
संयम, चिकाटी, मेहनत, कौशल्य यांचा संगम जिथे होतो, तिथे यश हमखास असतं. मयूरने स्वतःच्या व्यवसायात यशस्वी होऊन हे सूत्र खरं करून दाखवलं आहे.
२०१२ मध्ये मयूरने बांधकाम व्यवसायात पदार्पण केलं व एक उद्योजक म्हणून वाटचाल सुरू झाली. त्याचा पहिला प्रोजेक्ट ‘बदलापूर प्राईड २०१२ ’ मध्ये सुरू झाला. १३५ फ्लॅट्सचा हा प्रोजेक्ट २०१६ पर्यंत पूर्ण झाला. २०१६ मध्ये ‘जगन्नाथ प्राईड’ हा ११५ फ्लॅट्स व शॉप्सचा दुसरा प्रोजेक्ट सुरू झाला. अवघ्या दोन वर्षांत तो प्रोजेक्ट पूर्ण झाला.मयूरचा ‘जगन्नाथ गॅलेक्सी’ हा प्रोजेक्ट आज नावारूपाला आला आहे. जुवेली गावाजवळ सुरू असलेल्या प्रोजेक्टची ‘फेज १’ पाहता पाहता पूर्ण झाली आणि त्यातील सर्व फ्लॅट्स १०० टक्के ‘बुक’ही झाले. २४७ फ्लॅट्समधील १२५ फ्लॅट्सचा ग्राहकांना ताबाही दिला गेला आहे. सध्या अशा कठीण समयी, कोरोना काळातही ‘मयूर ग्रुप’चं काम जोमाने सुरू आहे. येत्या वर्षात ‘फेज २’चं कामही पूर्ण होईल, अशा गतीने त्यांचं काम चालू आहे. सोबत बदलापूर गावाजवळ ‘जगन्नाथ क्रीडासंकुल’चे कामही सुरू आहे. चहुबाजूला फळझाडे लावण्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले. लवकरच हे क्रीडासंकुलही खुले होणार आहे.
आपल्या व्यवसायात मयूर खर्या अर्थाने यशस्वी झाला आहे, होतो आहे. काम चालू असताना त्यात शक्य ते बारकावे तो लक्षात घेत असतो. स्वभावात त्याच्या उतावळेपणा नाही. एका उद्योजकात आवश्यक असलेले गुण त्याच्यात आहेत. तो खंबीरपणे जमिनीवर उभा राहून भविष्याचा वेध घेऊन काम करतो, म्हणून तो त्याच्या व्यवसायात पुढे जातं आहे. ‘खंबीरपणे जमिनीवर उभा राहून’ असं का म्हटलं? कारण, यशाने त्याच्या डोळ्यावर कोणत्याही प्रकारची धुंद आली नाही की, अहंकाराने तो विवेक विसरला नाही. यश मिळवणं हे जितकं महत्त्वाचं, तसंच ते टिकवणंही महत्वाचं असतं. मयूरला हे जमलं म्हणून तो आज एक यशस्वी उद्योजक बनला आहे.काम, व्यवसाय यांच्या गडबडीत तो स्वतःची आवड, खेळ, साहित्य, प्रेम जपतो, ही त्याची विशेषता. मयूरच्या स्वभावात शिस्तप्रियता आहे. म्हणून रोज सकाळी तो ठरलेल्या वेळेत आपल्या कामाच्या जागेवर पोहोचतो. ‘मी मालक आहे म्हणून मी कधीही येईन, जाईन, कसाही वागेन’ हे त्याचे सूत्र नाही. मयूरचे प्रत्येक व्यक्तीशी जवळचे, सलोख्याचे संबंध आहेत. भलेही ती व्यक्ती कामगार असेल किंवा ग्राहक. सर्वांशी तो प्रेमाने बांधला गेलेला आहे. इतकेच नाही, तर सामान्य माणसातील उपजत गुण ओळखून त्यांना पुढे येण्यासाठी मयूरने अनेकदा संधीही देऊ केली आहे. असं म्हणतात की, ‘तुम्हाला शर्यत जिंकायची असेल तर एकटे धावा, पण तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचा असेल तर इतरांना सोबत घेऊन चाला.’ मयूर एकटाचं पुढे चालला नाही, तर आपल्या सोबत इतरांनाही पुढे घेऊन त्याचा प्रवास सुरू आहे.
आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवास असतो. यात एक धागा सुखाचा असतो, तर अनंत धागे दुःखाचेही असतात. मयूरवर असाच एक दुःखाचा प्रसंग ओढवला होता. ऑगस्ट २०२०, ऐन गणेशोत्सवाच्या काळात मयूरच्या वडिलांचं निधन झालं. मयूरच्या डोक्यावरुन पितृछत्र हरवलं. स्थितप्रज्ञ पुरुषाप्रमाणे मयूरने स्वतःला व कुटुंबाला त्या क्षणातही सांभाळलं.आपण म्हणतो, मयूर एक यशस्वी उद्योजक आहे, पण तो यशस्वी उद्योजक बनला आहे, तो त्याच्या गुणांमुळे, कौशल्यांमुळे. हे गुण त्याने स्वतः मध्ये मेहनतीने, हुशारीने विकसित केले आहेत. त्याची ही वाटचाल सदैव अशीच यशस्वीपणे सुरू राहो, याच शुभेच्छा...!
- प्रदीप मोगरे