपचारांसाठी लागणारे सर्व साहित्य एका पॅकेजमध्ये देण्याचे काम जितेंद्र नेमाडे करीत आहेत. रुग्णासाठी पुरवित असलेल्या वेगळ्या सेवा आणि त्यांचे सामाजिक काम याविषयी आपण जाणून घेऊया.
 
 
जितेंद्र नेमाडे सध्या ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’च्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. त्यांचे बालपण डोंबिवलीतच गेले. ते मूळचे खानदेशातील आहेत. वडील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने डोंबिवलीत आले. तेव्हापासून ते डोंबिवलीकर झाले. त्यांचे गावी कधीतरीच येणे जाणे होते. त्यांची घरची परिस्थिती मध्यमवर्गीय होती. त्यांच्या मोठ्या भावाने शिक्षण पूर्ण करून नोकरी पत्करली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागला. त्यावेळी जितेंद्र महाविद्यालयीन शिक्षण घेत होते.
 
 
सध्या ते कोपर रोड येथील बालाजी गार्डन इमारतीत राहतात. डीएनसी शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. दहावीनंतर त्यांनी ‘डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन’चे शिक्षण ठाण्यातील ‘व्हीपीएम पॉलिटेक्निक’ या महाविद्यालयातून पूर्ण केले. मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण भगूबाई मफतलाल महाविद्यालयातून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘शिलर हेल्थ केअर’ या कंपनीच्या डिलरकडे काम केले होते. चार वर्षे काम केल्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्वत:चे कौशल्य विकसित करणे आणि नागरिकांच्या गरजेनुसार त्यांना वस्तू पुरविणे, आपल्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणे या हेतूने त्यांनी व्यवसायात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. २००० साली त्यांनी व्यवसायात पदार्पण केले.
 
 
जितेंद्र मेडिकल आणि सर्जिकल क्षेत्रात काम करतात. डॉक्टर, रुग्णालये आणि घरोघरी असणार्‍या रुग्णांना ज्या आरोग्य साधन सामग्रीची गरज असते त्या वस्तू पुरविण्याचे काम ते करतात. डॉक्टरांमध्ये छोट्या दवाखान्यापासून मोठ्या रुग्णालयांचा समावेश असतो. या सर्वांना लागणारे साहित्य जितेंद्र पुरवितात. मोठ्या रुग्णालयांना आवश्यक असणारे शस्त्रक्रिया विभाग, आयसीसीयु, ‘डायग्नोस्टीक सेंटर’ला लागणार्‍या मशीनरी दिल्या जातात. हे काम करतानाच डॉक्टरांकडूनच जितेंद्र यांच्याकडे काही उत्पादनाची मागणी होऊ लागली. काही रुग्णांना घरीच रक्तदाब, शुगर चेक करायची असते.
 
 
कारण, रुग्णांना रात्रीच्या वेळी त्रास झाल्यास डॉक्टरांची ओपीडी रात्री सुरू नसते. त्यामुळे घरच्या घरी रक्तदाब, शुगर चेक करून डॉक्टरांशी फोनवर सल्लामसलत करून उपचार घेता येतात. त्या पद्धतीने रुग्णांना सुविधा पुरविण्याचे काम जितेंद्र यांनी केले. ऑर्थोपेडीक उत्पादने, पोटांचे किंवा पाठीच्या बेल्टचा पुरवठा सुरू केला. ‘सीओपीडी’ आजार आहे. या आजारात रुग्ण घोरतात. या आजारांमुळे माणसाचा जिवही जाऊ शकतो. या आजाराशी संबंधित टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने करून दिली जात असे. टेस्ट ‘पॉझिटिव्ह’ आली तर रुग्णाला त्यांची मशीनरी रोज रात्री झोपताना लावावी लागते. सुरूवातीला मशीनरी महाग असल्याने ते भाड्याने घेत असत.
 
 
ऑक्सिजन सिलिंडर महाग पडतात. मग त्यांच्याकडून ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ही भाड्याने दिले जात असल्याने रुग्णांना दिलासा मिळत होता. ‘कोविड’ काळात या ऑक्सिजन सिलिंडरची मोठ्या प्रमाणात गरज भासत होती. रुग्णांनी लागणार्‍या उपचारांच्या सुविधा देता देता त्यांनी त्या सुविधा भाड्याने देण्यास सुरूवात केली. ‘आयसीसीयु’ सेटअप रुग्णालयातच असते, असे अनेकांना वाटते. पण तशा प्रकारचे सेटअप भाड्याने घरी उपलब्ध करून देण्याचे कामही जितेंद्र करतात. भाड्याने सुविधा देण्याचे काम २००५ पासून सुरू आहे. त्यामध्ये वॉकर, बेड, एअरबेड, ऑक्सिजन असे सगळे पॅकेज दिले जाते. ‘आयसीसीयु’चे पॅकेज देण्याचे काम मुंबईत पहिल्यांदा आम्हीच सुरू केल्याचे जितेंद्र सांगतात.
 
 
जितेंद्र यांचे डोंबिवलीतील नांदिवली रोड येथे कार्यालय आहे. नवीन ‘कस्टमाईज मेडिकल फूटवेअर सेंटर’ सुरू केले आहे. सामान्य माणसाला आपल्या पायात काही डिफेक्ट आहे हे समजत नाही. दोन्ही पायात लांबी आणि रूंदी, आकारात फरक असतो. आपला पाय पुढच्या बाजूला रुंद असतो. पण आपण शूज अरूंद घालतो. त्यामुळे पाय ‘कॉम्प्रेस’ होऊन टाचदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी यासारख्या दुखण्यांना सामोरे जावे लागते. या प्रकारच्या रुग्णांसाठी सेंटर उभारले आहे. या ठिकाणी रुग्ण आल्यावर पायाचे ‘व्हिडिओ टेस्टिंग’, ‘स्कॅनिंग’, फिजिकल चेकिंग, पायाचे पेपरवर माप घेऊन त्यांना फूटवेअर बनवून देतो. याठिकाणी पायाला त्रास असो किंवा नसो, मधुमेही, ऑर्थोपेडिक अशा सर्वांनाच फूटवेअर बनवून मिळतात. संपूर्ण मध्य मुंबईत हे एकमेव सेंटर आहे, असेही जितेंद्र यांनी सांगितले.
 
 
 
जितेंद्र सामाजिक कामात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जोडले गेले होते. ‘लायन्स क्लब’चे सदस्य होते. डोंबिवलीत आल्यावर गेल्या पाच वर्षांपासून ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ या संस्थेत कार्यरत आहेत. सुरूवातीला त्यांनी सुदृढ बालक स्पर्धा घेतली. ‘रोटरी हेल्थ सेंटर’ दोन वर्षांपूर्वी सुरू केले. त्याठिकाणी ‘इसीजी’ मशीन दान दिले आहे. तसेच दंतचिकित्सा सेटअप डोनेशनमध्ये देण्यासाठी जितेंद्र यांनी मदत केली आहे. ‘कोविड’मध्ये गरजेनुसार निधी जमा करून पाच ऑक्सिजन मशीन आणल्या आहेत.
 
 
गरजूंना अल्प दरात उपलब्ध करून दिले जाते. आता हे सेंटर पुढील महिन्यात १२०० स्क्वे. फूटमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. फिजीओथेरपी, डोळ्यांचे विभाग सुरू करण्यात येणार आहे. इतर वस्तूही रुग्णांना देण्यात येणार आहे. प्रत्येक वस्तूनुसार दर बदलतील. पण चॅरिटेबल ट्रस्ट किमतीवर त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. ‘रोटरी हेल्थ सेंटर’ला एका उंचीवर नेण्याचा मानस आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे ‘मेडिका एंटरप्रायझेस’च्या जितेंद्र नेमाडे यांना पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा.


@@AUTHORINFO_V1@@