साधकाला आपले मन, साधनेच्या पूर्वावस्थेत खूप सांभाळावे लागते. त्याला यम, नियम व चांगल्या संस्कारांचे कुंपण घालावे लागते.एखादी कृती पुन्हा पुन्हा केल्यास आपल्याला त्याची सवय लागते. सवयींमुळे स्वभाव बनत असतो. सवय नकळत लागत असते. आपण जाणीवपूर्वक एखादी सवय लावून घेऊ शकतो व ती सोडूही शकतो.
एकदा हे लक्षात आल्यावर साधना सोपी होते व मन:संयम लवकर साधला जातो. चांगल्या आचार-विचारांमुळे साधकाचे शरीर पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणबद्ध म्हणजे कृश होते. शरीरावर तेज दिसून येते. क्षुधा, तृष्णा आणि भोगांची लालसा व प्रमाण कमी होते. साधकाला शरीरामध्ये रक्तसंचार वाढलेला असल्याचा अनुभव येतो. मन एकमार्गी बनते. स्वप्ने कमी होतात व जी दिसतात, त्यांचा साधनेशी अर्थपूर्ण संबंध असतो. मृत जीवात्म्यांचा दर्शन साक्षात्कार होणे हाच ‘पृथ्वी तत्त्वा’चा दर्शन साक्षात्कार आहे.
ज्याचे शरीर प्रत्यक्ष जसे असेल, त्याच स्वरुपात साधकाला त्याचे दर्शन होईल. या तत्त्वामुळे लेखकाला गौतम बुद्ध, येशू आणि मोहम्मद पैंगबर यांचे दर्शन झाले. परंतु, ज्याप्रकारे त्यांच्या प्रतिमा काढलेल्या आहेत, तसे ते दिसले नाहीत. बुद्ध पाच फूट, पाच इंच उंच, गहूवर्णी, दाढीहिन परंतु मिशा नसलेला चेहरा, मस्तकावर बांधलेला केशसंभार, थोडे गरुडाकार नाक व विशाल नेत्र असे होते. येशू ख्रिस्ताचे शरीर साधारणपणे साडेपाच फूट उंच, दाढीमिशा असलेला चेहरा, मस्तकावर काळ्या रंगांचे केस, चपटेव लहान नाक आणि काश्मिरी लोकांसारखा वर्ण होता. मोहम्मदांची शरीरयष्टी चांगलीच उंचपुरी म्हणजे जवळजवळ सहा फूट उंच, शरीर किंचित कृश, पण जोमदार, तिरपे लाल नेत्र, सरळ मिशा व दाढी, धूसर केस आणि दृढ निश्चयात्मक मुद्रा, जिला क्रूरसुद्धा म्हणता येईल, अशी होती. अवैदिक परंपरा स्वतःला ‘पृथ्वी तत्त्वा’पर्यंत मर्यादित ठेवू इच्छितात. कारण, त्यांच्यामध्ये कबर, पीर आदींच्या पूजनावर अधिक भर दिलेला आहे. ते मृत शरीराला जाळून नष्ट करू इच्छित नाहीत. ही जड शरीरावरील अशास्त्रीय माया त्यांना ‘पृथ्वी तत्त्वा’पर्यंत मर्यादित ठेवते. आता युरोप अमेरिकेमध्ये अधिकाधिक लोक मृत्यूनंतर आपले शरीर जाळण्यात यावे, अशी इच्छा प्रदर्शित करतात. हे चांगले लक्षण असून त्यांना वैदिक म्हणचेच ज्ञानमय मार्गावर घेऊन जाईल. तेथे पुनर्जन्मावरही अधिकाधिक विश्वास प्रगट करण्यात येत आहे व हे त्यांच्या शास्त्रीय संशोधनाचे फळ आहे. पाश्चिमात्यांचे शास्त्रीय संशोधन अशाप्रकारेच चालू राहिले, तर ते एक दिवशी पूर्ण वैदिक म्हणजे शास्त्रीय जीवनाशी समरस होतील, याबद्दल लेखकाला मुळीच संदेह नाही.
शरीराची शुद्धता व मनाची एकाग्रता एवढ्याच गोष्टी ‘पृथ्वी तत्त्वा’च्या सिद्धीकरिता पुरेशा आहेत. ‘पृथ्वी तत्त्वा’चे दर्शन प्रत्यक्ष ऐतिहासिक व्यक्तींचे होते, ते केवळ काल्पनिक नसते. जे प्रत्यक्ष असेल तेच दिसेल.‘पृथ्वी तत्त्वा’चा वर्ण धूसर (पीशांग) आहे व तो सर्वच रंग एकत्र केल्याने मिळतो. ‘पृथ्वी तत्त्वा’चा गुण गंध असून समजण्यास अतिकठीण आहे. ‘गंध’ शब्द दोन धातूंपासून तयार झालेला आहे. यापैकी ‘गं’ म्हणजे गतिमानता व ‘ध’ म्हणजे धारणा करणे हा होय. सर्व विश्व म्हणजेच एक गतिमानता आहे. प्रकाशामुळे ओतप्रोत (इलेक्ट्रॉन्स अॅण्ड प्रोटॉन्स) प्रचंड गतीने फिरत राहतात. प्रत्येक अस्तित्व आपल्या धर्मधारणेनुसार या गतिमानतेतून आपल्या योग्य तो कण पकडून स्थिर होते. ओतप्रोत सर्वत्र भरलेले आहेत. त्यांना विशिष्ट स्थानी विशिष्ट प्रकाराने धारण करण्यात आल्यास वस्तू तयार होते. या धारणा शक्तींमध्ये भिन्नता आल्यास भिन्नभिन्न प्रकारच्या वस्तू म्हणजेच पदार्थ तयार होतात. यांनीच सारे विश्व बनलेले आहे. ‘पृथ्वी तत्त्व’ जड असल्यामुळे त्याचा वर्ण ‘पीशांग’ आणि गुण गंध आहे. गतिमानतेला आपल्या अस्तित्वानुकूल धारण करणे म्हणून पृथ्वीचा गुण गंध आहे.
‘पृथ्वी तत्त्वा’च्या वरच्या स्तरावर ‘आप तत्त्व’ येते. या तत्त्वामध्ये सर्व सिद्धी प्राप्त होतात. ‘पृथ्वी तत्त्वा’ची प्राप्ती करणारा साधक आपली साधना पूर्ववत कायम ठेवून आणि तिलाच गती देऊन ‘आप तत्त्वा’चे अनुभव प्राप्त करू शकतो. ‘पृथ्वी तत्त्वा’त प्राप्त झालेली एकाग्रता अधिक प्रखर बनवून ‘आप तत्त्वा’योग्य करता येते. ‘आप तत्त्वा’करिता इतर काही साधना करण्याची आवश्यकता नाही. परंतु, ‘आप तत्त्वा’चे प्रत्यक्ष अनुभव येण्यापूर्वी साधकाला प्रथम ‘कुंडलिनी’ शक्ती जागृत करणे आवश्यक आहे. ‘कुंडलिनी’ शक्ती जागृत झाल्याशिवाय ‘आप तत्त्वा’चे पुढचे अनुभव येणे शक्य नाही. ‘आप तत्त्व’ व त्यापुढील उच्चतत्त्वांचे ‘कुंडलिनी’ हे प्रवेशद्वार आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. अलीकडे ‘कुंडलिनी’ शक्तीबद्दल बरेच लिखाण करण्यात येते व ‘कुंडलिनी’ शक्ती ही परमोच्चशक्ती व अवस्था आहे, असे मानले जाते. परंतु, ज्या प्रमाणात तसे मानले जाते त्याप्रमाणात ‘कुंडलिनी’ शक्ती व तिचे जागरण ही परमोच्च अवस्था नाही. ‘कुंडलिनी’ जागृती ही एक दुय्यम अवस्था असून ‘पृथ्वी तत्त्वां’हून उच्चतत्त्वांच्या प्राप्तीचे द्वार आहे.
‘कुंडलिनी’ शक्ती
एकाग्र चित्ताने साधना केल्यास ‘कुंडलिनी’ शक्ती आपोआप जागृत होते. तथापि ‘कुंडलिनी’ जागृत करण्याचे दुसरेही अनेक मार्ग आहेत. त्यापैकी आसन, ध्यान, खर्ज साधना आणि योग्य अधिकारी गुरूच्या द्वारा शक्तिसंचार करविणे, हे ‘कुंडलिनी’ जागरणाचे प्रमुख मार्ग आहेत.
आसन
‘कुंडलिनी’ जागृत करण्याकरिता काही आसने व मुद्रा करण्यात येतात व त्या सतत करीत राहिल्यास योग्यवेळी आपोआप ‘कुंडलिनी’ जागृत होते. पद्मासन, महामुद्रा आणि सिद्धासन ही ती आसने असून ती सतत केल्याने मूलाधारस्थित ‘कुंडलिनी’ जागृत होऊ शकते. पद्मासनाहून महामुद्रा अधिक परिणामकारक आहे व योगेश्वर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात वर्णन केलेले सिद्धासन सर्वांहून अधिक शीघ्र परिणामकारी आहे. दररोज सिद्धासनाचा अभ्यास केल्यास अधिकाधिक सहा महिन्यांत साधकाची ‘कुंडलिनी’ जागृत होऊ शकते.
पद्मासन
शरीर पार्श्वभागावर समतोल धारण करावे. प्रथम उजवी मांडी घालून उजवा पाय डाव्या जांघेवर ठेवावा. नंतर डावी मांडी घालून डावा पाय उजव्या जांघेवर ठेवावा व अशा प्रकारे शरीराचा तोल सांभाळून मेरुपृष्ठ (पाठीचा कणा) व मान सरळ ताठ ठेवावी. मांडीवर प्रथम डावा पंजा, करतळ वरच्या दिशेला येईल, अशा प्रकारे ठेवावा व त्याच तर्हेने उजवा पंजा ठेवावा. खांदे वर ओढून हनुवटी छातीच्या दिशेने झुकवावी. या प्रकारे पद्मासन घालावे. यामुळे कुंडलिनी जागृत होते, पण त्याकरिता हे आसन सतत अनेक वर्षे करावे लागेल. (क्रमशः)
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)