ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोन्ही नावाजलेल्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड (बॉल टेम्परिंग) केल्याचा प्रकार दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यादरम्यान समोर आला आणि त्यानंतर क्रिकेटविश्वातील वातावरण ढवळून निघाले. हे दोन्ही खेळाडू आपली शिक्षा भोगून आजमितीस ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात खेळत असले, तरी पूर्वीप्रमाणे या खेळाडूंचा नावलौकिक काही राहिलेला नाही.
एका नामांकित छायाचित्रकाराने हे खेळाडू चेंडूशी छेडछाड करत असल्याची छायाचित्रे त्याने आपल्या कॅमेर्यात कैद केली आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा खोटारडेपणा अख्ख्या जगासमोर उघड झाला. क्रिकेटविश्वातील हे वादळ शमले होते. मात्र, नुकत्याच भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या दोन खेळाडूंकडून चेंडूशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर क्रिकेटविश्वात ‘बॉल टेम्परिंग’चे वादळ पुन्हा घोंघावू लागले आहे. ‘क्रिकेटची पंढरी’ मानल्या जाणार्या प्रसिद्ध ‘लॉर्ड्स’च्या मैदानावरील कसोटी सामना भारताने जिंकण्यात यश मिळविले. या सामन्यादरम्यान भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची झाल्याचे प्रकारही घडले. सामना संपला आणि भांडणेही. परंतु, सध्या क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे ती इंग्लंडच्या खेळाडूंकडून झालेल्या ‘बॉल टेम्परिंग’ची. इंग्लंडचे खेळाडू मार्क वूड आणि रॉरी बर्न्स दोघेही आपल्या बुटांद्वारे चेंडूशी छेडछाड करत असल्याचे समोर आले. बुटांना असणार्या खिळ्यांद्वारे चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रथमदर्शनी तरी छायाचित्रात दिसत आहे. याबाबत स्टुअर्ट ब्रॉड या खेळाडूने खुलासा केला असला तरी क्रिकेट समीक्षकांच्या मते हे प्रकरण दुर्लक्ष करण्यासारखे तरी नाही. या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण, इंग्लंडसारख्या देशाच्या खेळाडूंकडूनही असे प्रकार घडत असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत क्रिकेट समीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे. क्रिकेटच्या खेळाची सुरुवात इंग्लंडमधूनच झाल्याचा इतिहास आहे. मात्र, इतक्या वर्षांनंतर आज याच देशात क्रिकेटच्या खेळालाही लाज आणेल असे प्रकार घडल्यानंतर ‘साहेबां’चीही चौकशी व्हावीच, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
जुनाच इतिहास!
इंग्लंडचे खेळाडू ‘बॉल टेम्परिंग’च्या आरोपांमध्ये पहिल्यांदाच अडकल्याचे आरोप झालेले नाहीत. याआधीही इंग्लंडच्या खेळाडूंवर ‘बॉल टेम्परिंग’चे आरोप झाल्याचा इतिहास आहे. केवळ इंग्लंडच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांच्या खेळाडूंवर हे आरोप झाल्याचा इतिहास असून काहींना या प्रकरणात शिक्षाही झाल्याचा इतिहास आहे. १९७६ साली इंग्लंडच्या भारत दौर्यादरम्यान वेगवान गोलंदाज जॉन लिव्हरविरोधात हे आरोप झाले होते. चेंडूला स्विंग मिळावा, यासाठी त्याने चेंडूला चक्क पेट्रोलियम जेली लावल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, त्याकाळी तंत्रज्ञानाअभावी हे सिद्ध होऊ शकले नाही. कालांतराने हे प्रकरण दडपले गेले, तर लॉर्ड्स मैदानावरच तत्कालीन इंग्लंडचा कर्णधार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान मायकेल अॅथार्टन चेंडूला माती लावताना आढळला होता. आपण हात कोरडे राहावेत, यासाठी माती हातांना फासल्याचे स्पष्टीकरण अॅथार्टनने दिले होते. अॅथार्टनला या प्रकरणामध्ये दंड ठोठावण्यात आला होता. काही भारतीय खेळाडूंविरोधातदेखील अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. परंतु, ते सिद्ध होऊ शकले नाहीत. ऑस्ट्रेलियन खेळाडू चेंडूशी छेडछाड करत असल्याचे कॅमेर्यातच कैद झाले. त्यामुळे या खेळाडूंकडे कबुली देण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता. या खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कबुली तरी दिली. मात्र, पाकिस्तानने तर येथेही कहरच केल्याचा इतिहास क्रिकेटविश्वात आहे. इंग्लंडच्याच दौर्यादरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी हा चक्क चेंडू चावतानाचा प्रकार कॅमेर्यात कैद झाला होता. याविरोधात इंग्लंडच्या खेळाडूंनी अपील केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कारवाईच्या दिशेने पावलेही उचलली होती. मात्र, पाकिस्तानने दौरा अर्ध्यावरच सोडत येथून पळ काढला. संपूर्ण जगात पाकिस्तानवर याबाबत टीका करण्यात आली. परंतु, यानंतरही पाकिस्तानवर काहीच फरक पडला नाही. यानंतरही पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंवर असे आरोप होतच राहिले. अनेकांना दंड ठोठावण्यात आला. परंतु, पाकिस्तानच्या खेळाडूंकडून असे प्रकार होत असल्याचा इतिहास कायम आहे. देश कोणताही असो. मात्र, या खेळाडूंवर ठोस कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत क्रिकेट समीक्षकांचे आहे.