तस्मै राष्ट्राय नमः।

    18-Aug-2021
Total Views |
 
india_1  H x W:
 
भद्रमिच्छन्त ऋषय: स्वर्विद:
तपो दीक्षामुपनिषेदुरग्रे।
ततो राष्ट्रं बलमोजश्च जातं
तदस्मै देवा उपसंनमन्तु॥
(अथर्ववेद-१९/४१/१)
अन्वयार्थ

(स्वर्विद:) सुख-शांतता व आत्मसुखाच्या साधनांना जाणणार्‍या (ऋषय:) ऋषिमुनी व तपस्वी महात्म्यांनी (भद्रम् इच्छन्त) विश्वकल्याणाची इच्छा करीत (अग्रे) प्रारंभी (तप: उपनिषेदु:) खूप मोठी तपश्चर्या केली आणि (दीक्षाम् उपनिषेदु:) दीक्षा व व्रतांना धारण केले. (तत:) त्यामुळे (राष्ट्रं जातम्) राष्ट्रशक्तीचा उदय झाला. (बलम् ओज: च जातम्) राष्ट्रबळ आणि राष्ट्रीय ओज उत्पन्न झाले. (तत्) यासाठीच तर (अस्मै) अशा या राष्ट्रासाठी देवगणांनी, दिव्य थोर महापुरुषांनी, दिव्यशक्तींनी (उप सं नमन्तु) जवळ येऊन उत्तम प्रकारे नमस्कार करावा, सन्मान करावा, नतमस्तक व्हावे.
 
विवेचन

‘राष्ट्र’ ही एक व्यापक संकल्पना आहे. वेदांनी समग्र भूमीलाच ‘राष्ट्र’ म्हणून संबोधले आहे. अथर्ववेदातील बाराव्या कांडातील पहिले सूक्त हे ‘भूमिसूक्त’ म्हणून ओळखले जाते. यात या भूमीवर राहणार्‍या मनुष्यांसह इतर प्राण्यांची काळजी वाहिली आहे. आपली भूमी सर्वदृष्टीने सुखसंपन्न कशी होईल? तसेच या भूमीवर निवास करणारे नागरिक व इतर प्राणी आनंदाने कसे जगतील, यासंदर्भात सुंदर विश्लेषण एकूण ६३ मंत्रांमध्ये झाले आहे. या सूक्तालाच ‘वसुंधरासूक्त’ असेही म्हणतात. केवळ भूमीवरील एका खंडप्राय प्रदेशाला ‘राष्ट्र’ म्हटले जात नाही, तर सारी धरती हेच एक ‘राष्ट्र’ आहे. त्या भूमीवर राहणार्‍या प्रत्येक मानवामध्ये सद्विचारांची रुजवण होऊन त्यांनी मूल्यांची जोपासना करावयास हवी. त्या भूभागावर निवास करणारे नागरिक हे जर आळशी, कर्महीन व नानाविध दोषांनी ग्रासलेले असतील, तर ती भूमी खर्‍या अर्थाने ‘राष्ट्रीय’ संकल्पनेला धारण करू शकत नाही. म्हणूनच बाह्य विकासापेक्षा त्या राष्ट्रात राहणार्‍या मानव समूहामध्ये चांगले विचार व गुण असावयास हवेत. तेव्हा कुठे त्या देशामध्ये अथवा राष्ट्रांमध्ये सुख, शांतता, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण बनू शकते.

सदरील अथर्ववेदीय मंत्रात ऋषिमुनींनी व सत्पुरुषांनी प्रारंभी कोणकोणत्या गोष्टींचे पालन केले? ज्यामुळे की, राष्ट्रीय तत्त्वे विकसित होत गेली आणि त्या देशात राष्ट्रबळ आणि राष्ट्रशक्ती उदयास आली, याचे सुंदर विवेचन केले आहे. ज्या राष्ट्रात उत्तमोत्तम गोष्टी धारण केल्या जातात, ते राष्ट्र सर्वदृष्ट्या सुविकसित होते आणि सन्मानानेदेखील पात्र ठरते. मग अशा देशास जगातील सर्व दिव्यशक्ती नतमस्तक होऊ लागतात. इतर राष्ट्रीय त्या देशाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करू लागतात.
ऋषी हे मनन व चिंतन करणारे असतात. तसेच ते प्रत्येक कार्यात गतिमानदेखील असतात. ‘ऋषति जानाति इति ऋषि:।’ जे राष्ट्रीय, सामाजिक, आध्यात्मिक आदी सर्व प्रकारच्या ज्ञानांनी परिपूर्ण असतात, त्यांना ‘ऋषी’ म्हणतात. ज्ञान, कर्म, उपासना याबाबतीत ऋषी हे नेहमी दक्ष असतात. तसेच आपल्या भूमीचे वा राष्ट्राचे सर्वकल्याण साधण्यासाठी जे तत्पर असतात. राष्ट्रावर जेव्हा-जेव्हा संकट येईल, त्यांचे सर्वदृष्टीने निवारण करण्यासाठी ऋषी हे आपले बलिदान देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. देशाच्या रक्षण व संवर्धनासाठी आपल्या ज्ञान, बुद्धी व सत्कर्मांचा सदैव विनियोग करतात. सर्वांचे भले व्हावे, सर्व मानव! विशेष करून आपल्या राष्ट्रातील नागरिकांचे ते सर्व प्रकारचे हित चिंतणारे ते विवेकाचे आगर असतात. म्हणूनच मंत्रात म्हटले आहे -
भद्रम् इच्छन्त: ऋषय: स्वर्विद:।

सर्व प्रकारच्या भद्रकामना व कल्याणाची मंगल इच्छा हृदयी बाळगत भूमिमातेसाठी जीवन समर्पित करणारे आणि सर्वांच्या सुखांसाठी जीवाचे रान करणारे ते थोर समाजसुधारकदेखील असतात. याच उद्देशापोटी या थोर महापुरुषांनी घोर तपश्चर्या केली व राष्ट्रकार्यासाठी दीक्षित झाले. म्हणूनच आध्यात्मिक व भौतिक विज्ञान प्रगत झाले. या ज्ञानाचा लाभ आजदेखील विश्वातील सर्व मानव समुदाय घेत आहे.जर आपण ही ‘राष्ट्र’ संकल्पना भारतदेशाशी जोडण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच ती सार्थक ठरेल. कारण, भारत हा देश सर्वाधिक प्राचीन देश म्हणून ओळखला जातो. आर्यावर्त हे या देशाचे प्राचीन नाव! याच देशात ऋषिमुनींच्या चिंतनातून वैदिक ज्ञान उदयास आले. त्याचबरोबर उपनिषद, दर्शन यांसारखे तत्त्वज्ञान आणि विविध प्रकारचे सृष्टीविज्ञानदेखील प्रकट झाले. ही काय साधारण गोष्ट नव्हे! अथक तपश्चर्येतून आणि सत्य, अहिंसा इत्यादी तत्त्वांमध्ये दीक्षित होऊन म्हणजेच व्रतांना धारण करीत त्यांनी हे महान कार्य केले आहे.
 
जेव्हा जेव्हा या राष्ट्राचे क्षितीज अंतर्बाह्य संकटांच्या मेघमंडळांनी भरून आले, तेव्हा तेव्हा शूर, वीर देशभक्तांनी आपले रक्त सांडले आणि राष्ट्राचे सर्वतोपरी रक्षण केले. कितीतरी भूमिपुत्रांनी आपल्या सुख-दुःखांची पर्वा न करता राष्ट्रयज्ञात स्वतःचे जीवन आहुत केले. वैयक्तिक संसार सुखाची व घरादाराची पर्वा न करता, त्यांनी फार मोठी तपश्चर्या केली. नाना प्रकारचे अत्याचार सहन करीत केवळ मातृभूमीच्या रक्षणार्थ आपल्या जीवनाचा एक एक क्षण वेचला. हे सर्व घडले ते तपाचरण व दीक्षा या तत्त्वांतूनच! तेव्हा कुठे खर्‍या अर्थाने राष्ट्रशक्ती उदयास आली. पराधीन देश स्वतंत्र झाला. पुढे याच स्वतंत्र राष्ट्रात सर्व प्रकारचे बळ व सामर्थ्य वाढण्यास मदत झाली. असे असताना मग या राष्ट्राला कोण वंदन करणार नाही? निश्चितच जगातील सर्व शक्ती नतमस्तक होण्यास तत्पर असतात. आजवर हे या भारत देशाने जगाला दाखवून दिले आहे. म्हणूनच या भारतभूमीत जन्माला येणारा खर्‍या अर्थाने भाग्यशाली समजला जातो. जगातील असंख्य आत्मे मानव देह धारण करून याच आर्यभूमीत जन्माला येऊ इच्छितात. आपल्या तपस्वी जीवनातून ‘इदं राष्ट्राय, इदं न मम्।’ या भावनेने पोटी आपले सर्वस्व अर्पण करू इच्छितात. अशा या ऋषिमुनी, संत, सज्जन, सुधारक आणि बलिदानी महापुरुषांच्या जन्मामुळे पावन झालेल्या या महान भूमीस व आर्यराष्ट्रास वंदन करूया!
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य