जागतिक स्पर्धेत सगळेच रथी-महारथी असतात. त्यांच्यात स्थान मिळवता येणे, हासुद्धा अनोखा विजय आहे. कधीकधी विजयाच्या शिखरावर विराजमान न होता, त्यांच्या जवळपास पोहोचण्याचे धाडस करणारी मंडळी खरेतर विजयमाला गळ्यात घालून वावरत असतात. कुठल्याही क्षेत्रातले प्रामाणिक झुंज देऊन मिळविलेले विजेतेपद हे नुसते नशिबाने मिळत नसते. मैदानावर तो उत्कट आणि उत्कृष्ट खेळ आपण पाहतो, त्यामागे अगणित काळ केेलेल्या परिश्रमाचा आणि गाळलेल्या घामाचा गुणाकार आहे.
आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येक जण आपल्या मनाच्या गाभ्यातील मूल्यांतून आंतरिक प्रेरणा घेत असतो. ही मूल्ये आपल्या विचारांत, कल्पनेत, मूलभूत श्रद्धेत किंवा आपल्या तत्त्वप्रणालीत वसलेली असतात, याच विशुद्ध मूल्यांतून आपल्याला गंभीर आणि निर्णायक क्षणी अनेक कठीण निर्णय घ्यायची प्रेरणा मिळते. याच प्रामाणिक मूल्यांतून आपली कर्तृत्त्वादायी प्रेरणा खरोखर आपल्या जीवनात उपयुक्त आहे की नाही, याचा आढावा घेता येतो. ही जीवनमूल्य आपल्याला आत्मिक चिंतनातून ओळखता येतात. एखादे ध्येय पूर्ततेेकडे नेण्यासाठी आपण काय करू शकतो, स्वत:ला किती आव्हान देऊ शकतो, कष्टांची सीमा किती दूरवर नेऊ शकतो, येणार्या संधीचा उचित फायदा कसा घेऊ शकतो आणि एखाद्या कठीण परीक्षेच्या क्षणी स्वत:ला कसे सावरू शकतो, या गोष्टी या जीवनमूल्यांतूनच प्राप्त होतात. खेळाडूंसाठी ही जीवनमूल्ये निर्णायक ठरतात. या जीवनमूल्याचे दर्शन कधीकधी आपल्याला त्यांच्या मैदानी वागणुकीतूनही घडत असते.
थोडे बारकाईने खेळाडूंच्या वागणुकीचे निरीक्षण केले, त्यांची पार्श्वभूमी पाहिली तर हे आपले खेळपटू काही अद्वितीय आणि ठळक अशा गुणांनी एकमेकांशी जोडले गेले आहेत. इतकेच नाही, तर या खास गुणवैशिष्ट्यांमुळे ते इतरांपासून निराळे वाटतात. जागतिक स्पर्धेत विविध पदकांपर्यंत पोहोचविणारी डोळे दीपविणारी त्यांची कामगिरी अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यांची सकारात्मक मनोवृत्ती, जिद्द, बांधिलकी, आयुष्यात होणार्या बदलांशी जुळवून घ्यायची वृत्ती, स्वत:च्या चुका स्वीकारून भविष्यात त्या सुधारायची क्षमता, या गोष्टी अगदी आवर्जून त्यांच्या विचारांत आणि वागणुकीत आढळतात.
अतोनात जीव तोडून कष्ट करण्याची त्यांची तयारी हा त्यांच्या आयुष्यातील विजयी मनोर्याचा भक्कम पाया ठरतो. जागतिक स्पर्धेत सगळेच रथी-महारथी असतात. त्यांच्यात स्थान मिळवता येणे, हासुद्धा अनोखा विजय आहे. कधीकधी विजयाच्या शिखरावर विराजमान न होता, त्यांच्या जवळपास पोहोचण्याचे धाडस करणारी मंडळी खरेतर विजयमाला गळ्यात घालून वावरत असतात. कुठल्याही क्षेत्रातले प्रामाणिक झुंज देऊन मिळविलेले विजेतेपद हे नुसते नशिबाने मिळत नसते. मैदानावर तो उत्कट आणि उत्कृष्ट खेळ आपण पाहतो, त्यामागे अगणित काळ केेलेल्या परिश्रमाचा आणि गाळलेल्या घामाचा गुणाकार आहे. अनेक आत्मविख्यात खेळाडू जसे की, मोहम्मद अली, लिओनेल मेसी, पेले आपल्या देशात मिल्खा सिंग ‘फ्लाईंग सिंग’, पी. टी. उषा, बलबीर सिंग, खाशाबा दादासाहेब जाधव या सगळ्यांच्या कष्टाला कधी मर्यादाच नव्हती.
आजच्या टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्ये मीराबाई चानूचे उदाहरणच पाहा ना. अत्यंत गरिबीत राहणारी मीराबाई तिच्या भावंडांबरोबरच घरासाठी जवळपास लागणारा लाकूडफाटा गोळा करून तो आपल्या खांद्यावर वा डोक्यावर लादून आणायचं संकट आणि अवघड काम अगदी लहानपणापासून करत असे. तिची जबरदस्त ऊर्जा आणि कष्ट करायची तयारी याही वेळ वाखण्यासारखी होती. राणी रामपाल लवलिना, नीरज चोप्रा, बजरंग पुनिया यांच्या कष्टांची तुलना नाही. मानसिक चिकाटीशिवाय असे श्रम कुणीही करू शकत नाही. 'Train Smarter and Harder' या उक्तीला अशा उत्तुंग कामगिरीसाठी दुसरा पर्याय उरतच नाही. या कष्टप्रद जीवनात रममाण होण्यासाठी या खेळाडूंनी एक उत्तम संदेश हृदयात जोपासला आहे. तो म्हणजे, आयुष्यात एखादे सुवर्णजडित यश सुलभतेने मिळत नाही. त्यासाठी आपल्या आयुष्यात असे सुवर्णमय यश डोळ्यांसमोर ठेवून ते गाठण्यासाठी जीवाचे रान करायला लागते. मिल्खा सिंग अनवाणी धावत असत. त्यांच्याकडे शूज् नव्हते, ट्रॅकसूट नव्हता, काहीच नव्हते, फक्त परिश्रम करण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीचे धनी होते मिल्खा सिंग. हवामान कसेही असो, प्रत्येक दिवशी सूर्योदयाबरोबर ते धावत राहिले.
या जिकिरीच्या अंगमेहनतीबरोबर अतिशय मौलिक गोष्टीची जोड यशस्वी खेळाडूला लागते, ती म्हणजे सातत्य! ऊन-वारा-पाऊस काहीही असो, स्वत:ला पुढे रेटत न्यायचे हा ध्यास महत्त्वाचा! हे असे किती उमदे खेळाडू आहेत की ते संपलेत, असे वाटता वाटता ते स्वत:ला सावरून पुन्हा पुन्हा उसळी मारत राहतात. हाच त्यांच्या सातत्याचा वादातीत पुरावा आहे. जगज्जेते कितीही अरिष्टे आली, वादळे समोर ठाकली, तरी ते स्वत:ला या सगळ्यातून बाहेर काढतात, आपली पूर्ण ताकद पणाला लावून कर्करोगासारख्या आजारातसुद्धा खेळाची घडी विस्कटू न देणारे खेळाडू मानवी अस्तित्वाला एक वेगळीच चकाकी देतात. काळोख्या रात्रीतसुद्धा त्यांची नजर उगवत्या सूर्यावर असते. सातत्याशिवाय यशाच्या जवळ जाण्याचा कोणी विचारच करू नये.
खेळ किंवा इतर कामगिरी असेल, तर एखादी व्यक्ती कितीही महान असली, कुशल असली, तरी चुका केल्याशिवाय राहत नाही. किंबहुना या चुका घडत राहतातच, अशावेळी विजयाकडे लक्ष असेल, तर स्वत:ची चूक स्वीकारून ती सुधारायची क्षमता या खेळाडूकडे असते. कधी ‘स्टॅमिना’ बिघडतो. कधी तंत्र चुकते आणि तुम्ही जर स्पर्धक आहात, तर समोरील स्पर्धकांचे तांत्रिक कौशल्य ओळखून त्यावर मात करण्यासाठी लागणारे कौशल्य आपल्यात कमी पडत असेल, तर ते ओळखून स्वत: सुधारणा करणे, खेळाडूसाठी आवश्यक असते. ‘फॉर्म’ टिकवायचा, तर आपली मानसिक लवचिकता आणि नूतन शिकत राहण्याची क्षमता सांभाळायला लागते. यासाठी विनयशीलता स्वभावात असायला लागते. मुळात आपण चुकू शकतो, आपले कौशल्य कमी पडू शकते, आपल्यापेक्षा दुसरा जास्त समर्थ आहे, हे स्वीकारण्याची नम्रता व्यक्तीत असायला लागते, तरच विधायक बदल शक्य आहे.
आपल्या अनेक खेळाडूंनी पदके मिळवली नसतील, तरी त्यांनी स्वत:चेच रेकॉर्ड्स तोडले आणि स्वत:ची उत्तम कामगिरी बजावली आहे. ही खूप असामान्य गोष्ट आहे, या सगळ्यांनी स्वत:ला उंचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. प्रत्येक वेळी पदकांनी अत्युच्च पराक्रम घडतो, असे नाही.
आपण नीरज चोप्राची सुवर्णपदक विजेती भालाफेक पाहिली. अतिशय आकर्षक आणि मन तृप्त करणारा तो विलक्षण प्रसंग पुन्हा पुन्हा पाहत राहावा, असा डोळे दीपविणारा प्रसंग, पण त्या प्रसंगाला एक विशिष्ट उंची लाभली, ती त्यांच्या त्याक्षणीच्या विशेष दृष्टिकोनामुळे, ज्याक्षणी मनावर जबरदस्त तणाव असणारे क्षण, मन विचलित होऊ शकणारा क्षण असताना त्याने जो संयम दाखवला, अतिशय शांतपणे आपल्या मनावर व शारीरिक हालचालीवर एक परिपक्व काबू ठेवला व जी शिस्तबद्धता पाळली, हा खरंच कौतुकाचा आणि शिकण्याचा विषय आहे. खरे जगज्जेते हे अर्जुन असतात, आपल्या ध्येयावर पूर्ण लक्ष ठेवून संयम बाळगतात, याघडीला कामी येतात ती व्यक्तीची जगण्यासाठी आवश्यक असणारी मूलगामी मूल्ये. त्यामुळेच मनावर आणि शरीरावर प्रगल्भ नियंत्रण ठेवता येते.
डाॅ. शुभांगी पारकर